विश्लेषण

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा नवा फंडा

उत्तम कुटे

पिंपरीः अजेंड्यावरील विषय महासभेत प्रथम मंजूर करायचा आणि नंतर त्यावर चर्चा वा खुलासा करायचा, तसेच आधी खर्च करून नंतर तो स्थायीकडे मान्यतेसाठी पाठवायचा, असा नवा फंडा पिंपरी-चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपने सुरु केला आहे. त्यामुळे पाशवी बहुमताच्या जोरावर लोकशाहीचे संकेत पायदळी तुडविणारा रेटून चाललेला हा कारभार अल्पावधीतच चर्चेचा विषय झाला आहे. त्याद्वारे पारदर्शक व स्वच्छ कारभारातून परिवर्तन घडवू पाहणाऱ्या भाजपचा खरा चेहरा समोर आल्याची सणसणीत चपराक विरोधकांनी लगावली आहे.

पालिकेचे यावर्षीचे  (2017-18) बजेट सार्वत्रिक निवडणुकीमुळे तीन महिने उशीरा सादर झाले. मात्र, चार हजार कोटींचे हे बजेट कुठलीही चर्चा न होता नुकतेच मंजूर करण्यात आले. त्यामुळे मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही विरोधी पक्षांनी सभात्याग केला. त्यानंतर बजेटवर चर्चा करण्याची खेळी झाली. अनुभवी विरोधकांनी बजेटची चिरफाड करू नये, असा हेतू सत्ताधाऱ्यांचा त्यामागे होता. मात्र, त्यातून लोकशाहीचा गळा घोटणारी ही घटना पालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपच्या राजवटीत नोंदली गेली. 

केंद्राच्या महत्वाकांक्षी अशा स्मार्ट सिटी योजनेत पुण्याच्या तुलनेत कितीतरी मागे पडलेल्या पिंपरी-चिंचवडने या प्रकल्पात शहरासाठी मल्टिपर्पज व्हेईकल कंपनी स्थापन करण्याचा विषयही असाच रेटून विनाचर्चा मंजूर केला.त्यामुळेही त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. सभा अध्यक्ष असलेले महापौर नितीन काळजे यांना नंतर त्यावर लटके व न पटणारे स्पष्टीकरण सभागृहाबाहेर देण्याची वेळ आली. त्यातून हे अगोदरच ठरले होते, हे दिसून आले.

महापौर अध्यक्ष असलेल्या पालिकेच्या आमसभेत (सर्वसाधारण सभा) भाजपचा असा रेटून कारभार सुरु असताना दुसरीकडे शिस्तशीर व प्रामाणिक कारभाराची छडी उगारलेल्या हेडमास्तर सीमा सावळे यांच्या स्थायी समितीसमोरही आमसभेचा कित्ता गिरविला आहे. तेथे खर्च झाल्यानंतर ते विषय मान्यतेसाठी येत आहेत. आषाढी वारीत दिंड्यांना दोन दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या साडेसहाशे ताडपत्र्यांच्या वीस लाख रुपयांच्या खर्चाच्या विषयाला मंजूरी देण्याचा विषय दोन दिवसानंतर आता बुधवारच्या (ता.21) स्थायी समितीच्या बैठकीच्या अजेंड्यावर आहे. या ताडपत्री खरेदीत आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप झाल्याने अगोदरच ती वादात सापडलेली आहे.महापुरुषांच्या जयंती,पुण्यतिथीनिमित्तच्या खर्चाचे व महोत्सवाचे विषयही ते झाल्यानंतर स्थायीसमोर येत आहेत.

यासंदर्भात सावळे व स्थायीतील त्यांच्या सहकारी आशा शेडगे यांनी खर्चानंतर विषयांना मंजूरी घ्यायचे खापर प्रशासनावर फोडले. वेळेत विषय आणा तसेच मुदत संपलेल्या कामांची निविदाप्रक्रिया वेळेत सुरु करा आणि वाढीव खर्चाचे प्रस्ताव देऊ  नका, असे वारंवार सांगूनही प्रशासनात सुधारणा होत नसल्याची अगतिकता स्थायीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी व्यक्त केली आहे. जयंती, पुण्यतिथीचे वेळापत्रक बनवून त्याचा कार्यक्रम सादर वेळेत मंजूरीसाठी द्या, असेही बजावण्यात आले आहे, असे त्या म्हणाल्या. वाढीव खर्चाचे विषय मंजूरीसाठी आणू नका, असे बजावूनही ते येत असल्याने त्याबाबत दक्ष असलेल्या शेडगे यांनी संताप व्यक्त केला. स्थायीच्या आगामी बैठकीच्या अजेंड्यावरही दोन मुदतवाढीचे आणि एक वाढीव खर्चाचा विषय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT