Nagar Politics Sarkarnama
विश्लेषण

Nagar Politics: राजकीय अस्तित्वासाठी 'साऱ्यां' विरुद्ध विखे पिता-पुत्र!

Pradeep Pendhare

Nagar Political News: नगर जिल्ह्याचे राजकारण सहकार, पाणी, शेती, रस्ते तसेच विखे आणि थोरात यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. तशी दोन्ही घराणे संस्थानिक. विखे-थोरात काँग्रेसचे पूर्वाश्रमीत. ही दुही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही राजकीय संधी सोडत नाही. हे दोघे काँग्रेसमध्ये असताना मंत्रीपद देऊन त्यांना एकमेकांमध्ये गुंतून ठेवले जायचे.

त्याचा फायदा काँग्रेसला व्हायचा. या दोघांच्या वर्चस्वावी लढाई रंगायची. परिणामी काँग्रेसला नगर जिल्ह्यात दोन चेहरे दिसायचे. परंतु दोघांमधील लढाईचे काँग्रेसला देखील झटके बसायचे. काँग्रेस पक्ष या दोघांच्या वर्चस्वात जसा वाढला, तसा तो खिळखिळा देखील झाला. त्याचे परिणाम केंद्रातील २०१४ च्या सत्तांतराचा अभ्यास करताना दिसतात.

लोकसभा २०१४ नंतर केंद्रात सत्तांतर झाले. मोदी लाटेत काँग्रेस कुठच्या कुठे वाहून गेली. त्यातून काँग्रेसला सावरताच आले नाही. यानंतर २०१९ मध्ये केंद्रात पुन्हा मोदी सरकार सत्तेत बसले. यात भाजप-शिवसेना युतीने महाराष्ट्रात लोकसभेत ४१ जागा जिंकल्या. लोकसभेनंतर राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या.

भाजप-शिवसेना युती पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरली. भाजपने १०५, तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या. भाजप राज्यात मोठा भाऊ झाला आणि महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ झाली. तेथून पुढे महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीचे पर्व सुरू झाल्याचे दिसते.

लोकसभा आणि विधानसभा २०१९ ची निवडणूक नगर जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण देणारी ठरली. विखे-थोरात या निवडणुकांपासून आमने-सामने आले. लोकसभा २०१९ मध्ये डॉ.सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

यानंतर त्यांचे वडील राधाकृष्ण विखे यांनी प्रवेश केला. हे पिता-पुत्र भाजपमध्ये आता विसावले आहेत. राधाकृष्ण विखे हे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन तथा दुग्धविकास आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.

सुजय विखे हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. सुजय विखे यांच्या रुपाने नगर जिल्ह्याच्या राजकारण विखे घराण्याचा चौथी पिढी प्रतिनिधीत्व करताना दिसते. सुजय विखे यांनी १२ मार्च २०१९ रोजी भाजपमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री तथा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित प्रवेश करत नगर दक्षिणमधून लोकसभेची पहिली निवडणूक लढवली.

यात त्यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा पराभव केला अन् सुजय पर्व सुरू झाले. सुजय विखे यांचा भाजप प्रवेश झाला, त्यावेळी राधाकृष्ण विखे हे काँग्रेसमध्ये होते. राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहत होते.

यानंतर राधाकृष्ण विखे हे भाजपमध्ये प्रवेश केला. नरेंद्र मोदी यांनी ३० मे २०१९ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर १ जून २०१९ रोजी राधाकृष्ण विखे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. विखे घराणं नगर जिल्ह्यातील राजकारणातील मोठं प्रस्थ. राधाकृष्ण विखे यांच्या प्रवेशामुळे भाजपला नगर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात बळ मिळेल, असे वाटू लागले.

विखेंच्या भाजप प्रवेशामुळे नगर जिल्ह्यातील विखे-थोरात हे आता थेट आमने-सामने आहेत. लोकसभा २०२४ च्या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत. तसे विखे-थोरात यांच्यातील राजकारण चांगले धारदार बनले आहे.

विखे-थोरात एकमेकांना शह देण्याची सध्या तरी एकही संधी सोडत नाही. विखे पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशापूर्वी नगर जिल्ह्यातील भाजपची स्थिती येथे पाहण्यासारखी ठरते. त्यावरून नगर जिल्ह्यात भाजपला विखे पिता-पुत्रांचे बळ मिळाले की, अधोगती झाले हे समजू शकते.

२०१४ मध्ये नगर जिल्ह्यात राम शिंदे (कर्जत-जामखेड), बाळासाहेब मुरकुटे (नेवासा), मोनिका राजळे (पाथर्डी-शेवगाव), स्नेहलता कोल्हे (कोपरगाव), शिवाजी कर्डिले (राहुरी-नगर), असे भाजपचे पाच आमदार होते. विखे पिता-पुत्रांचा २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश झाला.

पक्षाला नगर जिल्ह्यात २०१९ मध्ये चांगले संख्या बळ गाठता येईल, असे वाटत असतानाच उलटे झाले. भाजपचे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सदस्य संख्या घटली. राधाकृष्ण विखे (शिर्डी), मोनिका राजळे (पाथर्डी-शेवगाव) आणि बबनराव पाचपुते (श्रीगोंदा) या तीनच जागेवर भाजपला यश मिळाले. भाजपच्या जागा कमी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढल्या.

भाजप-शिवसेना युतीला राज्यात २०१९ च्या विधानसभेत बहुमत असून देखील सत्ता स्थापन करता आली नाही. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस, असा महाविकास आघाडी सत्तेचा प्रयोग राज्यात झाला. नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदा बाळासाहेब थोरात यांना मंत्रीपद मिळाले.

दरम्यान, शिवसेनेत बंडाळी झाली. भाजपने याचा फायदा घेत भाजप-शिवसेना शिंदे गटाला बरोबर घेत राज्यात सत्ता स्थापन केली. भाजपच्या सत्ता स्थापनेनंतर राधाकृष्ण विखे यांना राज्यात मंत्रीपदावर संधी मिळाली. यानंतर राष्ट्रवादीत देखील बंडाळी झाली. भाजप-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी अजित पवार गट, अशी महायुतीची सत्ता आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे यांनी नगर जिल्ह्यात त्यांच्या स्टाईलचे राजकारण भाजपमध्ये देखील सुरूच ठेवले आहे. मंत्री विखे यांनी नगर आणि राज्यातील भाजप संघटनेतील प्रमुख नेत्यांना अलगद बाजूला ठेवत केंद्रीय नेतृत्वाला गवसणी घातली आहे. दिल्ली येथे संपर्क वाढवून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह यांच्याशी जवळीक साधून आहेत.

नगर उत्तरमध्ये पंतप्रधान मोदी यांचे दौरे नगर आणि राज्यातील भाजप संघटनेतील प्रमुख नेत्यांना बाजूला सारून विखे पिता-पुत्रांनी यशस्वी केलेत. यावरून नगर आणि राज्याच्या भाजप संघटनेंमध्ये नाराजीचा सूर आहे.

नगर दक्षिणमधील भाजप संघटनेच्या नेत्यांनी यावरून ओरड देखील सुरू केली आहे. सुजय विखे हे नगर दक्षिणेचे भाजपचे खासदार आहेत, परंतु भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे दौरे हे नगर उत्तर होत आहेत.

खासदार असून देखील नगर दक्षिणेवर हा अन्याय का? असा सवाल केला जात आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी वाढलेली विखेंची जवळीक ही भाजपच्या नगर आणि राज्यातील नेत्यांना देखील खटकणारी तसेच धसका भरवणारी आहे.

याची जाण विखे पिता-पुत्रांना नाही, असे नाही. विखे पिता-पुत्रांची 'स्वयंम्' यंत्रणा मोठी आहे, त्यामुळे भाजप अंतर्गत त्यांच्याविरोधात होत असलेल्या कुरघोड्यांकडे 'सोयी'चे दुर्लक्ष करताना दिसतात.

विखे पिता-पुत्रविरुद्ध इतर, असा नगर जिल्ह्यात तरी सामना दिसतो. किंवा ते विखे पिता-पुत्रांनी त्यांच्या राजकीय स्टाईलने पेटता ठेवला आहे, असे म्हटले तर येथे वावगे ठरणार नाही. विखे कोणत्याही पक्षात असो, ते 'स्वयम्' एक पक्ष असल्यासारखे राजकारण करतात. नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विखे यंत्रणेच्या 'विकास आघाड्या' आहेत.

दिवंगत लोकनेते बाळासाहेब विखे यांच्या काळापासून या 'विकास आघाड्या' असल्याचे सांगितले जाते. विखे हाच पक्ष ते मानतात. त्यामुळे विखेंचे वर्चस्व नगर जिल्ह्यातील राजकारणात अबाधीत आणि ते वाढताना दिसते. अलीकडच्या काळात विखे पिता-पुत्रांचे नगर जिल्ह्यातील विरोधकांविरोधात राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसते.

विखे पिता-पुत्रांविरोधात भाजप अंतर्गत विरोधक वाढले असून, विरोधी पक्षाकडून देखील कडवा विरोध होताना दिसतो आहे. विरोधकांना भाजपमधील विखे विरोधकांकडून देखील बळ मिळताना दिसते. खासदार सुजय विखेंनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पहिल्या ट्रममध्ये खासदारकी मिळवली.

लोकसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागल्याने खासदार विखेंनी कामाचा झपाटा वाढवलेला दिसतो. पक्षाने संधी दिल्यास मी विकास कामांच्या जोरावरच मतदारांसमोर जाणार, असे खासदार विखे जाहीर कार्यक्रमांतून सांगत आहे. परंतु खासदार विखेंना पक्षातंर्गत आव्हाने वाढू लागली आहे. याचे कारण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दडल्याचे दिसते.

राज्याच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे पाच उमेदवार पडले. राज्याचे मंत्री असताना राम शिंदे यांना कर्जत-जामखेडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. नवख्या रोहित पवार यांच्याकडून त्यांना पराभव पत्कारावा लागल्यानं ते राम शिंदे यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय.

विखे यांच्या खेळींमुळेच भाजपच्या उमेदवारांचा नगर जिल्ह्यात मोठ्या संख्येने पराभव झाल्याचा आरोप राम शिंदे यांच्यासह पराभूत उमेदवारांनी पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. राम शिंदे यांना पुढे विधानपरिषदेवर संधी मिळाल्यानंतर त्यांनी विखे पिता-पुत्रांविरोधात उघडपणे बोलण्यास सुरूवात केली. आता राम शिंदे यांनी लोकसभेसाठी आपण देखील इच्छुक असल्याचे सांगत आहेत.

राजकीय संधी मिळताच राम शिंदे हे विखे पिता-पुत्रविरोधकांना जवळ करताना दिसतात. काही ठिकाणी चिमटे देखील घेतात. राम शिंदे यांच्या राजकीय कुरघोड्यांना विखे पिता-पुत्र संयमाने हाताळत आहेत. याशिवाय पराभूत झालेले शिवाजी कर्डिले यांच्याशी विखेंचा सुरूवातीला चांगलाच संघर्ष झाला होता.

परंतु विखे पिता-पुत्रांशी कर्डिले यांनी पुढे जुळवून घेतले. आता खासदार विखे आणि कर्डिले नगर दक्षिणेतील प्रत्येक कार्यक्रमांना एकत्र दिसतात. जिल्हा सहकारी बॅंकेत काँग्रेस आघाडीकडून निवडून आलेले कर्डिले, पुढे भाजपकडे जाऊन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष झाले आहेत. नगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून शिवाजी कर्डिले विधानसभेची बिकट झालेली वाट सोपी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

शिवाजी कर्डिले यांचे जावई आणि नगर शहर विधानसभा मतदारसंघात आमदार संग्राम जगताप (राष्ट्रवादी अजित पवार गट) यांच्याशी जुळवून घेतले आहे. विशेष म्हणजे २०१९ ची लोकसभा निवडणूक विखेंनी त्यांच्याच विरोधात लढली होती. नगर शहरातील बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामानिमित्ताने खासदार विखे आणि आमदार जगताप यांच्यात मैत्रीचा सेतू निर्माण झाला.

आता या दोघांचे सूर एवढे जुळले आहेत की, नगर शहरातील विकासाकामांना एकत्र हजेरी लावतात. मात्र, नगर शहरातील भाजप संघटनेला हे पचनी पडत नसल्याचे दिसते. भाजप संघटनेला नगर शहर विधानसभा मतदारसंघात २०२४ मध्ये भाजपचा आमदार हवा आहे. यातून

खासदार विखेंविरुद्ध नगर शहर संघटना, असा संघर्ष दिसतो. यामुळे नगर शहरातील भाजप संघटना विखे पिता-पुत्रांपेक्षा भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जास्त संपर्कात दिसते.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आमदार आशुतोष काळे (राष्ट्रवादी अजित पवार गट) यांच्याशी आता भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या आक्रमकपणामुळे मंत्री विखेंनी जवळीक साधली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या युतीने विखे पिता-पुत्रांना गणेश कारखाना निवडणुकीत धक्का दिला.

'गणेश'मधील विखेंची सत्ता उलथून लावली. विखे पिता-पुत्रांना हा पराभव त्यांच्या राजकीय जीवनात नेहमीच बोचत राहणारा आहे. यातून सावरत नाही तोच, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत थोरात-कोल्हे युती गटाने विखे गटाला जोरदार धक्का दिला. विखे गटाच्या सत्ता असलेल्या ग्रामपंचायतीत थोरात-कोल्हे युती गटाने सत्ता काबीज केली.

दिवाळीतील साखर पेरणीवरून राजकारण तापले. नगर उत्तरमधील विखेंच्या या साखरला नगर दक्षिणेमधील विरोधकांनी घेरले. खासदार विखे या साखर पेरणीतून आजही सारवलेले नाहीत. नगर दक्षिणमध्ये आजही कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार विखेंकडून साखर वाटप करताना दिसत आहे. यानंतर राहाता आणि कोपरगावमध्ये एमआयडीसी मंजुरीवरून विखे आणि कोल्हेंमध्ये श्रेयवाद रंगला.

विवेक कोल्हे यांनी टायमिंग साधत एमआयडीसीसाठी कसा पाठपुरावा केला, याची कागदपत्रे पत्रकार परिषद मांडली. यावर मंत्री विखे यांनी आमदार काळे यांना बरोबर घेऊन कोपरगावात जाहीर कार्यक्रम घेतला. या व्यासपीठावर भाजपचे माजी आमदार म्हणून स्नेहलता कोल्हे कोठेच दिसल्या नाहीत.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मंत्री विखे-आमदार काळे यांचे एकत्र येणे फक्त एमआयडीसीचे श्रेय घेण्यापुरतेच होते, असे मतदार बोलून दाखवतात. त्यामुळे विखे-काळे यांचे आगामी काळात राजकीय सूर जुळतील,असे नाही.

संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला. थोरातांचे संगमनेरमध्ये एकहाती वर्चस्व येथे आहे, असे असले, तरी थोरात हे संगमनेरमधून नगर जिल्ह्याच्या राजकारणावर देखील पकड ठेवून आहेत. थोरातांनी देखील तालुकानिहाय कार्यकर्ते उभे केले आहेत. त्यांना वेळप्रसंगी ते बळ पुरवतात.

मोदी लाटेत थोरात काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. काँग्रेस अंतर्गत त्यांना देखील विरोध होताना दिसतो. परंतु थोरात यांच्याकडे वेळ आणि संयम एवढा आहे की, त्याची फळप्राप्ती त्यांना होतेच. विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर थोरात देखील भाजपमध्ये येणार अशा चर्चा होत्या.

थोरात यांनी स्वतः समोर येत त्याचे खंडण केले आणि नगर जिल्ह्यातून ते काँग्रेसचा चेहरा असल्याचे समोर आले. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना महसूलमंत्री पदावर संधी मिळाली. कोरोना काळ असताना त्यांनी मंत्रीपदावरून राज्याची आर्थिक घडी विस्कटून दिली नाही.

निळवंडे धरणाच्या कामाला थोरात यांनी अधिक बळ दिले. पुढे महायुतीची सत्ता आली आणि विखे महसूलमंत्री झाले. निळवंडेचे काम पूर्ण होताच मंत्री विखेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिर्डीत आणत त्याचे उद्घाटन करत शिलेवर नाव कोरले.

दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीत त्यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे आणि त्यांच पुत्र सत्यजीत यांच्यात उमेदवारीचे नाट्य रंगले. सत्यजीत तांबे हे भाजपमध्ये जाणार, ते देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या.

शेवटी सत्यजीत तांबे हे नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. यात त्यांनी यश मिळवले. सुधीर तांबे पक्षातून निलंबित असून देखील हे तांबे पिता-पुत्र अजूनही काँग्रेसच्या संपर्कात आहेत.

अकोले विधानसभा मतदारसंघातील दिग्गज नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड हे शरद पवार यांचे निकटवर्तीय. परंतु त्यांनी २०१९ मध्ये विखेंपाठोपाठ भाजपमध्ये प्रवेश केला. हमखास निवडून येणार असे वाटत असताना २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रसेचे डॉ. किरण लहामटे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.

आमदार किरण लहामटे राष्ट्रवादीतील फूटनंतर अजित पवार गटात सामील झाले आहेत. अकोले विधानसभा मतदारसंघात जसे विखेंचे कार्यकर्ते दिसतात, तसे थोरात व शरद आणि अजित पवार गटांना मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग कार्यरत आहेत.

याशिवाय डाव्या विचारसरणीची कम्युनिस्ट संघटना अकोले तालुक्यात मोठी आहे. तशीच शेतकरी आणि आदिवासींचे येथे मोठे संघटन असून, ते त्यांचे अस्तित्व टिकून आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या काळात येथे सर्वच गटांचा कस लागणार असे चित्र आहे.

पाथर्डी-शेवगावमधील भाजपच्या आमदार मोनिका राजळे आणि श्रीगोंद्यातील आमदार बबनराव पाचपुते यांच्याशी खासदार विखेंनी जुळवून घेत तिथे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा लावला आहे.

परंतु आमदार राजळे आणि आमदार पाचपुते यांनी आपआपल्या मतदारसंघात आगामी निवडणुकांसाठी विखेविरहीत यंत्रणा सज्ज करण्याच्या तयारीत आहे. पारनेरमध्ये आमदार नीलेश लंके (राष्ट्रवादी अजित पवार गट) आणि राहुरी-नगर विधानसभा मतदारसंघातील आमदार प्राजक्त तनपुरे (शरद पवार गट) यांच्याशी विखे पिता-पुत्रांचा संघर्ष कायम आहे. नेवासे मतदारसंघात शिवसेनेचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख कुटुंब हा विखेंचा पारंपारिक राजकीय विरोधक!

२०१४-२०१९ मधील आकडेवारी बरच काही सांगते!

विखे पिता-पुत्र भारतीय जनता पक्षात २०१९ मध्ये प्रवेश केला. त्यावेळी भाजपचे पराभूत झालेले उमेदवार २०१४ मध्ये विजयी होते. या उमेदवारांची २०१९ आणि २०१४ मधील आकडेवारीवर नजर टाकू. यात कोपरगाव मतदारसंघातून स्नेहलता कोल्हे या भाजपकडून २०१४ मध्ये निवडून आल्या होत्या. त्यांना ९९ हजार ७६३ मते पडली होती. त्यांचा प्रमुख विरोधक सध्याचे विद्यमान आमदार आशुतोष काळे होते.

त्यांना दुसऱ्या क्रमांकांची ७० हजार ४९३ मते पडली होती. राहुरी मतदारसंघातून २०१४ मध्ये शिवाजी कर्डिले भाजपकडून विजयी झाले होते. त्यांना ९१ हजार ४५४ मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादी डॉ. उषा तनपुरे यांना दुसऱ्या क्रमांकाची ६५ हजार ७७८ मते मिळाली होती. कर्जत-जामखेडमध्ये प्रा. राम शिंदे यांना ८४ हजार ५८ मते मिळवत विजयी झाले होते.

नेवाशात बाळासाहेब मुरकुटे हे भाजपकडून ८४ हजार ५७० मते मिळवत विजय मिळवला आणि विद्यमान शिवसेनेचे आमदार शंकरराव गडाख यांचा पराभव केला. शंकरराव गडाख यांना दुसऱ्या क्रमांकाची ७९ हजार ९११ मते मिळाली. अकोले तालुक्यात देखील माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीकडून २०१४ मध्ये निवडणूक लढवत ६७ हजार ६९६ मते मिळवत विजय मिळवा.

परंतु पुढे २०१९ मध्ये वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पिचड म्हणजे हमखास विजयाचे गणित. परंतु त्यांचा भाजपमध्ये येताच पराभव झाला. राष्ट्रवादीकडून डॉ. किरण लहामटे यांनी त्यांचा पराभव केला. डॉ. किरण लहामटे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी १ लाख १३ हजार ४१४ मते मिळाली. असेच पुढे राहुरीत झाले.

भाजपचे शिवाजी कर्डिले यांचा राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरेंकडून पराभव झाला. तनपुरे यांना १ लाख ९ हजार २३४ मते मिळाली, तर शिवाजी कर्डिले यांना ८५ हजार ९०८ मते मिळाली. कर्जत-जामखेडमध्ये भाजपचे मंत्री असताना प्रा. राम शिंदे यांचा बाहेरून आलेले रोहित पवार यांनी पराभव केला. पवार यांना १ लाख ३५ हजार ८२४ मते मिळाली, तर शिंदे यांना ९२ हजार ४४७ मते मिळाली.

शिंदे यांना हा पराभव जिव्हारी लागलेला आहे. यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून राम शिंदे यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात देखील स्नेहलता कोल्हे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादीचे आशुतोष काळे हे विजयी झाले.

काळे यांना ८७ हजार ५६६ मते मिळाली, तर कोल्हे यांना ८६ हजार ७४४ मते मिळाली. येथे विखे यांचे मेहुणे राजेश परजणे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांना १५ हजार ४४६ मते मिळाली. या पराभवानंतर कोल्हे यांनी विखे यांच्या राजकीय युद्ध सुरू झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'स्थानिक'च्या लांबलेल्या निवडणुका गणित जुळू देईना!

विखे पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशाअगोदर अहमदनगर जिल्हा परिषदेत भाजपच्या २०१२ मध्ये सहा जागा होत्या. २०१७ मध्ये भाजपमध्ये कामगिरीत सुधारणा करत १४ जागा जिंकल्या. दुप्पट जागांवर भाजपने हा विजय मिळवला. विशेष म्हणजे, त्यावेळी विखे पिता-पुत्र हे कॉग्रेसमध्ये होते.

डॉ. सुजय विखे हे २०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉग्रेसच्या प्रचारासाठी हॅलिकॉप्टरमधून फिरत होते. त्यावेळी राष्ट्रवादीला २३, कॉग्रेसला १९, शिवसेनाला सात आणि अपक्षांनी दहा जागांवर विजय मिळवला होता. २०१२ मध्ये जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला ३२, कॉग्रेसला २८, शिवसेनाला सहा, भाजपला सहा आणि अपक्षांनी तीन जागांवर विजय मिळवला होता.

दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहे. नगर महापालिकेतील नगरसेवकांची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

नगर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या २०१७ मधील निवडणुकावेळी कॉग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आली होती. जिल्हा परिषदेच्या ७२ जागांमध्ये भाजप १४, शिवसेना सात, कॉग्रेस २३, राष्ट्रवादी १८ आणि इतर १०, असे पक्षीय बलाबल होते. यावेळी सुजय विखे हे कॉग्रेसकडून प्रचाराच्या रिंगणात होते. हेलिकॉप्टरने ते नगर जिल्हा पिंजून काढत होते.

नगर दक्षिणमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी त्यांनी उडवलेले हेलिकॉप्टर त्यांना नंतर खासदारकीपर्यंत घेऊन गेले. मध्यतंरी ग्रामपंचयातीच्या निवडणुकीत गटाचे राजकारण झाले. हे गट पुढे आम्ही तुमचेच, असे सांगून दोन्ही घरच्या नेत्यांकडे गेले. त्यामुळे सर्वच पक्ष, नेते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आम्हीच नंबर वन म्हणत आहेत.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका वगळ्यास इतर कोणत्याही मोठ्या निवडणुका झाल्या नसल्याने आज नगर जिल्ह्यात कोणता पक्ष, नेता वरचढ, याचा अंदाज विश्लेषकांना बांधणे अवघड जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या राजकारणामुळे विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगर जिल्ह्यातील राजकीय गणिते लोकसभा निवडणुकीपेक्षा वेगळी असतील, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहे. नगर महापालिकेतील नगरसेवकांची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

नगर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या २०१७ मधील निवडणुकावेळी कॉग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आली होती. जिल्हा परिषदेच्या ७२ जागांमध्ये भाजप १४, शिवसेना सात, कॉग्रेस २३, राष्ट्रवादी १८ आणि इतर १०, असे पक्षीय बलाबल होते. यावेळी सुजय विखे हे कॉग्रेसकडून प्रचाराच्या रिंगणात होते. हेलिकॉप्टरने ते नगर जिल्हा पिंजून काढत होते.

नगर दक्षिणमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी त्यांनी उडवलेले हेलिकॉप्टर त्यांना नंतर खासदारकीपर्यंत घेऊन गेले. मध्यतंरी ग्रामपंचयातीच्या निवडणुकीत गटाचे राजकारण झाले. हे गट पुढे आम्ही तुमचेच, असे सांगून दोन्ही घरच्या नेत्यांकडे गेले. त्यामुळे सर्वच पक्ष, नेते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आम्हीच नंबर वन म्हणत आहेत.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका वगळ्यास इतर कोणत्याही मोठ्या निवडणुका झाल्या नसल्याने आज नगर जिल्ह्यात कोणता पक्ष, नेता वरचढ, याचा अंदाज विश्लेषकांना बांधणे अवघड जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या राजकारणामुळे विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नगर जिल्ह्यातील राजकीय गणिते लोकसभा निवडणुकीपेक्षे वेगळी असतील, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

(Edited by - Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT