Raj Thackeray Hindi opposition Sarkarnama
विश्लेषण

Raj Thackeray Hindi opposition : राज ठाकरेंचा 'हिंदी' भाषा विरोध भाजपच्याच पथ्यावर? फडणवीसांसोबतच्या गुप्त भेटीत ठरली स्क्रिप्ट?

MNS Raj Thackeray Hindi Opposition Linked to BJP Strategy for Non Marathi Voters in Mumbai : महायुती राज्य सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून तिसरी पर्यायी भाषा म्हणून हिंदीचा केलेल्या समावेशाला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विरोध केला आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra politics Hindi Marathi issue : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुती राज्य सरकारने शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेचा केलेल्या समावेशावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही, असा इशारा देताना, आता कोणत्या शाळेत हिंदी शिकवलं जात, हेच बघतो, असा दम देखील राज ठाकरेंनी भरला आहे.

पण राज ठाकरेंची शिक्षणातील हिंदी भाषा सक्तीविरोधात घेतलेली भूमिका भाजपची स्क्रिप्ट तर नाही ना? अशी आता चर्चा होऊ लागली आहे. यासाठी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची झालेली गुप्त भेटीचा संदर्भ दिला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यात सर्वात महत्त्वाची महापालिका म्हणजे, मुंबई (Mumbai) महापालिका! या महापालिकेवर भाजपला सत्ता हवी आहे. यासाठी भाजप वेगवेगळे राजकीय प्रयोग करतो आहे. लोकसभेत महाराष्ट्रात झालेल्या पिछेहाटनंतर विधानसभेपूर्वीच या प्रयोगांना वेग आला होता. विधानसभेला यश मिळाले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. यात यश मिळवण्यासाठी, त्यातल्या त्यात मुंबई महापालिका काबिज करण्याची भाजपची रणनीती आहे.

सध्या, महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे. तसे दोन्ही बंधू एकमेकांना टाळी देत आहेत. चाचपणी करत आहेत. हे दोन्ही बंधू एकत्र आल्यास मुंबईत महापालिकेत मतदानाचा टक्का वाढतो अन् सत्तेत बसतात, असा सर्व्हे देखील समोर आला आहे. या सर्व्हेत भाजप पण सत्तेजवळ दिसतोय. पण भाजपला (BJP) मुंबईत एकहाती सत्ता हवी आहे. मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी काही पण, अशीच भाजपची रणनीती, सध्या तरी दिसते.

केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. परंतु ती 'अनिवार्य' करायची की नाही, तो निर्णय राज्य सरकारने घ्यायचा आहे. राज्यातील महायुती सरकारने केंद्राचा हा निर्णय लागू केला होता. परंतु हिंदी भाषा 'अनिवार्य' केल्यानंतर महायुती सरकारवर चहू बाजूने टीका झाली. यानंतर अध्यादेशातून 'अनिवार्य' शब्द वगळण्यात आला. हिंदीला तिसरी 'पर्याय' भाषा म्हणून अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला.

भाजपची 'छुपी स्क्रिप्ट'

पण शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येकाच्या पाठ्यपुस्तकात हिंदी पुस्तक आलं. यावरून महायुती सरकारने हिंदी भाषा छुप्यापद्धतीने अभ्यासक्रमात घुसवली, अशी राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. महायुती सरकारच्या या छुप्या रणनीतीविरोधात विरोधकांनी जोरदार टीका केली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत, 'हिंदी भाषा सक्तीची कशी होते, तेच पाहतो', असा धमकीवजा इशारा महायुती सरकारला दिला. पण हा विरोध म्हणजे, भाजपची 'छुपी स्क्रिप्ट' असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

फडणवीस भेट अन् राज ठाकरेंचे 'हिंदी' टायमिंग!

हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा महायुती सरकारमधील भाजपने रेटून धरायचा आणि राज ठाकरे यांनी विरोध करायचा यातून हा मुद्दा पेटवत ठेवायचा असे दिसत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची आठवड्याभरापूर्वी झालेल्या गुप्त भेटीचा आणि तत्पूर्वी झालेल्या इतर भेटीचा संदर्भ यानिमित्ताने दिला जात आहे.

मुंबईतील मराठी मतदार भाजप, उद्धव ठाकरे आणि मनसे या तीन पक्षांमध्ये विभागला आहे. पण गुजराती मतदार हा भाजपसाठी हक्काची व्होटबँक आहे. प्रश्न राहतो तो उत्तर भारतीय मतांचा. ही मते मिळविण्यासाठीच भाजपने हिंदी भाषा शिकवण्याचा घाट घातला असल्याचे बोलले जाते.

भाजपने हिंदी भाषेच्या माध्यमातून उत्तर भारतीय मतांना आपलेसे करायचे, तर राज ठाकरे यांनी त्याला विरोध करून हा मुद्दा पेटत ठेवायचा. यातून उत्तर भारतीय मतदार आपसूकच भाजपकडे वळेल असे निरीक्षण नोंदवले जात आहे. केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधीश हिंदीचा पुरस्कार करणारे आहे, असे दाखवत मुंबईतील अमराठी मतदारांना आकर्षित करण्याची भाजपची ही रणनीती दिसते, असे राजकीय विश्लेषकांचे निरीक्षक आहे.

भाजपची 'दुघली' चाल

शिवाय उद्या ठाकरे बंधूंची युती झाल्यास, राज ठाकरे हिंदीला भाषाेला विरोध करतात, असे सांगून उद्धव ठाकरेंबरोबर असलेल्या अमराठी मतदारांना देखील तोडण्याचा छुपा अजेंडा भाजप राबवताना दिसते. त्यामुळे राज ठाकरे यांचा हिंदी भाषा विरोध हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही अडचणीचा मुद्दा झाल्याचे सांगितले जाते. हिंदी भाषा शिकविण्याच्या निर्णयावर अद्यापही उद्धव ठाकरे यांनी ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही.

30-35 लाख अमराठी मतदार

भाजपच्या या रणनीतीवर निरीक्षण नोंदवताना मुंबईतील अमराठी भाषिक मतदारांची संख्या पाहणं इथं महत्त्वाचं ठरतं. भाजपचा मुंबईतील बेस पाहिल्यास, मूळ व्होटर खूपच कमी दिसतो. हे भाजप नेत्यांचंच निरीक्षण आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये एक कोटींहून अधिक मतदार आहेत. या संख्येत, 30-35 लाख अमराठी (उत्तर भारतीय) मतदार आहेत आणि त्यात सुमारे 15 लाख उत्तर भारतीय मुस्लिम मतदारांचा समावेश आहे. या अमराठी व्होट बँकवर भाजपचा डोळा आहे.

मुस्लिम मतदारांचे विभाजन

कट्टर हिंदुत्वामुळे महायुतीपासून मुस्लिम मतदार दूर गेला आहे. हा व्होटर महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षामध्ये विभागला जाणार आहे. हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा राज ठाकरेंच्या माध्यमातून यशस्वी झाल्यास, भाजपची मुंबईत अमराठी व्होट बँक अधिक सक्षम होऊ शकते, असे भाजप नेत्यांचं निरीक्षण आहे. त्यातूनच हा मुद्दा भाजप पुढे पेटवत ठेवण्याची शक्यता आहे.

'जखम गुडघ्याला अन् मलम शेंडीला'

राज ठाकरेंनी महायुती सरकारला हिंदी भाषा कशी शिकवले जाते अन् सक्तीचे होते, तेच बघतो, असे म्हणताना, राज्यातील शाळा व्यवस्थापनांना आणि शिक्षकांना हिंदी भाषा शिकवू नका, असे आवाहन करतात. तसे मनसे सैनिकांमार्फत पत्र धाडले जात आहेत. राज ठाकरेंची शाळांना वेठीस धरण्याची भूमिका पालकांना रुचणारी नाही. हिंदी भाषेचा समावेश 'अनिवार्य' किंवा 'पर्याय' म्हणून घुसडली ती राज्यातील महायुती सरकारने, राज ठाकरेंनी विरोध करताना तिथंच महायुतीच्या राज्य सरकारवर जोरदार हल्ला करणं अपेक्षित होतं. पण शाळांमध्ये मनसेसैनिक पाठवून 'हिंदी शिकवू नका', असे सांगणे म्हणणे म्हणजे, 'जखम गुडघ्याला अन् मलम शेंडीला', असं झाल्याचे काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आलं.

हिंदी भाषा मुद्दा ग्रामीण भागात कितपत प्रभावी?

हिंदी भाषेचा मुद्दा मुंबईत अधिक प्रभावी ठरेल, हे भाजप सत्ताधारी हेरून आहेत. ग्रामीण भागात भाजपची संस्थानिकांच्या अन् कारखानदार नेत्यांच्या माध्यमातून ताकद वाढलेली आहे. सत्ताधारी भाजपचे हे संस्थानिक नेते आपआपले गड शाबूत ठेवण्यासाठी कामाला लागले आहेत. त्यामुळे हा मुद्दा मुंबई महापालिका काबिज करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे आणि तो राज ठाकरे यांच्या आक्रमक शैलीतूनच पूर्ण होऊ शकतो, हे लक्षात आल्याने भाजपने त्यांची स्क्रिप्ट अधिकच खुबीने पुढे आल्याचे राजकीय विश्लेषकांचे निरीक्षण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT