Maharashtra Politics Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics : आरोप-प्रत्यारोप, उणीदुणी, गुंडगिरीची भाषा,पक्षांतरे असं सारं काही झालं असेल तर आता...

अय्यूब कादरी

Political News : राज्याच्या राजकारणात सध्या जे सुरू आहे, ते संवेदनशील माणसाला किळस आणणारे आहे. आरोप-प्रत्यारोप, एकमेकांची उणीदुणी काढणे, गुंडगिरीची भाषा, पक्षांतरे.... सारेच सहन करण्याच्या पलीकडे गेले आहे. याला कोणताही पक्ष अपवाद राहिलेला नाही. नागरिकांचे मूळ प्रश्न बाजूला सारून आपलेच घोडे दामटण्याचा प्रकार सर्वच पक्षांनी, विशेषतः सत्ताधारी पक्षांनी तरी थांबवायला हवा.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर राजकीय पक्षांनी विवेकबुद्धी विसरून एकमेकांवर टीका करायला सुरुवात केली. शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडल्यानंतर अशा प्रकारांचा जोर वाढला. पुढे अजितदादा पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी झाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. पक्षांतराचे प्रकार यापुढे घडणार नाहीत, असे या घडीला ठामपणे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांचे हे सत्र लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत सुरू राहील, असे चित्र आहे. काही नेत्यांकडून, विशेषतः काही सत्ताधारी नेत्यांकडून वापरली जाणारी अरेरावीची, गुंडगिरीची भाषा महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्री केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. महाविकास आघाडी सरकार असताना मंत्रिपद देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केली होती. मी त्यांना (उद्धव ठाकरे) चेकद्वारे एक कोटी रुपये दिले होते, असा गंभीर आरोप केसरकर यांनी केला आहे. हा आरोप करण्याचे टायमिंग लक्षात घेणे गरजेचे आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकताच कोकणचा दौरा केला. त्यात त्यांनी नेहमीप्रमाणे केसरकर यांच्यावर गद्दार, पन्नास खोके घेणारे, अशी टीका केली होती. त्यानंतर केसरकर यांनी पलटवार करत ठाकरे यांना चेकने एक कोटी रुपये दिल्याचा आरोप केला होता. हा आरोप त्यांनी आधी का केला नाही, असा प्रश्न लोकांना पडू शकतो, मात्र याचे उत्तर केसरकर देतील, याची शक्यता कमीच आहे.

अशा प्रकारची रक्कम कुणीही चेकने देत नाही, हे सामान्य बुद्धीमत्ता असलेल्यांनाही सांगण्याची गरज नाही. केसरकर यांचा आरोप खोटा असेल तर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकायला हवा, मात्र अद्याप तरी तसे झालेले एेकिवात नाही. मंत्रिपद मिळवण्यासाठी नेत्यांना पैसे खर्च करावे, लागतात, असे केसरकर यांनी जाहीर करून टाकले आहे. ते खरे की खोटे हे सर्वच राजकीय पक्षांनी, विशेषतः ज्यांच्यावर आरोप झाले त्या उद्धव ठाकरे यांनी लोकांना सांगून टाकले पाहिजे. नाही सांगितले तरी खरे काय आणि खोटे काय, लोकांना सर्वकाही माहीत असते. दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) एक लक्षात ठेवले पाहिजे, ते ही की, त्यांनी पैसे दिले असती तर तेही गुन्हेगार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजकीय पक्षांची फोडाफोडी, त्यानंतर होणारे आरोप-प्रत्यारोप यांना अगदीच महत्व नाही, असे नाही. राजकारणात या बाबी अटल असतात. मात्र या गोष्टींना एका मर्यादेपर्यंत महत्व आहे. लोकांना हे आवडले नसेल तर लोक संबंधित पक्षांना, नेत्यांना धड़ा शिकवतील. त्यासाठी गद्दारी केल्याची, पक्ष फोडल्याची, पन्नास खोक्यांची, मंत्रिपदांसाठी पैसे घेतल्याचे मुद्दे सतत बातम्यांत ठेवणे, ही संबंधित नेत्यांची मजबुरी असू शकते. पण राज्यातील शेतकऱ्यांची, लोकांची मजबुरी काय आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, याकडे सरकार लक्ष देणार आहे की नाही? मतदानात काय होईल माहीत नाही, पण सत्ताधाऱ्यांनी वेशांतर करून सर्वसामान्य लोकांची, शेतकऱ्यांची मते जाणून घेतली पाहिजेत.

पाणीटंचाई तीव्र होणार...

ग्रामीण भागात गावागावांत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. येत्या-दोन तीन महिन्यांत पाणीटंचाई तीव्र होणार आहे. बहुतांश तलावांतील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे सिंचनाखालील क्षेत्र घटणार आहे. त्याचा पहिला आणि सर्वाधिक थेट फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.

उस उत्पादन घटले की शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता असते. यावर मात करण्यासाठी सरकारने एखादी योजना आखली आहे का? निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर घसरले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादकांचा लागवडीचा खर्च निघणेही अवघड झाले आहे. काही वस्तू प्रचंड महागल्या आहेत. विविध पक्षांतील मातब्बर नेते फोडून आपल्या बाजूने वळवण्यात यश येत आहे म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पक्ष फोडाफोडी, गद्दारी...

पक्ष फोडाफोडी, गद्दारी... आदींवर काय आरोप -प्रत्यारोप करायचे ते करावेत, यासह विरोधकांनी नागरिकांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांकडेही लक्ष द्यावे. आपला पक्ष फोडला म्हणून सहानुभूती मिळेल, असा संबंधित पक्षांचा कयास असला तरीही त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. नागरिक या आरोप-प्रत्यारोपांना आता कंटाळले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार पाडून महायुतीचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात काय फरक पडला, याचा विचार विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनीही केला पाहिजे. जनता आपल्या कुवतीनुसार त्याचा विचार करणारच आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT