नवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या विरोधात काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी उघड बंड पुकारले होते. यामुळे मुख्यमंत्र्यांचा विरोध असतानाही सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपदी बढती देण्यात आली. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हाती घेताच पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना डिवचलं आहे. त्यांनी आपल्याच सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राज्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या वापराबाबत पंजाब पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने एक अहवाल तयार केला आहे. यावर कार्यवाही करण्यास सरकार विलंब लावत आहे. सरकारने हा अहवाल जनतेसमोर जाहीर केला नाही तर विधानसभेच्या पुढील अधिवेशनात मी याबाबत ठराव मांडणार आहे, असा इशारा सिद्धू यांनी दिला आहे. याचबरोबर शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रमसिंह मजिठिया यांच्या विरोधात काय कारवाई केली, याचीही माहिती सरकारने द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी मजिठिया आणि इतरांच्या विरोधात सक्त वसुली संचालनालयाने कारवाई केली होती. त्यांचे जबाब आणि या प्रकरणातील पुरावे उच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते. या प्रकरणी स्पेशल टास्क फोर्सने तपास करुन अहवाल उच्च न्यायालयाला सादर केला होता. यावर सरकारने अद्याप कार्यवाही केलेली नाही. यावरुन सिद्धू यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारला घरचा आहेर दिला आहे.
सिद्धू यांची नुकतीच पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. हिंदू आणि दलित असा समतोल साधत या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यात संगतसिंग गिलझियान, सुखविंदरसिंग डॅनी, कुलजित नागरा आणि पवन गोयल यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.