MahaVikasAghadi Experiment in Kalyan Dombivli Also
MahaVikasAghadi Experiment in Kalyan Dombivli Also 
विश्लेषण

कल्याण डोंबिवलीतही महाविकास आघाडी; स्थायी समिती सभापती निवडणूक

सरकारनामा ब्युरो

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी 3 जानेवारीला निवडणूक होणार आहे. राज्यात बदललेल्या सत्ता समीकरणांमुळे या पदावर कोण विराजमान होणार याबाबत उत्सुकता आहे. शिवसेनेने भाजपला सभापतीपद द्यावे, अशी अपेक्षा भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. त्यामुळे केडीएमसीमध्ये राज्यातील नव्या सत्तासमिकरणांप्रमाणे महाविकास आघाडीचा सदस्य सभापदीपदावर बसतो की युतीचा, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

स्थायी समितीत शिवसेना आणि सहयोगी आघाडीचे आठ सदस्य, भाजपचे सहा तर मनसे, कॉंग्रेस यांचा प्रत्येकी एक सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. राज्यातील महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही एकत्र येत असल्याचे चित्र दिसत आहे. अशाच पद्धतीने जर कल्याण-डोंबिवलीतही आघाडी झाली तर शिवसेनेकडे नऊ सदस्य संख्या असेल. सेना-भाजपमधील बिघडलेल्या संबंधानंतर युती कधी झाली होती? असा प्रश्न विचारला जात आहे. 

याचाच अर्थ शिवसेना पाचव्या वर्षी स्थायी समिती सभापती पद स्वतःकडेच ठेवणार असल्याचे स्पष्ट आहे. सभापती पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये अधिकृतपणे चर्चा झालेली नाही. मात्र, डोंबिवलीचे आमदार तथा पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

30 डिसेंबरला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना या विषयात लक्ष घालण्यासाठी वेळ मिळेल, अशी अपेक्षा आहे. आज, 1 जानेवारीला सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. त्यामुळे शिवसेनेकडून कोणाला संधी दिली जाते याकडे सर्वांचेच लक्ष आहे. मागील वर्षी डोंबिवलीचे युवा नेते दीपेश म्हात्रे यांना संधी दिल्यानंतर सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक गणेश कोट तसेच जयवंत भोईर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी कोट यांना पुढील वर्षी संधी दिली जाईल, अशी समजूत काढण्यात आली होती. शिवसेना नेतृत्व आपला दिलेला शब्द पाळणार का? अशी चर्चाही सेनेच्या गोटात आहे.

शिवसेनेचे सहयोगी भाजपकडून गळाला!

मागील चार वर्ष शिवसेनेचे सहयोगी सदस्य असलेले कासिफ तानकी यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. 2015 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर संदीप गायकर स्थायी समिती सभापती पदावर विराजमान झाल्यावर झालेल्या पहिल्याच सभेत तानकी यांनी पाचव्या वर्षी आपण गायकर ज्या खुर्चीवर बसले आहेत, त्या खुर्चीवर बसू असे वक्तव्य केले होते. भाजप याचा फायदा उचलणार का हे 3 जानेवारीला स्पष्ट होईल. 

भाजपकडून विकास म्हात्रे सभापती पदासाठी इच्छुक आहेत. मात्र शिवसेनेकडे सहयोगी सदस्यांसमवेत आठ आणि कॉंग्रेसचा एक असे नऊ सदस्य आहेत. तर भाजपकडे सहा सदस्य संख्या आहे. मनसेचा एक सदस्य स्थायी समितीमध्ये आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय भाजप स्थायी समिती सभापती पद मिळवू शकत नाही, हे स्पष्ट आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT