Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi Sarkarnama
विश्लेषण

शंभर आमदार भाजपमधून बाहेर पडण्याच्या वाटेवर! बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्युरो

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपला मोठी गळती लागली आहे. दोन दिवसांत दोन मंत्री आणि पाच आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपचे (BJP) शंभर आमदार पक्षातून बाहेर पडतील, असा दावा बंडखोर आमदाराने केला आहे. यामुळे राज्यातील भाजपमध्ये लवकरच फूट पडण्याची चिन्हे आहेत.

ओबीसींचे मातब्बर नेते व मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी 11 जानेवारीला राजीनामा दिल्यानंतर चार आमदारांनी पक्षाला रामराम केला होता. त्यानंतर 12 जानेवारीला आणखी एक बडे मंत्री दारासिंह चौहान (Dara Singh Chauhan) यांनी पक्षावर राजीनामा बॉम्ब टाकला. चौहान हे भाजप ओबीसी मोर्चाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यानंतर आता मौर्य यांचेच समर्थक आमदार मुकेश वर्मा (Mukesh Verma) यांनीही राजीनामा दिला आहे.

भाजपचे शंभर आमदार पक्ष सोडणार आहेत, असा खळबळजनक दावा वर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर केला आहे. त्यांनी राजीनामापत्रात भाजप आणि योगी सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आमचे कुणीही ऐकत नाही. पाच वर्षांत दलित, मागास, अल्पसंख्याक समाजातील नेते आणि लोकप्रतिनिधींकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांना सन्मान देण्यात आला नाही. सरकारने बेरोजगार, शेतकरी, दलित, मागासवर्गाची निराशा केली. त्यामुळे मी राजीनामा देत आहे. मी स्वामीप्रसाद मौर्य यांच्यासोबत आहे.

मौर्य यांनी पक्षाला भगदाड पाडल्याची चर्चा आहे. एकीकडे भाजपची उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी दिल्लीत खलबतं सुरू असताना राज्यात दररोज धक्के बसत असल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे समर्थक मानले जाणारे आमदार रोशन लाल वर्मा, ब्रिजेश प्रजापती, भगवती सागर आणि विनय शाक्य या आमदारांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. यात मंत्री दारासिंह चौहान आणि आमदार मुकेश वर्मा यांची भर पडली आहे. हे सातही जण मौर्य यांच्याप्रमाणेच समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मौर्य हे ओबीसी नेते असल्याने उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मौर्य यांच्यानंतर इतर नेतेही पक्ष सोडण्याच्या मार्गावर असून, भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT