NEET Paper Leak : NEET-UG पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवरून देशभरात आंदोलनाचे लोण उठले आहे. कॉक्रोच जनता पार्टी, पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक, देशभरातील विरोधी पक्षातील नेते आणि मोठ्या प्रमाणावरती तरुण-तरुणी रस्त्यावर उतरले आहेत. विरोधक आणि आंदोलकांकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवला आहे. या सर्वात मोठ्या राजकीय वादळात पक्षाने त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. ही केवळ अपघाती गोष्ट नाही, तर ते भाजपसाठी आणि पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे यातून दिसून येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसाठी धर्मेंद्र प्रधान एवढे महत्त्वाचे नेते का आहेत, याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे -
अभाविप ते पक्ष संघटनेवरील मजबूत पकड :
धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून केली होती. ते भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षही राहिले आहेत. त्यामुळे देशभरातील संघ परिवार, विद्यार्थी संघटना आणि भाजपच्या संघटनात्मक जाळ्यावर त्यांची मजबूत पकड आहे. सन २००० पासून आमदार, खासदार व केंद्रीय मंत्री व २०२१ पासून देशाचे शिक्षणमंत्री आहेत. पक्षाच्या मूळ विचारसरणीशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले त्यांचे घट्ट नाते त्यांना राजकीयदृष्ट्या मजबूत बनवते.
भाजपचे अव्वल 'इलेक्शन मॅनेजर' आणि संकटमोचक :
धर्मेंद्र प्रधान यांची मुख्य ओळख पक्षातील सर्वात यशस्वी निवडणूक रणनीतिकार म्हणून आहे. त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, उत्तराखंड आणि छत्तीसगड यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि कठीण राज्यांमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली असून पक्षाला विजय मिळवून दिला आहे. पक्षांतर्गत किंवा निवडणुकीत कोणतीही कठीण परिस्थिती उद्भवल्यास मोदी-शाह जोडीचा त्यांच्यावरच सर्वात जास्त विश्वास असतो.
ओडिशाच्या विजयाचे शिल्पकार :
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ओडिशातील एकूण २१ मतदारसंघांपैकी भाजपने २० जागा जिंकले. शिवाय ओडिशा विधानसभा निवडणुकीतही नवीन पटनायक यांची २४ वर्षांची सत्ता उलथवून लावत भाजपने पूर्ण बहुमताने स्वतःचे सरकार स्थापन केले. या ऐतिहासिक यशामागे धर्मेंद्र प्रधान यांचे निवडणूक नियोजन व संघटनात्मक नेतृत्व होते.
पूर्व भारतात भाजपच्या विस्ताराचा मुख्य चेहरा :
भाजपसाठी पूर्व भारत (ओडिशा, पश्चिम बंगाल, पूर्वोत्तर राज्ये) राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. धर्मेंद्र प्रधान हे या संपूर्ण पट्ट्यातील भाजपचा सर्वात मोठा आणि शक्तिशाली ओबीसी चेहरा आहेत. ओडिशातही ४० टक्क्यांच्या आसपास ओबीसी समाज आहे. पश्चिम व मध्य ओडिशामध्ये ओबीसी राजकीय-सामाजिक दृष्टीने अत्यंत प्रभावशाली मानला जातो.
प्रधान यांचा जबरदस्त ट्रॅक रेकॉर्ड :
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे 'पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू' मंत्रालय होते. पंतप्रधान मोदी यांची सर्वात लोकप्रिय योजना समजली जाणारी 'उज्वला योजना' अत्यंत यशस्वीपणे तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनीच केले होते. त्यांच्या या धोरणात्मक आणि प्रशासकीय क्षमतेमुळे मोदींच्या विश्वासातील कॅबिनेट मंत्र्यांमध्ये त्यांचे स्थान पक्के झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजेंड्यावरील देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील सर्वात मोठा बदल म्हणजे 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' (NEP). हे धोरण देशभर लागू करण्याची आणि विविध राज्यांशी समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी धर्मेंद्र प्रधान यांच्यावरच सोपवण्यात आली आहे. हा प्रकल्प मधेच रेंगाळू नये यासाठी त्यांना या पदावरून हटवणे सरकारला परवडणारे नाही.
सरकारचा बचावात्मक पवित्रा :
याच ट्रॅक रेकॉर्डमुळे तपास पूर्ण होण्याआधी थेट कोणावरही कारवाई करणे योग्य नाही, असा बचावात्मक पवित्रा मोदी सरकारने घेतला असल्याचे दिसून येते. सध्या या प्रकरणात सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत तपास सुरू आहे. शिवाय आंदोलने किंवा विरोधकांच्या दबावामुळे मंत्र्याचा राजीनामा घेतल्यास 'प्रशासकीय चूक किंवा गैरव्यवहार' अधिकृतपणे मान्य केल्यासारखे होते, ज्यामुळे विरोधकांना मोठा राजकीय विजय मिळतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.