Nana Patole meets Fadnavis sarkarnama
विश्लेषण

फडणविसांनी नानांना काॅफीचा आग्रह केला... पण `शब्द` नाही दिला...

ज्ञानेश सावंत

मुंबई : काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. आमदारांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या एका जागेसाठीची निवडणूक ही बिनविरोध करावी, यासाठी या दोघांत चर्चा झाली.

फडणवीस यांचे `सागर` हे शासकीय निवासस्थान आज घडामोडींचे केंद्र होते. पटोले यांची भेट झाल्यानंतर महाविकास आघाडीतील इतरही नेते त्यांना येऊन भेटले. नाना आणि फडणवीस हे दोघे एकमेकांचे राजकीय विरोधक असले तरी त्या दोघांमध्ये मैत्रीचे धागेही आहेत. नाना हे फडणविसांना अगदी एकेरी नावानेही हाक मारतात. नाना भेटायला आल्यानंतर दोघांत राजकीय गप्पाही झाल्या. नानांना काॅफी पिण्यासाठी फडणविसांनी आग्रह केला. मात्र नानांना हवा तो शब्द फडणविसांनी दिला नाही.

नानांनी त्यांना प्रज्ञा राजीव सातव यांची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपने सहकार्य करावे, अशी विनंती केली. भाजपने या जागेवर याआधीच संजय केनेकर यांना उमेदवारी दिली आहे. सातव यांची बिनविरोध निवड करण्यासाठी केनेकर यांना माघार घ्यावी लागणार आहे. पटोले यांनी या माघारीसाठी फडणविसांना विनंती केली. त्यावर आपल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून कळवू असे सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीवर दोन दिवसांपूर्वी भाष्य करताना काॅंग्रेसचे नेते फडणविसांकडे येतात, चहा पितात आणि बिनविरोध निवडणूक करून जातात, असे या वेळी होणार नसल्याचे सांगितले होते. राजीव सातव यांच्या राज्यसभेतील रिक्त जागेवर पोटनिवडणुकीचा संदर्भ याला होता. काॅंग्रेसने रजनी पाटील यांना या रिक्त जागेवर संधी दिली होती. त्यावेळी भाजपने विनाशर्त माघार घेऊन सहकार्य केले होते.

यात या वेळी बदल झाला. फडणविसांनी चहाऐवजी नानांना काॅफी दिली. मात्र दुसरा बदलही या वाटाघाटीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विधीमंडळाच्या गेल्या अधिवेशनात विधानसभेत भाजपचे बारा आमदार निलंबित करण्यात आले. या निलंबनाचा फेरविचार करण्याचे आश्वासन भाजप नेते हे महाविकास आघाडीकडून घेऊ शकतात. त्यानंतरच भाजप आपल्या उमेदवाराचा अर्ज माघार घेऊ शकतो. फडणीवस आणि नाना यांच्या काॅफीपानात यावर चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. नानांची भेट झाल्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनीही फडणवीस यांची भेट घेतली. त्या भेटितही या निवडणुकीवर आणि प्रामुख्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर चर्चा झाली. त्यात एसटीचा संप मिटविण्यासाठी फडणविसांनी सांगितलेल्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT