Jayant Patil-Dhananjay Munde
Jayant Patil-Dhananjay Munde Sarkarnama
विश्लेषण

पुढची निवडणूक जयंतरावांच्या नेतृत्वाखाली हवी : मुंडे, आव्हाड यांच्या मागणीने वेगळीच चर्चा

Yogesh Kute

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त इस्लामपूर येथे झालेल्या सभेला जोरदार प्रतिसाद मिळाला. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, (Dhananjay Munde), गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची जोरदार भाषणे झाले. मुंडे आणि आव्हाड यांनी जयंत पाटील यांच्याविषयी आदर व्यक्त करताना दोन्ही मंत्र्यांनी 2024 ची निवडणूक राष्ट्रवादीने जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढायला हवी, असा प्रेमळ आग्रह देखील धरला.

जयंत पाटील हे 2024 पर्यंत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहावेत, अशीही त्यांची भूमिका असल्याचे स्पष्ट झाले. पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली लढणार याचा अर्थ ते पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. या प्रश्नाचे उत्तर लगेच मिळणार नसले तरी मुंडे आणि आव्हाड यांच्या थेट मागणीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात मंगळवारी जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. जयंत पाटील यांच्या पुत्रांनी या सभेच्या आयोजनाची जोरदार तयारी करत आपलेही राजकीय कसब दाखवून दिले. जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेणारी फिल्म या वेळी सभेत दाखविण्यात आली. या फिल्मची माहिती आपल्याला नव्हती, असेही जयंतरावांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.

मुंडे यांनी या वेळी बोलताना जयंत पाटील यांच्या नेतृत्वगुणाचे कौतुक केले. ते कधीच चिडत नाहीत, हे त्याचे वैशिष्ट्य सांगत थंड डोक्याने ते समोरच्याचा करेक्ट कार्यक्रम करतात, असे मुंडे यांनी सांगताच टाळ्या पडल्या. विधीमंडळातही जयंत पाटील थंडपणाने समोरच्याचे ऐकत आपली प्रतिक्रिया कळून देत नाहीत. कार्यकर्त्यांना सांभाळून घेणारा हा नेता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने 2024 मध्येच त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवावी, अशी इच्छा असल्याचे मुंडे यांनी थेट सांगितले.

आव्हाड यांनीही पाटील यांच्या गुणांचे कौतुक करत सभेला जमलेल्या गर्दीतून पाटील यांच्यावर जनता किती प्रेम करते, हे समजते. कार्यकर्त्यांना धीर देणारा हा नेता आहे. मी गृहनिर्माणमंत्री बनणार आहे, हे त्यांनी शपथविधीच्या आधीच माझ्या कानात सांगितले होते, अशी आठवण आव्हाड यांनी या वेळी आवर्जून सांगितली. पाटील यांनीच 2024 च्या निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करावे, अशी सूचना त्यांनी केली.

पाटील यांनी राष्ट्रवादीला राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचा संकल्प सोडला आहे. पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या किमान 100 जागा निवडून आणण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यासाठीच त्यांनी राष्ट्रवादीचे प्रत्येक मतदारसंघात जाळे उभारण्यासाठीची तयारी केली आहे. त्यांच्या परिवार संवाद यात्रेची सांगता कोल्हापूर येथे 23 एप्रिल रोजी होणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने पाटील यांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला. सर्वाधिक दौरे करणारा मंत्री म्हणून त्यांची गेल्या अडीच वर्षांत नोंद झाली आहे. त्यांच्या या कष्टाचे फळ काय मिळणार, हे पुढील काही काळात कळेल.

या वेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की सत्तेत गेल्यानंतर मागे वळून बघण्याची भूमिका नसते. पण मी सत्तेत असतानाही पुन्हा कार्यकर्त्यांच्या दारी जाण्याचा निर्णय घेतला म्हणून हा राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व समाजाला पुढे घेऊन जाणारा हा पक्ष आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सर्व समाजाला पुढे घेऊन जाण्याचा विचार आम्हाला सर्वांना दिला आहे.

"इस्लामपूर तालुक्यातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली, माझ्या अनुपस्थितीत मतदारसंघ सांभाळला त्यामुळेच मी २०१९ च्या निवडणुकीत आणि त्यानंतर महाराष्ट्रात फिरून काम करु शकलो. तुम्ही आहात म्हमून मी आहे. मतदारसंघातील लोकांचे आशीर्वाद आहेत, म्हणून मी विधानसभेत जाऊ शकतो. हे सर्व शक्य झाले माझ्या मतदारांच्या विश्वासामुळे आणि ताकदीमुळे", अशा शब्दांमध्ये जयंत पाटील यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT