sambhajiraje chhatrapati and raju shetty sarkarnama
विश्लेषण

Assembly Election 2024 : गल्लीत शेर घरात पावशेर, 'महाशक्ती'चे नेते कोल्हापुरच्या होमपिचवर 'परिवर्तन' घडवणार का?

Rahul Gadkar

लोकसभेनंतर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, असा तगडा सामना विधानसभेला रंगणार आहे. मात्र, राज्याला नवीन सक्षम पर्याय देण्यासाठी 'परिवर्तन महाशक्ती'ची घोषणा गुरूवारी स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, प्रहारच जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत केली. त्यामुळे राज्यात तिसरी आघाडी निर्माण झाली आहे. पण, कोल्हापुरातील दोन मातब्बर नेत्यांनी तिसरी आघाडी करण्यासाठी घेतलेली भूमिका त्यांच्या जिल्ह्यात अडचणीची ठरू शकते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असणारा शिरोळ विधानसभा मतदारसंघ सध्या अपक्ष आणि शिवसेना ( शिंदे गट ) घटक पक्षाचे ताकदवान असलेले आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसच्या तिकीटावर खासदार झाले आहेत. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati ) यांच्यासमोर पेच निर्माण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन प्रमुख नेत्यांचा होम पिचवरच 'करेक्ट कार्यक्रम' होण्याचा अंदाल व्यक्त केला जात आहे. शिवाय जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि ताकद आणि महायुतीच्या प्राबल्यावर 'परिवर्तन महाशक्ती'चे भवितव्य ठरणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद शिरोळ, राधानगरी आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात आहे. या तीनही मतदारसंघात महायुतीचे विद्यमान आमदार आहेत. तर, महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीतील मिळवलेले यश पाहता 'परिवर्तन महाशक्ती' या ठिकाणी अडचण निर्माण करेल का? हे उमेदवार निश्चिती नंतरच समोर येईल. 'परिवर्तन महाशक्ती'चा फटका महाविकास आघाडीला बसणार की महायुतीला बसणार हे उमेदवारावर अवलंबून असणार आहे.

शिवाय शाहुवाडी आणि वाळवा मतदारसंघात शेट्टी ( Raju Shetti ) हे दोन्ही आघाड्यांपुढे आव्हान निर्माण करू शकतात. मात्र, शिरोळमधून स्वत: दंड थोपटणार की कार्यकर्त्याला संधी देणार, याकडे देखील सर्वाचं लक्ष लागलं आहे. लोकसभेला शेट्टी यांना शिरोळमधून 67 हजारांचं मताधिक्य मिळालं होतं. मात्र, जर शेट्टी शिरोळमधून मैदानात उतरले, तर विजय मिळवण्यासाठी त्यांना एक लाखांचा टप्पा पार करावा लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात अडचण होणार ती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची. वडील श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसकडून खासदार आहेत. त्यामुळे काँग्रेसविरोधात ते किती उमेदवार उतरविणार? शाहू महाराज यांच्याविरोधात संभाजीराजे प्रचारासाठी उतरणार का? याबाबत साशंकता आहे.

संभाजीराजे यांचे राजकीय अस्तित्त्व असलेला एकही मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यात नाही. 'परिवर्तन महाशक्ती'च्या माध्यमातून स्वराज्य पक्षाच्या वाट्याला किती आणि कुठल्या जागा येणार? तिथे उमेदवार कोण असणार? हे पाहावं लागणार आहे. त्यासह कोल्हापुरातील विधानसभा ही राज्यात सर्वाधिक खर्चिक समजली जाते. हे चॅलेज संभाजीराजे कसे पेलणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT