pankaja_munde
pankaja_munde 
विश्लेषण

मला रस्त्यावरून उचलून आणून मंत्री केलेले नव्हते : पंकजा मुंडे 

सरकारनामा

मुंबई : मी राजकारणात 15 वर्षांपासून आहे. मला रस्त्यावरून उचलून आणून मंत्री केलेले नव्हते. मी आमदार होते. मी भाजयुमोची प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केलेले होते. कोणी मला काही दिले हे म्हणू नये, अशा शब्दात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता टोला लगावला. 

गोपीनाथ गडावरील गाजलेल्या कार्यक्रमानंतर एबीपी माझा वृत्त वाहिनीशी बोलताना पंकजा मुंडे यांनी अनेक प्रश्‍नांची उत्तरे दिली. देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना कोअर कमिटीत घेतले, मंत्री केले, अशा आशयाचे विधान केले होते.

त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, कोअर कमिटीमध्ये माझ्याबरोबर इतरांनाही समाविष्ट केले होते. मी आधी आमदार म्हणून काम केलेले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मी राज्यभर पक्षासाठी संघर्ष यात्रा काढली होती. मी तेव्हा राज्यात पक्षासाठी 350 सभा घेतल्या होत्या. त्यामुळे कोणी मला काही दिले हे म्हणूच नये. 

गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर पंकजा मुंडे पुढे आल्या. त्यांचे कर्तृत्व काय? अशी टीका होत आहे. त्याला प्रतित्यूर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, अमिताभ बच्चन यांच्या मुलाने कितीही चांगले काम केले तरी लोक म्हणणार की वडिलांच्यामुळेच त्यांना काम मिळाले आहे. राजकीय नेत्यांच्या मुलांबाबतही असे बोलले जाते. गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर मी आमदार म्हणून निवडून आले तेव्हाच मी मला सिद्ध केले आहे. पण आता मी असे ठरवले आहे की वारंवार माझे कर्तृत्व काय आहे? हे विचारणाऱ्यांना मी पुन्हा शुन्यापासून सुरवात करून माझे कर्तृत्व दाखवून देईन. 

एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता आदींची तिकिटे कापली गेली त्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, मी कोअर कमिटीत होते परंतु मी ते थांबवू शकले नाही, याचे मला वाईट वाटते. एकनाथ खडसे सारख्या माणसाचे राजकीय अस्तित्व पणाला लागलेले असताना त्यांच्याकडून चांगले बोलण्याची अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे.

संघटनेला कठीण निर्णय घ्यावे लागतात. निर्दय व्हावे लागते. पण घेतलेल्या निर्णयाचे परिणाम असतात. बावनकुळे यांना तिकीट मिळाले नाही. त्याचा फटका पक्षाला विदर्भात बसला. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातही बसला. वंजारा समाजातही भाजपने फक्त मला एकटीला तिकीट दिले पण राष्ट्रवादी कॉंग्रेसने सात जागा दिल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT