विश्लेषण

फसवणूक करुन जमीन घेणाऱ्या धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा नोंदवा : शेतकऱ्यांचे उपोषण

सरकारनामा ब्युरो

बीड : जगमित्र साखर कारखान्यासाठी फसवणूक करुन जमीन घेतल्याचा तिसरा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर सोमवारी झाला. कारखान्यात नोकरीला लावण्याचे प्रलोभन दाखवून जमीन घेतली असून मुलाला नोकरीही लावली नाही आणि ठरल्याप्रमाणे पैसेही दिले नाहीत, असा आरोप करत शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले असून मुंडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्याची मागणीही केली आहे. 

उद्धव कचरु सावंत यांनी हे निवेदन दिले असून त्यावर माणिक भालेराव, वसंत पवार, उद्धव सावंत, संजय सावंत, शांताबाई सावंत, सुमनबाई भालेराव, लखन भालेराव, मौला शेख, जनबनबी शेख आदींच्या सह्या आणि अंगठ्याचे ठसे आहेत. उपोषणात चार महिला आणि दहा पुरुषांचा समावेश आहे. 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्‍यातील पुस शिवारात जगमित्र शुगर हा साखर कारखाना प्रस्तावित केला होता. या कारखान्यासाठी जमीन घेताना फसवणूक झाल्याचा हा धनंजय मुंडे यांच्यावरील तिसरा आरोप आहे. आता पुस येथील शेतकऱ्यांनीही मुलाला नोकरीला लावतो म्हणून धनंजय मुंडे यांनी कारखान्यासाठी जमीन घेतली. मात्र, नोकरीही दिली नाही आणि व्यवहारानुसार ठरलेले पैसेही दिले नसल्याचा आरोप केला आहे. 

या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यासाठी बर्दापूर पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, पुस येथे हाती घेतलेल्या जगमित्र कारखान्यासाठी घेतलेली जमिन फसवणूक करुन घेतल्याचा हा तिसरा आरोप आहे. यापूर्वी मुंजा गित्ते या शेतकऱ्यानेही जमिन घेऊन फसवणूक केल्याचा आरोप केला होता. जमिनीच्या पैशापोटी दिलेला चेक बाऊन्स झाला तसेच मुलालाही नोकरी दिली नाही असा आरोप गित्ते यांनी केला होता. तर, बेलखंडी येथील मठाची जमिन घेतल्याच्या आरोपाखाली उच्च न्यायालयाच्या आदेशाने नुकताच श्री. मुंडे यांच्यावर गुन्हा नोंद झाला. सोमवारी पुस येथील शेतकऱ्यांनी याच कारणाने उपोषण सुरु केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT