Maoist leader Bhupati surrendered  Sarkarnama
विश्लेषण

Bhupati Surrender: फडणवीसांना वाटलं असेल भूपती शरणागती पत्करायला आला की मंत्रिपदाची शपथ घ्यायला?

Bhupati surrendered in presence of Devendra Fadnavis: पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दोन-पाच वर्षे आराम केल्यानंतर याच भूपतीने राजकीय वाटचाल सुरू केल्यास आश्चर्य वाटायला नको. तो पुढचा खासदार किंवा आमदार असेल,

सरकारनामा ब्यूरो

मिलिंद मधुकरराव उमरे

माओवाद्यांचा म्होरक्या भूपतीने नुकतीच गडचिरोलीमध्ये शरणागती पत्करली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यानंतर अन्य भागांमध्येही माओवाद्यांचे म्होरकेही शरण आले आहेत. मात्र, त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये शरणागती असा उल्लेख करण्याऐवजी ते शस्त्रत्याग म्हणत आहेत. त्यामुळे या माओवादी म्होरक्यांच्या शरणागतीचा योग्य अन्वयार्थ लावण्याची गरज आहे.

तथाकथित सर्वहारा क्रांतीच्या नावाखाली जवळपास साडेचार दशके शस्त्र हाती घेऊन अनेकांचे प्राण घेणारा, आपल्या चलाखीमुळे माओवादी चळवळीचा मेंदू अशी प्रसिद्धी असलेला माओवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य तथा सर्वोच्च नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनूदादा १५ ऑक्टोबर रोजी सरकारला शरण आला.

गडचिरोलीत भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष शस्त्रासह त्याने औपचारिक शरणागती पत्करली. त्याच्यासोबत त्याचे ६० सहकारीही शस्त्र त्यागून शरण आले. जवळपास ४५ वर्षांहून अधिक एक विशिष्ट (खरेतर विनाशक आणि विखारी) विचारसरणी स्वीकारणाऱ्या भूपतीला उपरती कशी झाली किंवा त्याच्या या एकदमच यूटर्न घेतलेल्या भूमिकेचा नेमका अन्वयार्थ काय, हे शोधणे थोडे जिकरीचेच आहे. विशेष म्हणजे भूपतीच्या शरणागतीने माओवादी चळवळीत शरणातीची लाट आणली आहे.

या घटनेच्या बातमीची शाई वाळत नाही तोच म्हणजे १७ ऑक्टोबरला लगतच्या छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य रूपेश उर्फ सतीश, भास्कर उर्फ राजमन मंडावी, रनिता, राजू सलाम, धन्नू वेट्टी उर्फ संटू आणि रतन एलम या जहाल म्होरक्यांसह तब्बल २१० माओवाद्यांनी शरणागती पत्करत १५३ शस्त्रे सरकारकडे दिली व संविधान हाती घेत लोकशाहीचा भाग होण्याचे मान्य केले.

आता दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या सचिवपदी असलेला माडवी हिडमा आणि केंद्रीय समितीचा महासचिव देवजी (खरेतर शरण आलेल्या रूपेशने सध्या महासचिव पदावर कुणाचीच नियुक्ती झाली नसल्याचे सांगितले आहे.) हे दोघेही शरणागतीच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. असे झाले तर मुप्पला लक्ष्मणराव उर्फ गणपती हाच एकच बडा नेता चळवळीत एकटा उरेल की काय, अशीही शंका उपस्थित होत आहे.

फसगत कुठे झाली?

कार्ल मार्क्स याने लिहिलेल्या ‘दास कॅपिटल’ या ग्रंथाने जगाला भुरळ घातली. भांडवलशाहीमुळे मुठभर लोकांच्या हाती एकवटलेली संपत्ती आणि सत्ता यातून निर्माण झालेला ‘आहे रे’ वर्ग आणि त्यापासून वंचित राहिलेला मोठ्या संख्येतील ‘नाही रे’ वर्ग यांच्यात वाढत जाणारी विषमतेची दरी मानवी विनाशाला कारणीभूत ठरते, हे मार्क्सच्या विचारांचे सार. ही दरी सांधण्यासाठी क्रांतीची गरज त्याने व्यक्त केली. पुढे मार्क्सच्या साम्यवादाचे प्रयोग व्लादिमिर लेनिनने रशियात, तर माओ झेडाँगने चीनमध्ये केले. त्यातही क्रांतीचा जन्म बंदुकीच्या नळीतून होतो, हे लाडके तत्त्वज्ञान असलेला माओ डाव्यांना अधिकच भावत गेला.

