<div class="paragraphs"><p>Nana Patole- Balasaheb Thorat</p></div>

Nana Patole- Balasaheb Thorat

 

Sarkarnama 

विश्लेषण

काॅंग्रेसमध्ये सत्तानाट्य : एका मंत्र्याचा राजीनामा शक्य, पटोलेंना काय मिळणार?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधीमंडळाच्या अधिवेशनात (Assembly winter session) विधानसभा अध्यक्षांची निवड निश्चित मानली जात असतानाच या पदासाठीच्या इच्छुकांमुळे काँग्रेस श्रेष्ठींपुढे अडचणी आल्याने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मंगळवारी दिल्ली गाठली. यात काँग्रेसच्या एक मंत्र्याची विकेट पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. नाना पटोले हे मंत्रीपदासाठी पुन्हा इच्छुक झाले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत बऱ्याच घडामोडींची शक्यता आहे.

अध्यक्षपदासाठी आमदार संग्राम थोपटे यांच्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात आले. मात्र या निमित्ताने काॅंग्रेसमध्ये सत्तावाटपात बदल होण्याची चिन्हे दिसत असल्याचे मानले जात आहे. पटोले हे आज सकाळी दिल्लीत पोहोचले. ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार हे पण दिल्लीत होते. नागपूरमध्ये विधान परिषद निवडणुकीत उमेदवारीवरून जो घोळ झाला त्यावरून या तिघांना बोलविल्याची प्राथमिक चर्चा होती. मात्र विधीमंडळाच्या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड होणार असल्याने साहजिक त्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

पटोले यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मंत्रीपदाचे आश्वासन हायकमांडने दिले होते ,त्यानुसार आता महसूलमंत्रीपद आपल्या नेत्याला मिळावे असा नानाभाऊ पटोलेंच्या समर्थकांचा आग्रह असल्याचे बोलले जाते आहे. काही महिन्यांपूर्वी डॉ. नितीन राऊत यांचे ऊर्जा खाते पटोलेंना हवे होते असे बोलले जात होते. आता मात्र त्यांची नजर महसूलमंत्रीपदावर असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. पटोले यांचे राहुल गांधींशी उत्तम संबंध आहेत तसेच बाळासाहेब थोरात यांचेही असल्याने त्यांचे पद जाण्याची शक्यता दुरापास्त आहे. तरीही महसूल खाते मागून इतर दुसरे महत्वाचे खाते नाना मिळविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या आमदारांची बुधवारी सकाळी बैठक होऊन या बैठकीत अध्यक्षांचे नाव जाहीर होऊन पुढील दोन दिवसांत निवडणूक होऊ शकते.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी काँग्रेस आग्रही असून, त्यासाठी थोपटे यांचे नाव निश्चित केले होते. मात्र, हे पद मिळविण्यासाठी पक्षाचा एक ज्येष्ठ नेता इच्छुक असल्याने ऐनवेळी काँग्रेसच्या गोटात गोंधळ उडाल्याचे बोलले जात आहे. त्यातून हायकमांडशी चर्चा करून नाव जाहीर करू, असे काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारीच स्पष्ट केले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळीच पटोले दिल्लीला गेले. वरिष्ठ नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर या पदासाठी उमेदवार निश्चित केल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यासाठी सर्वच आमदारांची बुधवारी सकाळी बैठक बोलावून अध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी ‘व्हीप’ ही काढण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT