Sharad-Pawar-Rahul-Gandhi
Sharad-Pawar-Rahul-Gandhi 
विश्लेषण

राहुल गांधींशी विलिनीकरणावर कुठलीही चर्चा झाली नाही : शरद पवार

अनंत बागाईतकर

नवी दिल्ली : " राहुल गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेत कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात विलीनीकरणाचा विषय आलाच नाही. या विषयावर कुठलीही चर्चा झाली नाही,'' असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. 

कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शरद पवार यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे 55 मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर प्रसारमाध्यमांत राष्ट्रवादी कॉंग्रेस कॉंग्रेस पक्षात विलीन होणार, शरद पवार कॉंग्रेसचे अध्यक्ष होणार अशा बातम्या येऊ लागल्या. 

या संदर्भात शरद पवार यांना विचारले असता त्यांनी या विषयावर कुठलीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. श्री. शरद पवार म्हणाले, " लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत आमच्या दोघांत चर्चा झाली. राजकारणात चढ-उतार होत असतात, त्यामुळे नाउमेद व्हायचे नसते असे मी त्यांना सांगितले. राजीव गांधी यांना जनतेने खूप मोठे पाठबळ दिले होते. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली 400 पेक्षा जास्त कॉंग्रेसचे खासदार निवडून आले होते. पण 1989 मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे राजकारणात हार-जीत होतच असते असे मी त्यांना समजावले.'' 

श्री. शरद पवार पुढे म्हणाले, " लोकसभा निवडणुकीनंतर आता चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका समोर आहेत. महाराष्ट्र, हरियाना, झारखंड आणि दिल्ली या चार राज्यातील निवडणुकांबाबत आमच्यात सविस्तर चर्चा झाली.'' 

राहुल गांधी शरद पवार यांची भेट झाल्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटण्यासाठी गेले आहेत. तर शरद पवार सायंकाळी मुंबईला येणार आहेत, असे समजते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT