Congress women MPs controversy : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत मागील आठवड्यात अभूतपूर्व घटना घडल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान अनेकदा सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकले. त्यातही काँग्रेसच्या काही महिला खासदारांनी हातात बॅनर घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आसनापर्यंत जाणे, सत्ताधारी बाकांवरील खासदारांसह लोकसभा अध्यक्षा ओम बिर्ला यांना चांगलेच खटकले. या महिला खासदारांचा पंतप्रधानांवर हल्लाचा प्लॅन होता, असा गंभीर आरोप करण्यात आला. खुद्द बिर्ला यांनीही आपल्याला ‘खुफिया’ माहिती मिळाल्याचा दावा करत आपणच पंतप्रधानांना लोकसभेत येऊ नका, असे सांगितल्याचाही दावा केला. या घटनेची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे.
लोकसभेत सत्ताधाऱ्यांविरोधात यापूर्वीही विरोधकांकडून आक्रमक आंदोलन करण्यात आली आहे. कागदे फाडून भिरकावणे, बॅनरवाजी करणे, जोरदार घोषणाबाजी करणे, अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन कामकाज बंद पाडणे, पंतप्रधानांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत य़ेऊन घोषणाबाजी करणे, कागद भिरकारणे आधी घटना घडल्या आहेत. तशीच ४ फेब्रुवारीला लोकसभेत घडलेली घटना होती, असा दावा काँग्रेसचे नेते करत आहे. पण भाजपने या घटनेला थेट पंतप्रधानांवरील हल्ल्याचे षडयंत्र असा रंग दिला आहे. बिर्ला यांनीही भाजप नेत्यांच्या आरोपांना अधिकृतपणे दुजोरा दिला.
खरंतर लोकसभेचे सभागृह हे देशातील सर्वात सुरक्षित ठिकाण समजले जाते. संसदेच्या आवारात जाण्यापासूनच प्रत्येकाची कसून तपासणी होते. त्यातून खासदार सुटत नाहीत. त्यामुळे घातपात करण्यासारखे कोणतेही हत्यार आवारात घेऊन जाणे शक्य नाही. ४ तारखेला काँग्रेसच्या महिला खासदार हातात बॅनर घेऊन पंतप्रधान मोदींच्या आसनापर्यंत गेल्या होत्या. त्यामुळे त्या पंतप्रधानांवर नेमका कसा हल्ला करणार होत्या, याचे उत्तर एनडीएतील काही खासदारांनीच दिले आहे. हातातील बांगड्यांद्वारे हल्ला केला जाण्याची शक्यता होती, असे काहींचे म्हणणे आहे. एका नेत्याने तर महिला खासदार त्यांच्या दातांनी पंतप्रधानांना चावा घेऊ शकल्या असत्या, असा हास्यास्पद दावा हिंदी चॅनेलवर बोलताना केला होता.
सोशल मीडियातही बिर्ला यांच्या दाव्यांची जोरदार चर्चा झाली. त्यांचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी फेटाळून लावला असला तरी सरकारने हे गंभीरपणे घेणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदींनी या घटनेमुळे लोकसभेत भाषण देण्याचे टाळले. मात्र, त्यांनी राज्यसभेत भाषण ठोकत काँग्रेससह राहुल गांधींवरही जोरदार हल्ला चढविला. यावेळी त्यांनी काँग्रेस आपली ‘कब्र खोदना चाहती है’, असे धक्कादायक आरोपही केले. कदाचित ४ तारखेच्या घटनेच्या अनुषंगानेही ते हे बोलले असावेत. मग तर या घटनेची गृहमंत्री अमित शाह यांच्या ताब्यात असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून कसून चौकशी व्हायला हवी.
पंतप्रधान मोदी आणि शहांकडे ही चांगली संधी आहे. भाजपकडून होत असलेले आरोप खरे असतील तर याप्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. पंतप्रधानांवर हल्ल्याचे षडयंत्र रचले जाणे, तेही संसदेत हे देशालाही न शोभणारे आहे. बिर्ला यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे या घटनेची आधीच माहिती होती. मग त्यांनी त्याचवेळी याबाबत चौकशी सुरू करून कारवाईसाठी कठोर पावले उचलायला हवी होती. तातडीने केंद्रीय तपास यंत्रणा, दिल्ली पोलिसांना याची माहिती द्यायला हवी होती. संसदेच्या आवारातील सुरक्षाव्यवस्था बिर्ला यांच्याच अखत्यारित असते. त्यांनी लोकसभेत माहित देण्याआधी तातडीने या घटनेची चौकशी सुरू करायला हवी होती. त्यांनी तसे केले किंवा नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, आज या घटनेला चार दिवस उलटूनही तपास यंत्रणांकडून कोणताही हालचाल झाली नसल्याचे दिसते.
बिर्ला यांनी केला दावा खरा असेल तर काँग्रेसचे षडयंत्र उघडे पाडून मोदींना या पक्षापासून असलेला धोका सरकार जगासमोर आणू शकते. पण अद्याप तसे झाले नाही. यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरकारने अद्याप याबाबत गुन्हा का नोंदविला नाही, अद्याप या प्रकाराची चौकशी का सुरू केली नाही, संबंधित महिला खासदार कोण, याबाबत माहिती का उघड केली नाही, अध्यक्ष बिर्ला यांच्याकडे आधीच माहिती असताना त्यांनी संबंधित महिला खासदारांना लोकसभेत प्रवेश करण्यास मज्जाव करण्याबाबत सुरक्षा यंत्रणांकडे का आदेश दिले नाहीत, काँग्रेसच्या महिला खासदारांनी लोकसभेत आंदोलन करून ठरलेल्या कथित प्लॅननुसार गोंधळ निर्माण करावा, असेच बिर्ला यांच्यासह सरकारला वाटत होते का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे ठाकले आहेत.
या प्रश्नांची उत्तरे केवळ आणि केवळ चौकशीतून सत्य बाहेर आल्यानंतरच मिळू शकतात. तसे न झाल्यास लोकसभेतील घडलेल्या प्रकारावरून भाजप नेत्यांसह बिर्ला यांनी केले आरोप म्हणजे केवळ राजकीय आरोप होते, हेच सिध्द होईल. उलट काँग्रेसऐवजी मोदी सरकार आणखी बॅकफुटवर जाईल. विरोधकांच्या हातीही लोकसभा अध्यक्ष या प्रतिष्ठेच्या पदाविरोधात आयते कोलित हाती मिळेल. सर्व यंत्रणा हातात असलेल्या मोदी-शहा या चाणक्य जोडीला याची कल्पना नसेल का? विशेष म्हणजे देशभरातील भाजपचे नेते, पदाधिकारीही या घटनेनंतर शांत आहेत. कुठेही मोठे आंदोलन दिसले नाही. राहुल गांधी भाजपच्या एका शीख खासदाराला गद्दार म्हणाले. त्यावरून पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत राहुल यांच्यासह काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. दिल्लीतही भाजपने आंदोलन केले. पण पंतप्रधानांवर कथित हल्ल्याचा प्लॅनचा आरोप होऊनही भाजप रस्त्यावर उतरल्याचे आढळून आले नाही, ही शांतता काय सांगते?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.