विश्लेषण

गिरीश महाजन 'ढूँढते रह जाओगे'; धुळ्याची जनता जन्माची अद्दल घडवेल! 

सरकारनामा ब्युरो

पुणे: भारतीय जनता पक्षाने धुळे महानगरपालिका निवडणुकीचे अधिकार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवल्याने स्थानिक भाजप आमदार अनिल गोटे नाराज झाले आहेत. महाजनांनी विरोधकांनाच जवळ धरल्याने गोटे संतप्त झाले आहेत. त्यांनी महाजनांवर कडाडून टीका केली आहे. 

आपली भूमिका मांडण्यासाठी पत्र लिहणे, ही आमदार गोटेंची खासीयत आहे. यापद्धतीचे धुळेवासियांना उद्देशून लिहलेले पत्र त्यांनी सोशल मिडीयावर प्रसिद्ध केले आहे. त्या पत्रात मंत्री महाजन यांच्यावर नाव घेवून टीका करण्यात आली आहे. 

आ.अनिल अण्णा गोटेंचे धुळेकरांसाठी खास खुले पत्र: 

नमस्कार,
बर्‍याच दिवसांच्या गैरहजेरी नंतर मी आपणाशी संवाद साधत आहे. भाजपाच्या आज पर्यंतच्या धोरणा नुसार पालीका निवडणुकांची जबाबदारी त्या मतदारसंघाचे जे आमदार असतील त्यांच्या कडे सोपविली जाते. केवळ धुळ्याबाबत पक्षाने आपल्या धोरणात बदल घडविल्याची बातमी वृत्तपत्रातूनच आपणा प्रमाणेच मला कळाली. मुख्यमंत्र्यांचे संकट मोचक म्हणून प्रसिद्धी पावलेल्या गिरीश महाजनांनी जळगाव महापालीकेचे निकाल घोषीत होत असनाच आता मिशन 'धुळे महापालीका' अशी केलेली घोषणा माझ्या वाचनात आली. त्याच बरोबर ज्यांना भाजपाच्या तिकीटावर पालीकेची निवडणूक लढवायच्या असतील अशांना आपण पक्षात प्रवेश देवू व तिकीटही देवू, असेही त्यांनी म्हटले.

कुठलाही राजकीय पक्ष ही कुणा एकाची मक्तेदारी असत नाही. कार्यकर्त्यांच्या कष्टातून पक्ष , संघटना ऊभी रहाते. सर्वांचीच खर्च करण्याची आर्थीक क्षमता असूच शकत नाही. याचा अर्थ पक्षाच्या उभारणी करीता त्याचे योगदान कमी दर्जाचे ठरु शकत नाही. पक्ष संघटने करीता पैसे खर्च करणार्‍या धेनुवल्लभापेक्षा घरी अडचण सहन करुन कुटूंबाच्या पालन पोषणासाठी लागणार्‍या कष्टातील काही वेळ पक्षासाठी वेळ कष्ट खर्ची टाकणारा कार्यकर्ता केंव्हाही श्रेष्ठ ठरतो. त्याची किंमत करणे म्हणजे गरीब कष्ठाळू कार्यकर्त्याचा घोर अपमान करण्याचे पातक करणे होय !

अनेक पक्षातील उष्ट्या पत्रावरील अन्नाने पोट भरले नाही म्हणून मी राजकारणात आलेलो नाही. आयुष्यात विचारांशी तडजोड स्विकारुन कुठेच काही जमल नाही म्हणून बदमाषाचा शेवटचा मुक्काम म्हणूनही आलो नाही. मी एका लहान कार्यकर्त्यापासून स्वकष्टाखवर इथपर्यत पोहचलो आहे. कार्यकर्त्याच्या भावना काय असतात याची मला चांगली जाणीव आहे. 

अशा कार्यकर्त्याचे तुम्ही मेरीट तपासणार आहात? याद राखून ठेवा ज्या गुंड, बदनाम आणि बदमाष सुध्दा, काळबाजारकिंग, मटका, जुगाराचे अड्डे चालविणारे, वाळू माफीयांना जर प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न जरी केलात तर, ही धुळ्याची जनता आयुष्यभराची अद्दल घडवल्याशिवाय रहाणार नाही. धुळेकरांना जुना सडलेला, टाकावू माल नकोय ! ज्यांना कडेवर घेवून मिरवत आहात, त्यांच्यामुळेच श्री कदमबांडेंची वाट लागली. इतक्या टाकावू गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या कथीत नेत्यांबद्दल धुळेकर जनतेच्या मनात घृणा निर्माण झाली आहे म्हणूनच धुळेकर जनतेने मला तीन वेळा निवडून दिले . 
राष्र्टवादीसेनेत राहून जे माझ्याशी शत्रूत्व निभावू शकले नाही. अशा सर्वच राजकीय पक्षातील माझ्या विरोधकांना एकत्र आणून, पक्षात घेवून माझ्या विरोधाचा तुमचा व त्यांचा कंड शमवून घेत आहात या शिवाय माझ्या दृष्टीने तुमच्या या भाड्याच्या नवरदेवांना काही किंमत नाही.

लक्षात घ्या रावणाची सोन्याची लंका अन् बलाढ्य सेनेची निष्ठावान , एकनिष्ठ हनुमानाच्या सेनेने वाट लावली. अशीच निष्ठावान लहान लहान कार्यकर्त्यांची सेना सर्वांची वाट लावून बिवार्‍याला सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. 'ढुँढते रह जाअोगे'! मीच तिकीट देणार गरिबातील गरीब निष्ठावान जुन्या कार्यकर्त्यांना. बघू आता निष्ठावान भारी पडतात की, उष्ट्या पत्रावळीवर पोटभरणारे केवळ गाव विष्ठेवर जगणारे विष्ठावान ? तुम्हाला गुंड, बदमाष, पालिका लुटारु लखलाभ असोत !  माझे विचार आपणा समोर मांडले आहेत. तुम मानो या ना मानेा ! अखेर धुळेकर जनतेच्या कल्याणा करीता व गरीबातील गरीब निष्ठावान कार्यकर्त्याच्या भविष्यासाठी मला कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका.
'तुम मुझे ना चाहो तो कोई बात नही । तुम किसी गैरसे निभावोगे तो मुश्कील होगी'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT