Social Media Politics  Sarkarnama
विश्लेषण

Social Media: वाचाळ आमदारांची चलती, सामाजिक सलोख्यालाही नख लावण्याचे प्रकार

Political leader News: फडणवीसांनी आमदार भातखळकरांना सुनावले होते, त्यामुळे अपेक्षा वाढल्या होत्या

अय्यूब कादरी

सोशल मीडिया दुधारी हत्यार बनले आहे. याद्वारे जितक्या चांगल्या गोष्टी करतात त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक वाईट गोष्टी यावरून सुरू असतात. याला भले भले बळी पडले आहेत. राजकीय नेतेही यातून सुटले नाहीत. विरोधकांची बदनामी करण्यासाठी याचा काही वर्षांपूर्वी वापर सुरू करण्यात आला. आता तो प्रचंड वाढला आहे. गेल्यावर्षी एका आमदारानेच दुसऱ्या आमदारासाठी सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला होता.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी छगन भुजबळ यांचा मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला होता. प्रकरण सभागृहात गेले होते. भुजबळ त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. जयंत पाटील यांनी याकडे लक्ष वेधत कारवाईची मागणी केली होती.

राजकीय नेत्यांनी अशा गोष्टी करू नयेत, असे म्हणत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराबाबत असहमती दर्शवली होती. त्यामुळे फडणवीस यांची प्रतिमा उंचावली होती. मात्र आता त्यांचे शिलेदार इतके मोकाट सुटले आहेत की आभासीच नव्हे तर खऱ्याखुऱ्या जगातही ते विरोधकांचा, समाजाचा आणि अधिकाऱ्यांचा उपमर्द करू लागले आहेत, त्यांची बदनामी होईल अशी कृत्ये जाणीवपूर्वक करू लागले आहेत. आता फडणवीसही हतबल झाले आहेत की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सोशल मीडियावर वादग्रस्त, असंसदीय भाषेत विरोधकांवर टीका करण्यात आमदार भातखळकर हे आघाडीवर असतात. असे समजूया की त्यांचे सोशल मीडिया हँडल ते स्वतः ऑपरेट करत नसतील, असे असले तरी त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही. विरोधकांवर संयमी, संसदीय भाषेत टीका करता येते, हे राजकीय नेते गेल्या काही वर्षांपासून विसरून गेले आहेत. आमचे राजकीय मतभेद आहेत, मात्र मनभेद नाही, असे राजकीय नेते आधी म्हणायचे. त्यात तथ्यही असायचे. आता चोहीकडे मनभेद दिसून येतात. सामाजिक सौहार्दाचा धागा तर विस्कटलेलाच आहे, राजकीय सौहार्दही संपुष्टात आले आहे. पक्ष, नेत्याच्या प्रती निष्ठा दाखवण्यासाठी काही आमदार निव्वळ ट्रोलसारखे वागत आहेत. ट्रोल ही जमातही काही वर्षांपासून उदयास आली आहे. त्याची पाळेमुळे सर्वच पक्षांत, रुजली आहेत. सुरुवातीला ही भाजपची मक्तेदारी होती, ती आता संपुष्टात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मते मळवण्यासाठी काही राजकीय नेते आता एखाद्या समाजालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत. ऑक्टोबर महिन्यात कराड येथे एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. त्यात जखमी झालेल्या पती-पत्नीचा काही दिवसांनी मृत्यू झाला होता. बॉम्बस्फोट झाला ते ते घर मुस्लिमाचे होते, त्यामुळे संशय घेण्यासाठी तेवढे पुरेसे होते. मग सबुरीने घेतील त्यांना नितेश राणे कसे म्हणायचे... त्यांनी कराड येथे जाऊन हा बॉम्बस्फोट असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार असल्याचेही सांगितले. हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी फोरेन्सिक लॅबचा अहवाल आला. तो स्फोट गॅस सिलिंडरचाच होता, असे त्या अहवालात नमूद केले होते. नितेश राणे शांत, फडणवीस शांत आणि विरोधकही शांत..! केवळ ती व्यक्ती मुस्लीम असल्याने बेछूट आरोप करणाऱ्या आमदाराबद्दल विरोधी पक्षही शांतच राहिले.

कलेक्टर दारू पीत बसला होता की, अधिकारी शेण खात होते... हे काही पानटपरीवर एखाद्याने उच्चारलेले वाक्य नाही. हे बोल आहेत माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचे त्यांच्या तालुक्यात दुष्काळ का जाहीर झाला नाही, असे लोक त्यांना विचारताहेत म्हणे. त्यामुळे चिडून त्यांनी अशी भाषा वापरल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशी भाषा वापरून काय साध्य होते?

अधिकारी, कर्मचारी चुकले असतील तर कायदेशीर मार्गाने त्यांना शिक्षा देता येते. तरीही काही आमदार असा आक्रस्ताळेपणा करत लोकांसमोर मर्दुमकी गाजवल्याचा आव आणतात. या दोन्ही प्रकरणांत फडणवीस मूक प्रेक्षक बनून राहिले. गेल्यावर्षी छगन भुजबळ यांच्या प्रकरणात आपले मत व्यक्त करून त्यांनी अपेक्षा उंचावल्या होत्या. त्यांची पूर्तता करण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत. ईव्हीएम यंत्रावर विरोधकांनी संशय घेतला की भाजपचे आमदार चवताळून उठतात. विरोधकांवर एकेरी, खालच्या भाषेत टीका करतात. या ईव्हीएमवर पहिल्यांदा शंका घेणारे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते होते. डेमॉक्रमसी अॅट रिस्क या नावाचे पुस्तकच जीव्हीएल नरसिम्हाराव यांनी लिहिले होते. त्या पुस्तकाचे प्रकाशन लालकृष्ण अडवानी यांच्या हस्ते झाले होते, ही माहितीही नितेश राणे आणि अन्य आमदारांना कुणीतरी देण्याची गरज निर्माण झाली आहे.

(Edited by: Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT