विश्लेषण

नगर जिल्ह्यात कॉंग्रेसची मुसंडी, राष्ट्रवादीची सोबत लागणार

मुरलीधर कराळे

नगर, ः जिल्हा परिषदेच्या 72 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 23 जागा जिंकत कॉंग्रेसने आघाडी मिळविली. दोन नंबरला राष्ट्रवादीने 18 जागा मिळवित आपले स्थान निश्‍चित केले, तर भारतीय जनता पक्षाला 14 जागा मिळाल्या. शिवसेनेने सात व इतरांनी दहा जागा मिळविल्या. फोर्टी प्लसचा नारा देणाऱ्या पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे स्वप्न या निवडणुकीत भंगले. जिल्हा परिषदेत सत्तेसाठी 37 जागा लागणार आहेत. दोन्ही कॉंग्रेसचे मनोमीलन झाल्यास ते शक्‍य आहे. 
दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी बरोबर आघाडी करणार असल्याचे जाहीर केल्याने यावेळीही विखेंचे वर्चस्व जिल्हा परिषदेवर राहणार हे निश्‍चित मानले जाते. 
नगर तालुका ः आमदार कर्डिलेंना दणका 
नगर तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या सहापैकी तीन गट भाजपने जिंकले. कॉंग्रेसला दोन, तर राष्ट्रवादी एका जागा पदरात पाडून समाधान मानावे लागले. तालुक्‍यावर कायम वर्चस्व असलेले भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना या निवडणुकीत चांगलाच दणका बसला. पांगरमल विषारी दारू प्रकरणात गुन्हे दाखल झाले असले, तरी सहानुभूतीची लाट निर्माण होत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. पंचायत समितीवर शिवसेनेने आठ जागा मिळवीत बहुमत सिद्ध केले. मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला जिल्हा परिषदेत जेऊर व नागरदेवळे गटात यश मिळाले होते. मात्र या निवडणुकीत कर्डिले यांना हे दोन गट राखता आले नाही. या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी प्रचारात आघाडी घेऊनही यश प्राप्त करता आले नाही. 
राहाता तालुका ः विखे पाटील यांनी गड राखला 
राहाता तालुक्‍यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गड राखण्यात यश मिळविले. नगर पालिकेत आलेल्या अपयशाची भर त्यांनी काढली. तालुक्‍यातील पाचही गट व दहा गण दुपटीहून अधिक मताधिक्‍याने त्यांच्या गटाने जिंकल्या. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या लोणी खुर्द गटातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांनी सुमारे बारा हजाराचे विक्रमी मताधिक्‍य मिळविले. तर शेजारची कोल्हार बुद्रूक गटाची जागा विखे गटाने तब्बल तेरा हजार मतांनी जिंकली. अन्य सर्व गट व गण प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या दुपटीने मताधिक्‍य घेऊन जिंकल्या. मागच्या तुलनेत पंचायत समितीच्या दोन जागा देखील वाढल्या. विरोधीपक्ष नेते विखे पाटील बाहेर प्रचारासाठी असताना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील व युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. 
पाथर्डी तालुका ः भाजपला कौल 
पाथर्डी तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या पाच पैकी तीन जागा भाजपने, एक राष्ट्रवादी, तर एक शिवसेनेने जिंकली. तालुक्‍यात कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही. पंचायत समितीची सत्ता भारतीय जनता पक्षाने एकहाती खेचून आणली. दहापैकी आठ भाजपला, तर राष्ट्रवादीला एक, आणि अपक्षाला एक जागा मिळाली. एकूणच तालुक्‍यातील मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. राहुल राजळे यांच्या रूपाने राजीव राजळे यांनी, तर प्रभावती ढाकणे यांच्या माध्यमातून प्रताप ढाकणे यांनी जिल्हा परिषदेत प्रभाव पाडला आहे. शिवसेनेचे अनिल कराळे यांनी दोन्ही आमदारांच्या विरोधात विजय मिळविला आहे. राहुल गवळी अपक्ष निवडून येऊन पंचायत समिती सभागृहात दाखल झाले आहेत. 
कोपरगाव तालुका - कोल्हेंची सत्ता उलथून टाकली 
कोपरगाव तालुक्‍यात पाचपैकी तीन गटांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली. एक गट कॉंग्रेसला मिळाला. चांदेकसारे हा गट न्यायप्रविष्ट आहे. तालुक्‍यातील पंचायत समितीवर 55 वर्षे माजी मंत्री शंकरराव कोल्हे, बिपिन कोल्हे, आमदार स्नेहलता कोल्हे यांची निर्विवाद बहुमत असलेली सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते आशुतोष काळे यांनी माजी आमदार अशोक काळे, कॉंग्रेसचे राजेश परजणे यांच्या साथीने उलथून टाकली. तालुक्‍यात पुन्हा काळे-कोल्हे-परजणे यांच्याभोवती राजकारण फिरत आहे. 
तालुक्‍यावर आलटून पालटून सत्ता गाजविणारे काळे-कोल्हे यांनी पुन्हा एकदा राजकारण करताना कुठे भांडायचे व कुठे थांबायचे, या सूत्राचा अवलंब केल्याचे दिसून आले. कुणी कुठल्याही पक्षात गेले, तरी काही हरकत नाही, पण तालुक्‍यासाठी केवळ काळे आणि कोल्हे हे दोनच पक्ष आहेत, हे त्यांनी वारंवार सिद्ध केले आहे. एकंदरीत या निवडणुकीत पुन्हा काळे कोल्हे यानीच बाजी मारली असून, तालुक्‍याचे राजकारण तेच ठरवतात, तिसरी शक्ती उदयास कशी येणार नाही, याची काळजी हे दोन्ही कुटुंबीय पुरेपूर घेत असल्याचेच पुन्हा एकदा सिद्द झाले आहे. 
शेवगाव तालुका ः राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व 
शेवगाव तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या चार पैकी तीन जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस, तर एका जागेवर जनशक्ती आघाडीने विजय मिळविला. पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व आठ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळविले. प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपला तालुक्‍यात एकही जागा मिळवता आली नाही. राष्ट्रवादीच्या राजश्री चंद्रशेखर घुले दहिगाव-ने गटातून तर गणातून राष्ट्रवादीचेच क्षितिज नरेंद्र घुले हे सर्वाधिक मतांनी विजयी झाले. लाडजळगाव गटातील अटीतटीच्या लढाईत जनशक्ती आघाडीच्या हर्षदा काकडे विजयी झाल्या. 
श्रीगोंदे तालुका ः पाचपुतेंची मुसंडी 
श्रीगोंदे तालुक्‍यात सहापैकी भाजपने तीन, राष्ट्रवादीने दोन, कॉंग्रेसने एक जागा मिळविली. तालुक्‍यात माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी या निवडणुकीत मुसंडी मारली आहे. विधानसभा जिंकणाऱ्या आमदार राहुल जगताप यांना त्यांचाच कोळगाव गट राखता आला नाही. तेथे अजित पवार यांची सभा होऊनही त्यांना विजय मिळविता आला नाही. शिवाजीराव नागवडे यांनी त्यांचे मतदारसंघ तरी राखले. पण कॉंग्रेस केवळ एका बेलवंडीपुरतेच मर्यादित राहिला. आढळगाव गटात बाळासाहेब गिरमकर व बाळासाहेब नाहाटा या नेत्यांच्या पत्नी पराभूत झाल्या. मांडवगण गटात आमदार अरुण जगताप यांनी सुनेच्या माध्यमातून मिळविलेला विजय हा नक्कीच चर्चेचा आहे. तेथे बाबासाहेब भोस यांच्या सुनबाईंसाठी मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली, पण तरीही ते त्यांचा पराभव वाचवू शकले नाहीत. पाचपुते यांना हा विजय नक्कीच टॉनिक देणारा असून, काहीच नसताना त्यांच्यामागे लोक उभे राहिल्याने विरोधकांसाठी धोक्‍याची घंटा आहे. काष्टी गटातून बबनराव पाचपुते यांचे बंधू सदाशिव पाचपुते यांची उमेदवारी वादग्रस्त होऊनही ते विजयी झाले. 
पारनेर तालुका ः सुजित झावरेंना दणका 
पारनेर तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पाचपैकी शिवसेनेला दोन, तर राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि भाकपला प्रत्येकी एक जागा मिळाल्या. पंचायत समितीत कर्जुले हर्या, अळकुटी, राळेगण सिद्धी आणि जवळा गणात शिवसेनेने भगवा फडकविला. राष्ट्रवादीने अळकुटी, सुपा, टाकळी ढोकेश्वर आणि भाळवणी गणात विजय मिळविला. कॉंग्रेसला कान्हूर पठार आणि निघोज गणात विजय मिळविला. अतिशय अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत टाकळी ढोकेश्वर गटातील राष्ट्रवादीचे नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांचा शिवसेनेचे काशिनाथ दाते यांनी अवघ्या 362 मतांनी निसटता पराभव केला. पंचायत समितीत शिवसेनेला चार, तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाला आहेत. कॉंग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचे दोन उमेदवार ज्यांना पाठिंबा देतील त्यांचीच सत्ता पंचायत समितीत येणार आहे. 
राहुरी तालुका ः भाजपचा पत्ताच कट 
राहुरी तालुक्‍यातील पाच गटांपैकी तीन गटात कॉंग्रेसने बाजी मारली. राष्ट्रवादी कॉंग्रेसने दोन गटात विजय मिळविला. राहुरी पंचायत समितीत सत्तांतर झाले. दहा गणांपैकी सहा गणांत राष्ट्रवादीने बाजी मारली. सत्ताधारी कॉंग्रेसला चार गणांत विजय मिळाला. भाजप व शिवसेनेला खातेही उघडता आले नाही. निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. तनपुरे-शिवाजी गाडे यांच्या एकत्र येण्यामुळे राष्ट्रवादीने पंचायत समितीत सत्ता मिळविली. वांबोरीतून शशिकला पाटील व उदयसिंह पाटील या माता-पुत्राचा विजय लक्षवेधी ठरला. राहुरी विधान सभा मतदार संघाचे आमदार शिवाजी कर्डिले (भाजप) यांच्या गटाला एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. 
कर्जत व जामखेड  ः पालकमंत्र्यांचे वर्चस्व कायम 
कर्जत तालुक्‍यात चार गटांपैकी भाजपने दोन गट मिळविले. इतर दोन गटांपैकी राष्ट्रवादीने दोन गटांवर वर्चस्व मिळविले. त्यामुळे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. कॉंग्रेसला तर खातेही उघडता आले नाही. जिल्ह्यात फोर्टी प्लसचा नारा देणाऱ्या पालकमंत्री प्रा. शिंदे यांना त्यांच्याच मतदार संघ एकसंघ ठेवता आला नाही, हे यानिमित्ताने पुढे आले. 
जामखेड तालुक्‍यात दोन गट आहेत. तेथे दोन्हीही भाजपने जिंकले. पंचायत समितीतही चारही गण भाजपने जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. 
श्रीरामपूर तालुका ः मुरकुटेंचे स्वप्न भंगले 
श्रीरामपूर तालुक्‍यात जिल्हा परिषद व पंचायत समितीत मतदारांना पुन्हा सत्तेचा समतोल साधला. चौरंगी झालेल्या लढतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेला खातेही खोलता आले नाही. कॉंग्रेसचे माजी आमदार जयंत ससाणे व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या गटाला बंडखोरीचा फटका बसला. मुरकुटे यांच्या स्नुषा डॉ. वंदना यांचा विजय विरोधकांना धक्का देणारा ठरला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांमुळे मुरकुटे यांचे एकहाती सत्ता मिळविण्याचे स्वप्न भंगले. 
अकोले तालुका ः राष्ट्रवादीला फटका 
अकोले तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला जोरदार फटका बसला. पंचायत समितीवर प्रथमच भाजप-शिवसेनेची सत्ता आली. पंचायत समितीत भाजप, सेना, राष्ट्रवादी या तीनही पक्षांना प्रत्येकी तीन जागा मिळाल्या आहेत. जिल्हा परिषद गटातही भाजपने तीन व शिवसेनेने एक जागा जिंकून राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेच्या अवघ्या दोन जागा मिळाल्या आहे. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य जालिंदर वाकचौरे हे विजयी झाले आहेत. मात्र अगस्ती साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक शेळके यांना पराभवाचा धक्का बसला आहे. माजी मंत्री मधुकर पिचड यांना अकोले तालुक्‍यात चांगलीच चपराक बसली आहे. 
नेवासे तालुका ः गडाखांचेच वर्चस्व 
नेवासे तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या सात गटांपैकी माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या क्रांतिकारी पक्षाने पाच जागा मिळवीत तालुक्‍यावर वर्चस्व असल्याचे सिद्ध करून दाखविले. राष्ट्रवादी व भाजपला एका-एका जागेवर समाधान मानावे लागले. पंचायत समितीतही गडाख कुटुंबीयांचे वर्चस्व सिद्ध झाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT