Shiv Sena MP Sanjay Raut Latest Marathi News  Sarkarnama
विश्लेषण

`घोडेबाजार` म्हणून आरोप करणाऱ्या संजय राऊत यांचा `यू टर्न!`.. निघाले विरारकडे!

विधान परिषद निवडणुकीच्या मतांसाठी सर्वपक्षीय नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्या भेटीला..

संदीप पंडित

विरार : शिवसेनेचे नेेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि वसई-विरारचे नेते बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्यात आतापर्यंत नेहमीच सलोखा राहिला आहे. उलट वसई-विरारमधील स्थानिक शिवसेना नेते हे राऊत हे ठाकूरांच्या विरोधातील लढाईला पाठिंबा देत नसल्याचा आरोप करत होते. मात्र राज्यसभेच्या निवडणुकीनंतर या राऊत आणि ठाकूर हे आमनेसामने आले आहेत.

ठाकूर यांनी आपल्याला आणि महाविकास आघाडीला राज्यसभा निवडणुकीत मदत न केल्याचा ठपका राऊत यांनी ठेवला. ठाकूरांनी आपली तीन मते विकल्याचा जाहीर आरोप केला. हा आरोप आता राऊतांच्या अंगलट आला आहे. त्यामुळे ठाकूरांची समजूत काढण्यासाठी ते आता विरारला येणार असल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्यानंतर भाजपच्या मनीषा चौधरी आणि राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दीपक सांळुके आणि आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी हितेंद्र ठाकूर यांची विरार येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.

भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकीत काटे कि टक्कर होणार असल्याने एकेका मतांसाठीची जमवाजमव करण्यासाठी सारेजण कामाला लागले आहेत. त्यात हि अपक्ष आणि छोट्या पक्षांचा भाव वाढला आहे. राज्यात महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेल्या अपक्षांबाबत राज्यसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संशयाने पाहण्यास सुरुवात केल्याने या अपक्षांची पुन्हा मनधरणी करण्यात येत आहे.

राऊत यांनी आमदार हितेंद्र ठाकूर , क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील यांनी महाविकास आघाडीला मतदान केले नसल्याचे सांगितले होते. संजय राऊत यांच्या टीकेची दखल शरद पवार यांनी अपक्षावर अशी टीका करू नये असे सांगितले होते. तर आता क्षितिज ठाकूर हे राज्यसभा निवडणुकी नंतर थेट न्यूयार्कला गेल्याने त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची चिन्हे दिसू लागल्याने शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे स्वतः हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला येणार असल्याची माहिती मिळत आहे.

क्षितिज ठाकूर हे न्यूयाॅर्कला गेल्याने ते मतदान करणार की नाही, असा प्रश्न आज हितेंद्र यांना विचारला असता राऊतांबद्दलची नाराजी त्यांच्या वक्तव्यातून दिसून आली. आमच्या कुटुंबातील व्यक्ती आजारी असल्याने ते न्यूयार्कला गेले आहेत. समाजकारण करताना घर आणि त्यातील नातीही जपायला लागतात. बघू कसे होते ते. शेवटी इथे काय तर चार हुशार लोक आम्हाला घोडाबाजार केल्याची चर्चा करायला लावतात. त्यापेक्षा नाही दिले एक मत तर काय होणार आहे, असा प्रतिप्रश्न ठाकूर यांनी पत्रकारांना केला.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर दोन नेत्यांमध्ये जवळपास दोन तास बंद दाराआड चर्चा झाली. ठाकूर व रामराजे यांनी शाकाहारी भोजनाचा आनंद घेतला. अर्थात या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे दुसरे उमेदवार एकनाथ खडसे हे मात्र उपस्थित नव्हते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT