विश्लेषण

विदर्भवाद्यांचे तिसऱ्या मोर्चाशी गुफ्तगू : श्रीहरी अणेंची योगेंद्र यादव यांच्याशी चर्चा 

सरकारनामा ब्युरो

नागपूर : काँग्रेस व भाजपला समान अंतरावर ठेवत येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या मोर्चाशी आघाडी करण्यासाठी विदर्भवादी तयार झाले आहेत. या संदर्भात विदर्भवादी नेते व राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी आज स्वराज्य अभियानचे संयोजक योगेंद्र यादव यांच्याशी नागपुरात चर्चा केली.

यावेळी स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनासोबत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत करावयाच्या आघाडीबाबतही चर्चा करण्यात आली. यात काँग्रेस व भाजपसोबत कोणतीही आघाडी करावयाची नाही, याबाबत एकमत झाले. देशात काँग्रेस व भाजपला दूर ठेऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न डाव्या पक्षांतर्फे सुरू झाला आहे. या डाव्या आघाडीशी संधान बांधण्यावरच या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. विदर्भात काँग्रेस व भाजप विदर्भवाद्यांशी आघाडी करणार नाही, हे उघड असल्याने तिसऱ्या आघाडीचा पर्याय निवडल्याचे सांगण्यात येते. 

योगेंद्र यादव या चर्चेसाठी येथे आलेले असल्याचे समजते. या आघाडीत आता किती पक्ष सामील होणार आहे. याबद्दल मात्र अद्यापही काहीही स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विदर्भवाद्यांना फारसे यश मिळाले नाही. यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विदर्भवाद्यांचे उमेदवार कितपत प्रभावी राहतील, हा प्रश्‍नही आता उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT