Bihar cabinet power balance : बिहारमध्ये नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची तर २६ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, आता कोणतं खातं कोणत्या पक्षाच्या मंत्र्यांना मिळणार, यावरून ‘एनडीए’मध्ये चढाओढ सुरू असल्याची चर्चा आहे. प्रामुख्याने सर्वात महत्वाचे गृह खाते कुणाकडे जाणार, यावरूनच उलटसुलट चर्चा आहेत. पण या खात्याचा एक इतिहासही आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता भाजपकडून गृह खाते आपल्याकडे राहावे, यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते. नितीश यांनी महाआघाडीची साथ सोडत मागीलवर्षी एनडीएमध्ये प्रवेश केल्यानंतर पाच दिवस नव्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप झाले नव्हते. यावेळीही भाजप आणि जेडीयूमध्ये ही कसरत सुरू राहणार असल्याने खातेवाटपाला विलंब होण्याची शक्यता आहे.
मागीलवर्षीही भाजप गृहखात्यासाठी आग्रही होती. पण ‘सुशासन बाबू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीश कुमार यांनी भाजपला दाद दिली नव्हती. त्यांनी हे खाते स्वत:कडेच ठेवले. यावेळीही तसेच होईल, असेच वाटते. कारण नितीश कुमार मुख्यमंत्री असताना एकदाही गृहखाते अन्य कोणत्याही मंत्र्यांकडे देण्यात आलेले नाही. नितीशबाबूंनी हे खाते आपल्याकडे ठेवले आहे.
बिहारमधील नितीश कुमार यांच्या काळातील गृहखात्याचा हा इतिहास पुढील पाच वर्षे कायम राहण्याचीच दाट शक्यता आहे. मात्र, तरीही भाजप नितीश कुमार यांच्यावर दबाव टाकण्याची शक्यता आहे. सलग दोन निवडणुकांमध्ये कमी जागा असतानाही भाजपने जेडीयूला मुख्यमंत्रिपद दिले. भाजपने कोणतेही आढेवेढे न घेत नितीश कुमार यांना मान दिला, याची आठवण भाजप नेत्यांकडून दिली जाईल.
आता यावेळी नितीश कुमार यांची परतफेड करण्याची वेळ आहे, अशी भावनिक साद नितीश कुमार यांना भाजपकडून घातली जाऊ शकते. पण नितीश कुमार त्याला कितपत दाद देणार, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. कारण राज्यात भाजपच्या हाती सत्तेची नाडी असली तरी अजूनही केंद्रात नितीश कुमार यांच्या टेकूवरच मोदी सरकार उभे आहे, ही आठवणही जेडीयूचे नेते भाजपला करून देतील.
गृहमंत्रिपदाची परंपरा मोडित काढण्याचे मनुसबे नितीश कुमार यशस्वी होऊ देतील की नाही, हे पुढील काही तासांत स्पष्ट होईल. पण राजकीय विश्लेषकांच्या मते बिहारमधील ‘जंगलराज’ला मुठमाती देण्यात नितीश कुमार यांच्याकडील गृहखाते कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. राज्यातील गुन्हेगारी कमी करण्यात त्यांना काही प्रमाणात यश आणले आहेत. यावेळी निवडणुकीच्या प्रचारात लालूंच्या काळतील जंगलराजचा उल्लेख खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही करत होते. त्याचवेळी ते एनडीए सरकारचे कौतुक करत होते. साहजिकच याचे क्रेडिट नितीश कुमार यांनाच द्यावे लागेल.
बिहार जंगलराजमधून बाहेर पडल्याचा दावा एनडीएकडून केला जात आहे. असे असताना नितीश कुमार हे खाते सोडणार नाहीत. त्यांना सुशासन बाबू ही प्रतिमा कायम ठेवायची असेल तर ते हे खाते पुन्हा आपल्याकडेच ठेवतील. त्यासाठी इतर खात्यांमध्ये तडतोड करायलाही ते मागेपुढे पाहणार नाहीत. यावेळी नितीश कुमार यांनी भाजपच्या बरोबरीने जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली आहे. या ताकदीसमोर भाजप नतमस्तक होणार की नितीश कुमार झुकणार, हे लवकरच दिसेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.