Manoj Jarange Patil Mumbai protest : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला अडचणीत आणणारा निर्णय सोमवारी घेतला. राज्यात गणेशोत्सवाच्या धामधुमीत त्यांनी मुंबईत येऊ आंदोलनासाठी येऊ नये, असा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारमधील अनेक मंत्री करत होते. मुंबई पोलिसांनीही मागील आंदोलनाचे कारण तसेच कोर्टाचे आदेश सांगत त्यांना परवानगी नाकारली. पण जरांगे पाटलांनीही प्रतिडाव टाकला आहे.
मनोज जरांगेंनी आपण एकटेच मुंबईला जाणार असल्याचे सोमवारी जाहीर केले. त्यानुसार मंगळवारी ते दोन गाड्या, दोन अॅम्ब्युलन्ससह अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होतील. त्याआधी त्यांनी आता मी एकदाच जात असल्याने आताही परवानगी नाकारणार का, असा सवाल करत त्यांनी सरकारला अडचणीत आणले आहे. जरांगे यांनी मंगळवारी मुंबईकडे न येता मराठा बांधवांना आहे त्याठिकाणी थांबून राहण्याचे आवाहन केले आहे.
मनोज जरांगे यांच्या मुंबईतील मागील आंदोलनावेळी लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले होते. त्यामुळे आझाद मैदान परिसरातील प्रमुख रस्ते बंद होते. रेल्वे स्थानक, बस स्थानकांसह अनेक रस्त्यांवर मराठा बांधवांची गर्दी झाली होती. या आंदोलनामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत असल्याचा दावा करत मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल झाली. त्यानंतर हायकोर्टाने आंदोलनाबाबत कडक भूमिका घेतली होती. याचदरम्यान सरकारकडून बोलणी सुरू असताना त्यातून मार्ग निघाला अन् जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतले.
आता पुन्हा एकदा आपली फसवणूक होत असल्याची भावना व्यक्त करत जरांगे पाटील आक्रमक झाले आहे. आता हे आंदोलन शेवटचे, असे म्हणत त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. मात्र, यापूर्वी त्यांनी आंदोलनाला मागितलेली परवानगी पोलिसांनी विविध कारणे देत नाकारली होती. यामध्ये गणेशोत्सवाचे प्रमुख कारण मानले जात आहे. मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनीही गणेशोत्सवात विघ्न नको, असे आवाहन केले होते. यापार्श्वभूमीवर जरांगेंनीही एक पाऊल मागे घेत मराठा आंदोलकांना मुंबईत न येण्याचे आवाहन केले आहे.
मनोज जरांगे काही मोजक्या सहकाऱ्यांसह मुंबईत जाऊन आंदोलन करणार असतील तर त्यांच्या आंदोलनाला सरकार परवानगी देणार का, याबाबत आता उत्सुकता आहे. हे करताना जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोपही केले आहेत. सणाच्या आडून मराठ्यावर वार केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मराठ्यांवर दंगलीचा डाग लागावा, असा सरकारचा डाव असल्याचा ते म्हणाले आहे. त्यासाठी तोडीस तोड उत्तर म्हणून मी एकटा पुढे जात असल्याचे जरांगेंनी म्हटले आहे.
जरांगे पाटील एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी सरकारला थेट आव्हानच दिले आहे. मी एकटा जात आहे, आता परवानगी नाकारणार का? असा सवाल करत त्यांनी फडणवीसांची कोंडी केली आहे. परवानगी नाकारल्यास करोडो मराठे विनापरवनगी मुंबईत येतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. हे पोलिसांसह राज्य सरकारलाही परवडणारे नाही. गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याचे सरकारचे काम आहे.
जरांगे जर एकटे मुंबईत येणार असतील, तर त्यांच्या परवानगीवर सरकारला निर्णय घ्यावा लागेल. एवढेच नाही तर आझाद मैदानात उपोषण सुरू झाल्यानंतर सरकारवरील दबावही वाढणार आहे. कारण हे उपोषण लांबत गेल्यास मराठा बांधवांच्या गाड्या मुंबईच्या दिशेने रवाना व्हायला वेळ लागणार नाही. जरांगे पाटील यांनी तसा इशाराच दिला आहे. त्यामुळे त्यांचा एकटेच मुंबईला जाण्याचा निर्णय सरकारची चोहोबाजूने कोंडी करणारा ठरू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.