साम्यवादाच्या पोथ्या वाचणारे डावे पक्ष माओ-लेनिनच्या प्रचंड प्रेमात होते. पश्चिम बंगालच्या नक्षलबारी गावात १९६७मध्ये झालेला उठाव, त्याचे नेतृत्व करणारे चारू मजूमदार, कनू सन्याल, जंगल संथाल. इथून नक्षलवादाचा जन्म होत पुढे त्याने माओच्या रक्तरंजित तथाकथित क्रांतिप्रेमाचे बिभत्स दर्शन घडवत दंडकारण्याचा संपूर्ण भाग व्यापत माओवादाचे उग्र रूप घेतले.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या पुस्तकात मार्क्सच्या साम्यवादापेक्षा तथागत भगवान गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान किती सरस आहे, हे सप्रमाण सिद्ध केले. तरीही या देशातील अठरापगड जातींची वीण, इथले सांस्कृतिक पर्यावरण अजिबात समजून न घेता केवळ वर्गकलहावर आधारलेले मार्क्सचे तत्त्वज्ञान सरसकट किंवा बंदुकीच्या जोरावर लादण्याचा प्रयत्न होत राहिला.

माओवाद्यांच्या फसव्या क्रांतीवर भाळून वयाच्या १२व्या वर्षीच चळवळीत गेलेला आणि वर्षभरापूर्वी शरणागती पत्करलेला हरियानाचा असीन राजाराम भूपतीच्या शरणागती सोहळ्यात होता. त्याने माध्यमांशी बोलताना म्हटलेली काही वाक्ये माओवाद्यांची नेमकी फसगत कुठे झाली, हे स्पष्ट करतात. तो म्हणाला की, ‘‘मी गडचिरोलीत असताना पेसा कायदा, वनहक्का कायदा आणि पाचवी-सहावी अनुसूची वाचली, तेव्हा कळले की आम्ही ज्या हक्कांसाठी लढत आहोत, ते तर संविधानाने आधीच दिले आहेत. सर्वसमावेशक संविधान व संवैधानिक व्यवस्था असतानाही हीच व्यवस्था उलथून टाकण्याचा प्रयत्नात माओवादाचा पाय अधिकाधिक खोलातच जात राहिला.’

गडचिरोलीतील माओवादाची बिजे

भूपतीने फसव्या क्रांतीच्या नादात कोंडापल्ली सीतारामय्या यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स वॉर ग्रुप’ ते भाकप (माओवादी) या संघटनेच्या उभारणीत आणि गडचिरोली जिल्ह्यातही हिंसक बिजे रुजवण्यात फार मोठा हातभार लावला. तत्कालीन संयुक्त आंध्र प्रदेशच्या करीमनगर जिल्ह्यात पेदापल्ली गावात स्वातंत्रसैनिक शिक्षकाच्या घरी जन्मलेल्या भूपतीने उच्च शिक्षण घेतल्यानंतर मोठा भाऊ मल्लोजुला कोटेश्वरराव उर्फ किशनजी याच्यासोबत ‘पीपल्स वॉर ग्रुप’मध्ये प्रवेश केला.

गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यात १९८०च्या दशकात हे दोघे भाऊ दाखल झाले. त्याच काळात सिरोंचाचे पहिले दलम भूपतीच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आले. त्यानंतर अहेरी, ऐटापल्ली आणि भामरागड दलमची स्थापनाही त्याच्याच मार्गदर्शनाखाली झाली. त्याने याच संघटनेत असलेल्या विमला सिडाम उर्फ तारक्कासोबत लग्न केले. कमलापूरचे माओवाद्यांचे देशातील पहिले अधिवेशनसुद्धा भूपती आणि त्याचा मोठा भाऊ किशनजीच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. १९९७नंतर किशनजीला पश्चिम बंगालमध्ये पाठवण्यात आले.

मात्र, भूपती दंडकारण्यात सक्रिय राहिला. या सगळ्या काळात असंख्य हिंसक घटना, घडामोडी घडत राहिल्या. २००४मध्ये स्थापन झालेल्या माओवाद्यांच्या नव्या संघटनेतही भूपतीला माओवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्य आणि पॉलिट ब्युरोच्या सदस्यपदी नेमण्यात आले. किशनजी पश्चिम बंगालमध्ये चकमकीत ठार झाल्यानंतरही १४ वर्षे भूपती माओवादी संघटनेत सक्रिय राहिला.

आणि भूमिका बदलली...

सख्ख्या मोठ्या भावाचा चकमकीत जीव गेल्यानंतरही भूपतीने शस्त्र कायम सोबत ठेवले. पण काळ बदलत चालला होता. सुरक्षा यंत्रणा माओवादी चळवळीतील प्यादे, घोडे, उंट, हत्ती, वजीर सगळ्याच सोंगट्या टिपत गेले. आता हा सशस्त्र संघर्ष अशक्य असल्याचे लक्षात येताच दोन महिन्यांपासून भूपतीनं युद्धबंदीची भाषा आणि शांतता चर्चेची आर्जवे सुरू केली होती. खरेतर पोलिस चकमकीत मारला गेलेला नंबाला केशव राव उर्फ बसवराजू याने हा सल्ला आधीच दिला होता. पण तो तेव्हा मानला गेला नाही, असे शरणागत माओवादी आता सांगत आहेत. भूपतीची शस्त्रांची भाषा शांतता चर्चेत बदलण्यापूर्वीच पत्नी तारक्काने २०२५च्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे शरणागती पत्करली.

चक्रावणारं वर्तन

शरणागतीच्या सोहळ्यात भूपतीचे नाव उच्चारले गेले, तेव्हा त्याचा प्रवेश फिल्म फेअर अवार्ड सोहळ्यातील अभिनेत्यासारखाच वाटत होता. अतिशय निर्धास्त, निश्चिंत, हसतमुख आणि प्रचंड आत्मविश्वासपूर्ण असा वावर तो शरणागती पत्करत असल्याचा मागमूसही लागू देणारा नव्हता. मध्यम उंची, सडपातळ, पण काटक शरीर आणि प्रसन्न चर्येतील भूपतीने अगदी उत्साहात हस्तांदोलन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अशा पद्धतीने संवाद साधला की जणू त्यांची फारच जुनी ओळख असावी.

क्षणभर बुचकळ्यात पडून मुख्यमंत्र्यांनीही विचार केला असेल की, हा भूपती नेमका शरणागती पत्करायला आला आहे की, मंत्रिपदाची शपथ घ्यायला? त्याचा मंचावरील वावर सर्वांनाच चक्रावणारा होता. आपण ज्या विचारांवर साडेचार दशकांहून अधिक काळ वाटचाल केली त्याचा त्याग केला आहे, आपणच उभारलेले मोठे केलेले दलम संपले, सहकारी मारले गेले, आपल्या हातून शेकडो निरपराधांचे प्राण गेले, या कशाचाही पश्चाताप किंवा शरणागत झाल्याने अपराधबोध किंवा पराभवाची उदासीनता हे काही म्हणजे काहीच त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते.

शरणागती नाही, शस्त्रत्याग

भूपतीसह अनेक माओवादी नेते सरकारला शरण येत असले, तरी त्यांची वक्तव्ये ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ही गोष्ट ती म्हणजे या प्रकाराला सरकार शरणागती मानत असले, तरी हे शरणागत माओवादी त्याला फक्त शस्त्रत्याग मानत आहेत. भूपती महाराष्ट्रात शरण आल्यानंतर तिकडे छत्तीसगडमध्ये शरणागती पत्करणारा माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य रूपेश उर्फ सतीश व भास्कर उर्फ राजमन मंडावी यांनी माध्यमांशी केलेली बातचीत काळजीपूर्वक अभ्यासली, तर त्यांची वक्तव्य लक्षात येतील.

ते म्हणतात की, ‘आम्ही फक्त शस्त्र सोडून जनतेत रहायला आलो आहोत. आता जनतेमध्ये राहून संवैधानिक मार्गाने जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू.’ वरवर हा संविधानाप्रतीचा विश्वास वाटत असला, तरी इतक्या वर्षांपासून त्यांच्या मनात घट्ट रूतून बसलेला माओवादी विचार इतक्यात नष्ट होईल, असे समजणे चूक ठरेल. माओवादी अगतिक शरणार्थी म्हणवून घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनोभूमिकेचा नीट अभ्यास करायला हवा.

राजकीय वाटचाल शक्य

भूपतीच्या शरणागती सोहळ्यातील त्याचा मंचावरचा वावर, उपस्थित गर्दीतून त्याला मिळणारा प्रतिसाद, त्याच्यासाठी वाजणाऱ्या टाळ्या त्याची लोकप्रियता आणि जनसमूहावर मोहिनी घालण्याची क्षमता सिद्ध करते. देशाच्या दक्षिण भागात तर दाक्षिणात्य वृत्तवाहिन्यांनी त्यावरच्या वृत्तांचा पूर आणला होता. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दोन-पाच वर्षे आराम केल्यानंतर याच भूपतीने राजकीय वाटचाल सुरू केल्यास आश्चर्य वाटायला नको. तो तेलंगण किंवा आंध्र प्रदेशातील पुढचा खासदार किंवा आमदार असेल, असेही काही राजकीय अभ्यासक आतापासूनच सांगू लागले आहेत. आपल्या रक्तरंजित पापांचा अजिबात पश्चाताप नसलेला भूपती बोलूनचालून अनेक जीव घेणारा एक गुन्हेगार आहे, हे लक्षात ठेवायला हवे.

माओचे इंग्रजी दुभाषी सिडनी रिटेनबर्ग यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, ‘माओ हा इतिहासातील एक महान नेता असला तरी, तो एक महान गुन्हेगारदेखील होता.’ माओ आणि भूपतीची तुलना होऊच शकत नसली, तरी हिंसेचं आकर्षण आणि समर्थन ही दोघांतील साम्यस्थळे आहेत. म्हणून त्याच्या आताच्या अहिंसक रूपामध्ये खोल कुठे हिंसा तर दडलेली नाही ना, हे शोधूनच त्याच्या बदललेल्या भूमिकेचा अन्वयार्थ लावता येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT