विश्लेषण

नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द - साहित्य संमेलनाच्या यजमान संस्थेने पाठविला ई-मेल

सरकारनामा ब्युरो

यवतमाळ : 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटन समारंभात 'कथित संभाव्य गोंधळा'मुळे आपण संमेलनाच्या उद्‌घाटन समारंभाला येऊ नये, असे पत्र साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना पाठविले आहे. यामुळे यवतमाळ येथे होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन कोण करणार? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

येत्या 11 जानेवारीपासून यवतमाळ येथे हे साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाचे उद्‌घाटन इंग्रजीच्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार होते. गेल्या काही दिवसांपासून या संमेलनाच्या आयोजनावरूनच गोंधळ घातला जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या होत असल्याने साहित्य संमेलनावर एवढी उधळपट्टी कशासाठी असा युक्तीवाद काहींनी केला. नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीला मनसेच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला. इंग्रजी साहित्यिक मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनासाठी कशासाठी? असा सवाल उपस्थित करून साहित्य संमेलनातच गोंधळ घालण्याचा इशारा दिला होता. 

या गोंधळाची तीव्रता लक्षात घेऊन अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी नयनतारा सहगल यांना ई-मेल पाठवला आहे. यात या उद्‌घाटन समारंभाला आपण येऊ नये, अशी विनंती केली आहे. याला या साहित्य संमेलनाचे आयोजक पद्माकर मलकापुरे यांनी पुष्टी दिली आहे. 

नयनतारा सहगल यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार नाही तर कुणाच्या हस्ते उद्‌घाटन होईल, हा प्रश्‍न कायम आहे. मलकापुरे यांनी या संदर्भात आता काहीच ठरलेले नसल्याचे सांगितले. या संदर्भात वेळेवर निर्णय घेतला जाईल, असे मलकापुरे यांनी स्पष्ट केले. या संदर्भात अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी याबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचे 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT