विश्लेषण

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदल होणार, पराभूत उमेदवारांना पक्षात नवी जबाबदारी मिळणार...

सरकारनामा ब्युरो

चिपळूण : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पराभूत आमदारांवर पक्षाची जबाबदारी देवून त्यांना सक्रिय ठेवण्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला आहे. त्यानुसार दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांच्याकडे नवीन जबाबदारी येण्याची शक्‍यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडली. मात्र, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला करिष्मा दाखवत तिसऱ्या क्रमांकाचे आमदार निवडून आणले. राज्यात राष्ट्रवादीला बळ मिळाले ते कायम ठेवण्यासाठी शरद पवार यांनी नुकतेच मुंबईत घेतलेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाच्या नेत्यांना काही सूचना केल्या. 

एमआयएम आणि वंचित आघाडी राज्याच्या निवडणुकीत उतरली होती. मुस्लिम समाज एमआयएमकडे फार वळला नाही. तो कॉंग्रेस आघाडीबरोबरच राहिला. मात्र, दलित समाजाची मते राष्ट्रवादीपासून दुरावली आहेत. ती पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे वळतील, याकडे लक्ष देण्याची सूचना पवारांनी केली आहे. त्याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासाठी तेथील पराभूत आमदारांना सक्रिय करून त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी देण्याची सूचना पवारांनी केली आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीचे आमदार संजय कदम यांचा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या पुत्रासमोर पराभव झाला. आमदार योगेश कदम यांना कदमांनी कडवी झुंज दिली होती. पक्षबांधणीसाठी पवारांनी केलेल्या सूचनेनूसार आता संजय कदम यांच्याकडे पक्षाची कोणती जबाबदारी येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय कदम विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले असले तरी निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून ते मतदारसंघात सक्रिय आहेत. पक्षाने त्यांना मोठी जबाबदारी द्यावी, अशी आमचीही मागणी आहे. मात्र, याबाबतचा सर्वस्वी निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि वरिष्ठ नेते घेतील असे रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT