विश्लेषण

पंकजा मुंडेंचे नक्की ठरलंय काय, समर्थकांच्या पोस्टमुळे पुन्हा चर्चांना उधाण

प्रा. प्रविण फुटके

परळी : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दीड महिना शांत असलेले जिल्ह्याचे राजकीय वातावरण मागच्या दहा दिवसांपासून ढवळून निघाले आहे. पंकजा मुंडे यांनी केलेली फेसबुक पोस्ट आणि मागच्या तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडीयावर "आमचे ठरले आहे' "जय महाराष्ट्र' या पोस्टमुळे राजकीय चर्चा अधिकच रंगात आली आहे. त्यामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमात पंकजा मुंडे समर्थकांशी संवाद साधणार की काही भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

दरम्यान, जयंती कार्यक्रमाला मागच्या काळात भाजपसह इतर पक्षांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी कोण नेते येणार याकडेही लक्ष लागले आहे. 
पंकजा मुंडे यांचा परळी मतदार संघातून 30 हजारांहून अधिक मतांनी धक्कादायक पराभव झाला. त्यांनी माध्यमांसमोर येऊन पराभव स्वीकारला. तेव्हापासून त्या जिल्ह्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, त्यांनी दहा दिवसांपूर्वी गोपीनाथराव मुंडेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थितीसंदर्भात आवाहन करणारी पोस्ट स्वत:च्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन टाकली. त्यातील काही शब्दांमुळे अनेक तर्क विकर्त लढविले जाऊ लागले. परंतु, वेगळी भूमिका घेण्याचे खंडन खुद्द पंकजा मुंडे यांनी केले. 

दरम्यान, आता आणखी तीन दिवसांपासून समर्थकांच्या सोशल मिडीयावर "आता आमचे ठरले आहे' "जय महाराष्ट्र' अशा पोस्ट व्हायरल केल्या जात असल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. इकडे भाजपातील ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण, ओबीसी नेत्यांच्या पराभवाला पक्षाकडूनच बळ दिले जात असल्याचे होत असलेले थेट आरोप, पक्षातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे थेट आरोप आणि राष्ट्रवादीसह शिवसेना नेत्यांच्या भेटी सुरु असताना या पोस्ट आणि सोमवारी औरंगाबाद येथील पक्षाच्या बैठकीला पंकजा मुंडेंची गैरहजेरी यामुळे आणखीच सस्पेन्स वाढला आहे. 

मात्र, तब्बेतीच्या कारणांनी गैरहजेरीचा खुलासा त्यांनी केला आहे. दरम्यान, गुरुवाच्या जयंती कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु असून येथे मोठी गर्दी जमेल असाही अंदाज आहे. यापूर्वी गोपीनाथगडावर गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी कोणाला बोलविले आणि हजेरी कोण लावणार, याकडेही लक्ष आहे. मेळाव्यात पंकजा मुंडे केवळ समर्थकांसोबत संवाद साधणार की काही भूमिका घेणार याकडेही लक्ष आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT