93 lack Unemployed in Maharashtra Not getting Allowance
93 lack Unemployed in Maharashtra Not getting Allowance 
विश्लेषण

राज्यातील 93 लाख बेरोजगारांना मिळेना भत्ता; दरमहा चार हजार कोटींची गरज 

तात्या लांडगे

सोलापूर  : सत्तेवर आल्यास राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा पाच हजारांचा भत्ता अन्‌ बळीराजाला कर्जमुक्‍त करण्याचे वचन शिवसेनेने दिले होते. तत्कालीन सरकारच्या सर्व्हेनुसार राज्यात 93 लाख सुशिक्षित बेरोजगार असून भत्ता देण्यासाठी दरमहा चार हजार 164 कोटी रुपये लागणार आहेत. तर सातबारा कोरा करण्यासाठी सुमारे एक लाख कोटींची गरज आहे. मात्र, राज्याची आर्थिक स्थिती बिकट दोन्ही आश्‍वासने अर्धवटच राहिली. या पार्श्‍वभूमीवर तीन लाख 50 हजार कोटींची महसूल सुट केंद्राने द्यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे.

अच्छे दिनचे स्वप्न दाखविताना मोदी सरकारने दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मितीचेही स्वप्न दाखविले. मात्र, 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये बेरोजगारांची संख्या सुमारे 38 लाखांची वाढली असून सोलापूर, नाशिक, नगर, औरंगाबाद, नागपूर, सांगली, कोल्हापूर व पुण्यात सर्वाधिक बेरोजगार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कृषी क्षेत्रात दोन कोटी 80 लाख जणांना रोजगार उपलब्ध आहे. मात्र, बहुतांश सुशिक्षित बेरोजगार सरकारी नोकरीचीच प्रतीक्षा करीत आहेत. 

चार-पाच वर्षांपासून नव्याने शासकीय नोकरी भरती नाही, आर्थिक मंदीमुळे खासगी क्षेत्रातील घटलेले रोजगार, या पार्श्‍वभूमीवर नव्या सरकारच्या वचननाम्यानुसार पाच हजारांचा भत्ता मिळेल, अशी त्यांना आशा आहे. बहूतांश बेरोजगारांनी डांबरीकरण, शेती, टोल नाका यासह अन्य ठिकाणी कामाला सुरवात केली आहे. महापोर्टलच्या माध्यमातून होणारी मेगाभरतीही आता थांबल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदतीचा हात पसरला आहे. केंद्राने राज्य सरकारला दोन वर्षाची महसूल सुट द्यावी, असा प्रस्ताव तयार केल्याची माहिती वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा पाच हजारांचा भत्ता देण्याचे वचन शिवसेनेने निवडणुकीपूर्वी दिले. मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बेरोजगारांना बाजूला सारुन सत्तेच्या माध्यमातून स्वत: रोजगार मिळवला. राज्यातील 83 लाख बेरोजगारांना भत्त्याची प्रतीक्षा असून मुख्यमंत्र्यांनी तो कधीपर्यंत मिळेल, जाहीर करावे - सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री, महाराष्ट्र

राज्याची स्थिती
सुशिक्षित बेरोजगार - 83.29 लाख
भत्त्याची रक्‍कम (दरमहा) - 4,164 कोटी
राज्याच्या डोक्‍यावरील कर्ज- 6 लाख 71 हजार कोटी
केंद्राला महसूल सुटीचा प्रस्ताव- 3 लाख 50 हजार कोटी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT