Money flows out of Pipe Sarkarnama
विश्लेषण

पाईपमधून पाणी नव्हे नोटा अन् दागिने आले बाहेर; ACB चे अधिकारीही चक्रावले (व्हिडीओ)

भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा लपवून ठेवण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवल्या जातात.

सरकारनामा ब्युरो

बेंगलुरू : भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा लपवून ठेवण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवल्या जातात. भ्रष्टाचार विरोधी पथकातील (ACB) अधिकाऱ्यांना आता असे फंड नवे राहिले नाहीत. अशाच एका सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) अभियंत्याच्या घरात छापा टाकण्यात आला. या छाप्यात अधिकाऱ्यांनी घरातील पाईप कापल्यानंतर त्यात मोठं घबाड आढळून आलं. पाईपमधून पाण्याऐवजी नोटा अन् दागिने बाहेर पडू लागल्याने अधिकारीही चक्रावून गेले.

कर्नाटक एसीबीने बुधवारी ही कारवाई केली आहे. या कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. एसीबीने कलबुर्गी येथील कनिष्ठ अभियंता शांतागौडा बिरादर यांच्या घरावर छापा टाकला होता. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याच्या संशयावरून बिरादर यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली होती. एसीबीचे अधिक्षक महेश मेघनावर यांच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्यात आला.

एसीबीची टीम सकाळी नऊ वाजता बिरादर यांच्या घराबाहेर दाखल झाली. घराचा दरवाजा वाजवल्यानंतर बिरादर यांनी 10 मिनिटांनी अधिकाऱ्यांना घरात येऊ दिले. त्यामुळे बिरादर यांनी पैसे लपवण्यासाठी हा वेळ घेतल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. घरात शोधाशोध घेताना अधिकाऱ्यांना प्लंबरला बोलवत घरातील पीव्हीसी पाईप कापण्यास सांगितले. एक पाईप कापल्यानंतर त्यातून नोटा अन् सोन्याचे दागिने बाहेर पडण्यास सुरूवात झाली.

कनिष्ठ अभियंता बिरादर याच्या घरावरील या छापेमारीत 13 लाख 50 हजार रुपये सापडले. त्यांच्या घराच्या छतावर सहा लाख रुपये लपवण्यात आले होते. दरम्यान, एसीबीने बुधवारी एकाचवेळी 68 ठिकाणी छापेमारी केली. पंधरा सरकारी अधिकाऱ्यांच्या घरी, विविध ठिकाणे, कार्यालये पिंजून काढण्यात आली. जवळपास आठ अधिक्षक, 100 अधिकारी, 300 हून अधिक कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते.

बिरादर यांच्यासह स्मार्ट सिटीचे कार्यकारी अभियंते, कृषी विभागातील सहसंचालक, सहकार विभाग अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, निवृत्त सह सचिव आदी अधिकाऱ्यांवर एसीबीला संशय होता. या कारवाईत एसीबीने रोख रक्कम, दागिने, महत्वाची कागतपत्रे जप्त केली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT