Babanrao Lonikar, Raosaheb-danve, Ganesh Dudhgaonkar Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics : 'या' नेत्यांची दुसरी पिढी राजकारणात आजमावतेय नशीब; बोर्डीकर, दानवे यशस्वी तर...

Prasad Shivaji Joshi

Parbhani News: स्वतःचा राजकीय वारसदार राजकारणात स्थिरस्थावर व्हावा, अशी प्रत्येक राजकीय नेत्याची इच्छा असते. अतिशय परिश्रम घेऊन राजकीय क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केल्यानंतर हा राजकीय वारसा पुढील पिढीने यशस्विपणे सांभाळावा, यासाठी राजकीय नेते विशेष मेहनत घेतात.

यामुळे अनेकदा घराणेशाहीचा आरोप होतो. मात्र, ज्या ठिकाणी आमदार, खासदार जाऊ शकत नाहीत, त्या ठिकाणी त्यांच्या परिवारातील सदस्याने यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. त्यामुळे राजकीय नेत्याचे वारसदार तयार होतात.

परभणी जिल्ह्यातील रामप्रसाद बोर्डीकर हे मातब्बर नेतृत्व. जिंतूर तालुक्यातून पुढे आलेले रामप्रसाद बोर्डीकर यांनी थेट मुंबई बाजार समितीचे सभापतिपद मिळवले. काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व आता भाजप असा बोर्डीकर यांचा राजकीय प्रवास आहे. जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी नेतृत्वही केले आहे. त्यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिंतूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. वडिलांचा राजकीय वारसा त्या सांभाळत आहेत.

जालना जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तब्बल पाच वेळा लोकसभेत जालना लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनी २०१९ मध्ये भोकरदन विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. संतोष दानवे हे विधानसभेतील सर्वात तरुण आमदार आहेत. राजकीय वारसा दुसऱ्या पिढीला देण्यात रावसाहेब दानवे यशस्वी ठरले आहेत.

जिंतूर विधानसभा मतदारसंघात विजयी झालेले दिवंगत कुंडलिक नागरे यांचे पुत्र सुरेश नागरे हे काँग्रेस पक्षात असून, त्यांनी परभणी विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून नशीब आजमावले. मात्र, त्यांच्या पदरी निराशा आली. वडिलांच्या राजकीय वारसा पुढे नेता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी कंबर कसली आहे.

परभणी जिल्ह्यातील मातब्बर असलेल्या राजकीय नेत्यामध्ये माजी मंत्री अॅड. गणेश दुधगावकर हे महत्त्वाचे नाव. काँग्रेस पक्षातील निष्ठावंत असल्याने आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिपदही मिळाले. कालांतराने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व परभणी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवत खासदारही झाले.

मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे पुत्र समीर दुधगावकर यांनी विदेशात उच्च शिक्षण पूर्ण केले. भगवदगीतेचे अभ्यासक असलेल्या समीर यांनी राजकीय जीवनाची सुरुवात भारतीय जनता पक्षात प्रवेश करून केली. पक्षाच्या उद्योग आघाडीचे पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी म्हणून ते कार्यरत होते. मात्र, अद्यापही त्यांना सूर गवसलेला नाही.

पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार काँग्रेस पक्षाचे सुरेश वरपूडकर हे संपूर्ण परभणी जिल्ह्यात प्रभाव असणारे नेते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व पुन्हा काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. त्यांच्या स्नुषा प्रेरणा वरपूडकर यांनी पाथरी मतदारसंघात संपर्काची धुरा हाती घेतली आहे.

येणाऱ्या काळात सुरेश वरपूडकर यांचा राजकीय वारसा त्यांच्याकडेच असणार आहे. परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर हे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. परतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपद मिळवलेल्या राहुल लोणीकर मोठ्या यशासाठी मात्र प्रतीक्षेत आहेत.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT