Narendra Modi and Utpal Parrikar Sarkarnama
विश्लेषण

मनोहर पर्रीकरांचे पुत्र बंडाच्या तयारीत; भाजपला थेट धमकीवजा इशारा

पुढील काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीआधी गोवा भाजपला मोठा धक्का भाजपला आहे.

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यात (Goa) पुढील काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी पक्षाला थेट धमकी दिली आहे. पक्षाने तिकिट नाकारल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा जाहीर इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते तसेच, संरक्षण मंत्रीही होते. त्यांच्या मृत्यूने गोव्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. पर्रीकर हे तब्बल 25 वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. आता मतदारसंघावर त्यांचे पुत्र उत्पल यांनी दावा सांगितला आहे. त्यांनी यासाठी पक्ष नेतृत्वाला थेट धमकीवजा इशारा दिला आहे. यामुळे गोवा भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पणजीच्या जागेवर सध्या बाबूश मोन्सेरात आहेत. मोन्सेरात यांनी 2017 मध्ये विधानसभा निवडणूक तेथून लढवली होती परंतु, त्यांचा पराभव झाला होता. नंतर 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या 10 नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नंतर पर्रीकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांनी पणजीवर विजय मिळवला होता. ते आता जागेवर पुन्हा दावा सांगत आहेत. याला उत्पल पर्रीकर यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे त्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करीत पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे.

उत्पल पर्रीकर म्हणाले की, पणजीमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आधीच मी पक्ष नेतृत्वासमोर व्यक्त केली आहे. तेथून मला तिकिट मिळेल, याची मला खात्री आहे. मनोहर पर्रीकर यांना आयुष्यात प्रत्येक गोष्ट सहजपणे मिळाली नव्हती. मलाही या गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. पक्षाने मला तिकिट न दिल्यास मला कठोर निर्णय घ्यावा लागेल. माझ्यावर प्रत्यक्ष अशी वेळ येईल त्यावेळी मी जनतेचे ऐकेन.

दरम्यान, भाजपचे नेते विश्वजित कृष्णराव राणे यांनी पक्षाला रामराम करत नुकताच आम आदमी पक्षात (AAP) प्रवेश केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपकडून गोव्यात जोर लावण्यास सुरूवात करण्यात आली. यापार्श्वभूमीवर राणे यांच्यासोबत भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला आहे. गोव्यामध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. सत्ता परत मिळवण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरू आहे.

आता स्थानिक नेत्यांनी भाजपला झटका देण्यास सुरूवात केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच गोव्यात दाखल होत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यांच्या उपस्थितीत सट्टारी येथे झालेल्या कार्यक्रमात राणे यांनी आपमध्ये प्रवेश केला होता. राणे हे गोव्यातील स्थानिक नेते असून 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना पोरियम विधानसभा मतदारसंघातून तिकीटही दिले होते. पण काँग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT