Marathvada Coach Factory  Sarakarnama
विश्लेषण

Marathwada Railway Coach Factory News : मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन; भाजपला मतांची गॅरंटी देणार का?

Jagdish Pansare

Latur News : मराठवाड्यातील लातूर येथे चार वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या रेल्वे कोच फॅक्टरीच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त लागला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंगळवारी (ता. 13) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आॅनलाईन पद्धतीने लातूरच्या रेल्वे फॅक्टरीचे उद्घाटन होणार आहे. या रेल्वे कोच फॅक्टरीच्या माध्यमातून मराठवाड्यातील तरुण, उद्योजकांनी अनेक स्वप्न रंगवली होती.

भूमिपूजन आणि त्यानंतर वर्षभरात लातूरजवळ या रेल्वे कोच फॅक्टरीची उभारणी करण्यात आली. पण प्रत्यक्षात कोच निर्मितीसाठी मात्र चार वर्ष वाट पहावी लागली. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर प्रत्यक्षात डबे निर्मिती सुरू होईल का? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून या कोच फॅक्टरीच्या रखडलेल्या उद्घाटनावरून भाजपला लक्ष्य केले जाण्याची शक्यता होती. (Marathwada Railway Coach Factory News)

एकीकडे मोदी गॅरंटीवर भाजपच्या प्रचाराचा सगळा डोलारा उभा असतांना चार वर्षापासून लातूरच्या रेल्वे कोच फॅक्टरीत एकही डबा तयार झाला नाही, याचा जाब विरोधकांकडून विचारला जाणार होता. पण त्याआधीच भाजपने रेल्वे कोच फॅक्टरीच्या उद्घाटनाचा घाट घातला. त्यामुळे हे उद्घाटन भाजपला लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून किती मतांची गॅरंटी मिळते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

परंतु या निमित्ताने भाजपने पुन्हा एकदा मास्टर स्ट्रोक लागवत विरोधकांचा डाव उलटवून लावला आहे. मराठवाडा रेल कोच फॅक्टरीचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 25 डिसेंबर 2020 रोजी पहिला कोच शेल तयार करण्यात आला होता. हा अत्याधुनिक कारखाना भारतीय रेल्वेसाठी स्वयं-चालित गाड्या तयार करण्यासाठी फक्त दोन वर्षात उभारण्यात आला होता. या कारखान्याची मुहूर्तमेढ फेब्रुवारी 2018 मध्ये रोवण्यात आली होती.

रेल्वे मंत्रालयाने हा प्रकल्प रेल विकास निगम लिमिटेड आरव्हीएनएलला सोपवला होता. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने फेब्रुवारी 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लातूरजवळ जमीन देण्यास मंजुरी दिली आणि तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्या हस्ते कारखान्याचे भूमिपूजन झाले. डिसेंबर 2018 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

पहिल्या कोच शेलमधून बाहेर पडल्याने हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पासाठी 497.47 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या प्रकल्पावर केवळ लातूरच नाही, तर मराठवाड्यातील छोटे-मोठे उद्योग मोठ्या आशेने पाहत आहेत. यातून रेल्वे कोच फॅक्टरी आणि त्यावर आधारित उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगार मिळण्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. त्यामुळे रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन कधी होणार याकडे विरोधकांचेही लक्ष लागले होते.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT