ncp leader nawab malik slams petroleum minister dharmendra pradhan
ncp leader nawab malik slams petroleum minister dharmendra pradhan 
विश्लेषण

ओएनजीसी बार्ज दुर्घटनेला जबाबदार कोण? पेट्रोलिमय मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी उत्तर द्यावे!

वृत्तसंस्था

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेल्या तौते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) ऑईल अँड नॅचरल गॅसची (ONGC) बार्ज बुडाली होती. या बार्जवर तब्बल 261 कर्मचारी होते. यातील 186 जणांची नौदलाने (Navy) सुटका केली. या बार्जवरील 38 कर्मचारी चार दिवसांनंतरही अद्याप बेपत्ता असून, 37 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. या दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

ओएनजीसीची तेल उत्पादन करणारी बार्ज पी-305 आज चक्रीवादळामुळे मुंबईपासून 34 सागली मैल अंतरावर बॉम्बे हाय येथे सुरक्षित अंतरावर उभी करण्यात आली होती. परंतु, चक्रीवादळामुळे तिचा अँकर सुटला आणि ती समुद्रात भरकटली आणि बुडाली. त्यावेळी बार्जवर 261 कर्मचारी होते. अखेर नौदलाला तातडीने संदेश पाठवण्यात आला. नौदलाच्या जहाजांनी मदत कार्य सुरू केले. आतापर्यंत 186 जणांची सुखरुपपणे सुटका करण्यात आली आहे. तसेच, 37 मृतदेह हाती लागले आहेत. अजून 38 कर्मचारी बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. 

या दुर्घटनेविषयी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, या दुर्घनेला जबाबदार असणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करायला हवी. या प्रकरणी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी स्वीकारुन उत्तर द्यायला हवे. चक्रीवादळाचा इशारा असतानाही त्यानुसार ओएनजीसीने पावले का उचलली नाहीत. स्थानिक प्रशासनाने किनारपट्टी भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते. याचबरोबर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला होता. असे असतानाही हा इशारा ओएनजीसीने का ऐकला नाही. कोणत्याही सुरक्षाविषयक उपाययोजना ओएनजीसीने केल्या नाहीत. वादळाआधी कर्मचाऱ्यांना बार्जवरुन किनाऱ्यावर आणण्याचे कामही कंपनीने केले नाही. 

ओएनजीसीच्या चुकीमुळे निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. अद्याप अनेक जण बेपत्ता आहेत. नौदल आणि किनारा रक्षक दल त्यांचा शोध घेत आहेत. ओएनजीसीच्या बार्जवरील कर्मचारी हलवण्याचा निर्णय वेळीच न घेणाऱ्यांवर कारवाई करायला हवी. याला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा द्यायला हवी. या दुर्घटनेची जबाबदारी पेट्रोलियम मंत्रालयाचीही आहे, असे मलिक यांनी सांगितले. 

बार्ज पी -305 ही बार्ज बुडाली होती तर गॅल कन्स्ट्रक्टर आणि सपोर्ट स्टेशन या बार्जही भरकटल्या होत्या. गॅल कन्स्ट्रक्टरवरील 137 कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे.  सपोर्ट स्टेशन-3 वर 201 कर्मचारी होते. याचबरोबर ओएनजीसीचे तेल उत्पादनासाठी ड्रिलिंग करण्यास वापरण्यात येणारे जहाजही भरकटले आहे. त्यावर 101 कर्मचारी होते. हे सर्व कर्मचारी सुखरुप असून, त्यांची सुटका करण्यात आली आहे. 

नौदलाकडून युद्धपातलळीवर बचावकार्य सुरू आहे. हे बचावकार्य दिवसरात्र सुरू असून, यात नौदलाची अनेक जहाजे सहभागी झाली आहेत. याचबरोबर अनेक सी किंग हेलिकॉप्टरचाही यात समावेश आहे. किनारा रक्षक दल आणि ओएनजीसीच्या जहाजांच्या मदतीनेही शोधकार्य सुरू आहे. बुडालेल्या पी-3-75 बार्जवरील कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मोठी शोधमोहीम सुरू आहे. 

ओएनजीसी समुद्रात खोदकाम करुन तेलाचे उत्पादन घेते. अरबी समुद्रात यासाठी बार्जचा वापर केला जातो. या बार्जवरील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी हेलिकॉप्टरमधून नेले जाते. ओएनजीसी अशा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दिवसाला 50 हजार बॅरलपर्यंत तेलाचे उत्पादन घेते. बॉम्बे हाय हे अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या मालकीचे तेलक्षेत्र आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT