विश्लेषण

भंडारा-गोंदिया लोकसभा लढण्यावर काँग्रेस ठाम

सरकारनामा ब्युरो

नागपूर : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा करून दोन दिवस उलटत नाही तोच काँग्रेसने विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठवून तेथील अहवाल देण्यास सांगितले आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे या मतदारसंघावर दावा करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सक्रिय झाले आहेत. जागा वाटपाच्या सूत्रानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. खासदारकीचा राजीनामा देऊन नाना पटोले काँग्रेसमध्ये आल्याने या मतदारसंघावर आता काँग्रेसने दावा केला आहे. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियात पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यात पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.

पटेल यांच्या स्पष्टोक्तीनंतर काँग्रेसमधील हालचालींना वेग आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना तात्काळ नागपूरला पाठविले. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांची त्यांनी नागपुरात बैठक घेतली. या बैठकीला आमदार गोपाल अग्रवाल (गोंदिया) यांच्यासह भंडारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रेम गणवीर, माजी मंत्री बंडू सावरबांधे आदी उपस्थित होते. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसला अनुकूल वातावरण असून पक्षाने ही संधी सोडू नये, अशी भूमिका या नेत्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांसमोर मांडल्याचे समजते. 

यामुळे भंडारा-गोंदिया मतदारसंघावरील हक्क काँग्रेस सोडणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून आपण हा अहवाल प्रदेशाध्यक्षकडे सोपवू, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT