Maratha Reservation News Sarkarnama
विश्लेषण

Maratha Reservation Special : लढा मराठा समाजाचा @जालना : अंतरवाली सराटीत ठिणगी, वणवा मात्र महाराष्ट्रात... भाग - १

Marathwada : तीन हजार लोकसंख्येच्या गावात सुरू झालेल्या या आंदोलनाची दखल देशभरातील माध्यमांना घ्यावी लागली.

Jagdish Pansare

Maratha Reservation News : केवळ राज्यातच नाही, तर देशभरात सध्या अंतरवाली सराटी गावाची चर्चा सुरू आहे. (Maratha Protest) मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील नावाच्या सडपातळ शरीरयष्टी असलेल्या तरुणाने दहा दिवसांपूर्वी आपल्या ८ सहकाऱ्यांना सोबत घेत मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्यांसाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला.

मंगळवार, दि. २९ ऑगस्ट हा तो दिवस. गावातील मारुती मंदिराच्या समोर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली. (Maratha Reservation) मधुकर भीमराव मापारी (वय ५९, रा. वाळकेश्वर), अर्जुन नामदेव काटकर (वय ४७, रा. पाथरवाला बु.), महेश मारुती खोजे (वय २३, रा. तीर्थपुरी), गंगूबाई दत्तात्रय तारख (वय ७०, रा. अंतरवाली सराटी), संभाजी पांडुरंग गव्हाणे (वय ३८, रा. वडीकाळ्या), विशाल दत्तात्रय झांजे (वय २८, रा. अंतरवाली सराटी), प्रकाश जगन्नाथ सोळुंके (वय ४४, रा. पाथरवाला बु.) यांची त्यांना साथ मिळाली.

सत्तर वर्षांच्या गंगूबाई तारख यांचा उत्साह आणि समाजासाठी काही करण्याची मनात पेटलेली धग बाहेर पडायला सुरूवात झाली. (Jalna) जरांगे आणि त्यांच्या साथीदारांच्या आमरण उपोषणाची माहिती वाऱ्यासारखी आसपासच्या गावांत पोहचली. (Marathwada) लोकांची पावले अंतरवाली सराटीकडे वळू लागली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची ठिणगी पडली होती, पण त्याचा वणवा संपूर्ण राज्यात पेटेल अशी अपेक्षा कुणी केली नव्हती.

या आठ दिवसांत अशा काही घडामोडी घडल्या, की तीन हजार लोकसंख्येच्या गावात सुरू झालेल्या या आंदोलनाची दखल देशभरातील माध्यमांना घ्यावी लागली. जेमतेम सहाशे कुटूंब असलेल्या आणि जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यापासून २५ किमी अंतरावर असलेल्या अंतरवाली सराटीने इतिहास घडवला. आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत बसलेल्या सत्ताधाऱ्यांना याची दखल घ्यावी लागली.

...अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

मुख्यमंत्री कार्यालयाच्या एका प्रतिनिधीने उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र आम्हाला आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय हवा, अशी भूमिका जरांगे पाटील यांच्यासह आंदोलनकर्त्या महिलांनी घेतली आणि हे आंदोलन उग्र रुप धारण करणार याची चाहूल प्रशासनालाही लागली. उपोषणकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, हे लक्षात आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

पण लोकांचा वाढता पाठिंबा, समाजाचे लागलेले लक्ष आणि वाढलेल्या अपेक्षा, आता नाही तर कधीच नाही याचा विचार करत जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरूच राहणार, असे मुख्यमंत्र्यांनाही सांगून टाकले. प्रशासन आणि थेट मुख्यमंत्र्यांनी अंतरवाली सराटीतील आंदोलनाची दखल घेतल्यानंतर जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला. लोकांचे जत्थे अंतरवाली सराटीकडे येऊ लागले आणि या ठिणगीचा आता वणवा होणार हे स्पष्ट झाले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT