Sambhajiraje-Fadnavis Twitter/@SambhajirajeChhatrapti
विश्लेषण

संभाजीराजे यांना एकमेव आधार उरला तो मित्र मानलेल्या फडणविसांचा!

संभाजीराजे (Sambhajiraje) यांच्यासाठी आता शिवसेनेचा पर्याय बंद झाल्याचे स्पष्ट

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे (Sambhaji raje) यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे बंद झाल्यानंतर त्यांच्यापुढील पर्याय काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेने आपलाच उमेदवार राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उभा करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला महाविकास आघाडीतील काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस यांचा पाठिंबा मिळणे स्वाभाविक आहे. या दोन्ही पक्षांकडे जाऊन त्यांना उपयोग होणार नाही. त्यामुळे संभाजीराजे यांच्यासाठी एकमेव सध्या आधार हा भाजपचा आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा राहिला आहे. (Rajya Sabha election updates 2022)

भाजपकडे राज्यसभेच्या निवडणुकीत तब्बल 22 मते अतिरिक्त आहेत. त्यामुळे राजेंना निवडून येण्यासाठी भाजपने पाठिंबा दिला तरी आणखी 20 मतांची गरज असणार आहे. शिवसेनेचा उमेदवार आणि संभाजीराजे यांच्यात सहाव्या जागेसाठी लढत झाल्यास ती चुरशीची ठरू शकेल. दुसऱ्या प्राधान्य क्रमावर संभाजीराजे आपले पुढील खेळी करू शकतील. मात्र भाजप त्यांना पाठिंबा देणार का, हा आता प्रश्न आहे. याबाबत भाजपने आपले अद्याप पत्ते खुले केलेले नाहीत. संभाजीराजे यांच्या खासदारकीसाठी फडणवीस यांनीच मुख्यमंत्री असताना पुढाकार घेतला होता. दिल्लीत त्यांच्यासाठी नेहमीच व्हीआयपी ट्रिटमेंट मिळेल, अशी व्यवस्था फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या अनेक मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद फडणिवसांनी दिला होता. संभाजीराजे यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश व्हावा, यासाठीही त्यांनी प्रयत्न केला होता.

पक्षांनी मला पाठिंबा द्यावा पण त्यांच्या चौकटीत काम करणार नाही या भुमिकेमुळेच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेच्या निवडणुकीत सर्वच पातळीवर कोंडी झाल्याचे चित्र आहे. भाजपसोबतचा त्यांचा अनुभव पाहता इतर पक्ष त्यांना सहजासहजी पाठिंबा देण्याची शक्यता नाही. तथापि मराठा समाजाचा असलेला पाठिंबा, त्यातून त्यांची महाराष्ट्रभर निर्माण झालेली प्रतिमा आणि छत्रपती घराण्याचा वारस म्हणून यावर मार्ग निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.

श्री. संभाजीराजे यांना २०१६ मध्ये भाजपने राष्ट्रपती नियुक्त खासदारांतून राज्यसभेवर संधी दिली. पण त्यानंतरच्या कोणत्याही निवडणुकीत त्यांनी भाजपला सहकार्य केले नाही. भाजपने संधी देऊनही त्या पक्षाच्या चौकटीत काम करणार नाही यावर ते ठाम राहीले. मी स्वतंत्र विचाराने काम करणार पण मला पक्षांनी पाठिंबा द्यावा ही त्यांची भूमिकाच त्यांना अडसर ठरत आहे. पण सध्याचे राजकारण तसे नाही. त्यातही भाजपसोबतचा त्यांचा अनुभव चांगला नसल्याचे इतर पक्षांच्या नेतृत्त्वाला माहित आहे. त्यामुळे भाजप वगळता राज्यात सत्तेवर असलेल्या एकाही पक्षांकडून त्यांना पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जर-तर म्हणत सुरूवातीला पाठिंबा दिला, पण नंतर त्यांनीही घुमजाव केले. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला शिवसेनेने सहकार्य केले, त्यातून श्री. पवार यांच्यासह फौजिया खान यांचा राज्यसभेचा मार्ग सुकर झाला. त्यावेळीच पुढल्या निवडणुकीत (म्हणजे आताच्या) शिवसेनेला सहकार्य करण्याचा ‘शब्द’ श्री. पवार यांनी दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचा पाठिंब्याचा प्रश्‍नच नाही. काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ जेमतेम आहे, त्यातून त्यांचा एकच उमेदवार विजयी होतो, त्यामुळे त्यांच्यासही सहकार्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे केवळ शिवसेनेवर त्यांची राज्यसभेवरील निवड अवलंबून होती, पण तिथेही शिवसेनेने त्यांना पक्ष प्रवेशाची अट घातली. शिवसेनेत जायचे तर त्यांच्या चौकटीत काम करावे लागले, पक्षाच्या प्रचारात सक्रिय रहावे लागेल, पक्ष प्रमुखांच्या बैठकांना हजेरी लावावी लागेल, याला संभाजीराजे तयार नाहीत. त्यातून शिवसेनेतून त्यांना मदत मिळण्याची आशा संपुष्टात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT