विश्लेषण

कवठेमहांकाळ तालुक्‍यात राष्ट्रवादीच्या नेत्याचा खून

सरकारनामा ब्युरो

सांगली : कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते मनोहर बापू पाटील (वय 50, हरोली, ता. कवठेमहांकाळ) यांचा पूर्ववैमनस्यातून भोसकून खून करण्यात आला. देशिंग-बोरगाव रस्त्यावर गुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी मध्यरात्रीपासूनच तपासाची चक्रे फिरवून तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची आता कसून चौकशी सुरू आहे. 

अधिक माहीती अशी, देशिंग-बोरगाव रस्त्यावर गुरूवारी एका शेतात ऊस तोड सुरू होती. सायंकाळी मनोहर पाटील तेथील कामगारांबरोबर चर्चा करत थांबले होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी अचानक येऊन त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यात पाटील गंभीर जखमी होऊन खाली पडल्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. जखमी पाटील यांना स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने मिरज येथील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचार सुरू असतानाच पाटील यांचा मृत्यू झाला. 


मनोहर पाटील यांचे मूळ गाव हरोली आहे. उपसरपंच म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेल्या पाटील यांनी 2017 मध्ये पंचायत समिती निवडणूक लढवली होती. सभापतीपदही त्यांनी भूषवले होते. महांकाली कारखान्याचे ते विद्यमान संचालक होते. तसेच नानासाहेब सगरे ऊस तोडणी वाहतूक संस्थेचे अध्यक्ष होते. मनोहर पाटील यांचा निर्घृण खून केल्याची बातमी गुरूवारी मध्यरात्री सर्वत्र पसरली. त्यानंतर आज सकाळपासून राजकीय वर्तुळात या खुनाची चर्चा 
होती. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची शक्‍यता असल्यामुळे कवठेमहांकाळ पोलिसांनी रात्रीपासूनच तपासाची चक्रे फिरवून तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. आज सकाळपासून तिघांची कसून चौकशी सुरू होती. तिघे संशयित हरोली गावचे आहेत. पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी आज कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यास भेट देऊन तपासाबाबत माहिती घेतली. प्राथमिक तपासात पूर्ववैमनस्यातूनच पाटील यांचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT