Marathwada Graduate Elections counting news Beed
Marathwada Graduate Elections counting news Beed 
विश्लेषण

पोकळेंची चर्चा पोकळ ठरली; हवा केली मुंडेंनी .. 

दत्ता देशमुख

बीड : मराठवाडा पदवीधर मतदार संघातून भाजपमधून बंडखोरी केल्याने रमेश पोकळे चर्चेच्या केंद्रस्थानी राहीले. पण, मतांच्या बाबतीत सिद्धेश्वर मुंडे यांनी पोकळेंपेक्षा आघाडी घेतली. निवडणूक प्रचार आणि प्रत्यक्ष मतमोजणीपर्यंत बीड जिल्ह्यातील उमेदवार आणि पंकजा समर्थक रमेश पोकळे यांनी केलेली बंडखोरी राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती.

महाविकास आघाडीकडून निवडणुक लढलेले राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी महायुतीकडून लढलेल्या भाजपच्या शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव केला. बोराळकरांच्या तब्बल दुप्पट मते मिळवत सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅट्‌ट्रीक साधली आहे. पण, निवडणुक लागल्यापासून बीड जिल्हा या निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहीला.

राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आणि भाजपचे शिरिष बोराळकर यांच्यात दुरंगी लढत होईल हे सुरुवातीपासून जाणकरांचे मत होते. मात्र, आठ जिल्हे आणि ७३ तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या निवडणुकीच्या रिंगणातील ३५ पैकी तब्बल दहा उमेदवार बीड जिल्ह्यातील होते. निवडणुकीचा प्रचार आणि निकालावर नजर टाकली तर अख्ख्या उमेदवारांत दहा हजार मते पार करणाऱ्यांत विजयी उमेदवार सतीश चव्हाण यांच्यासह शिरीष बोराळकर आणि सचिन ढवळे हे तिघेच आहेत.

तर, उर्वरित ३२ उमेदवारांत केवळ दोघांनाच पाच हजारांचा पल्ला पार करता आला असून दोघेही बीड जिल्ह्यातील आहेत. मात्र, सुरुवातीपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या भाजपचे बंडखोर व अपक्ष रमेश पोकळे यांची घसरगुंडी झाली असून त्यांच्याहून अधिक मते अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर मुंडे यांनी मिळविली आहेत. पोकळेंना मराठवाडा शिक्षक संघाचाही पाठींबा मिळाला. तसेच अनेक वर्षांपासून शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात बड्या हुद्द्यावर काम करुनही मतदारांनी त्यांना नाकारले.

मात्र, ग्रामपंचायत ऑपरेटरांची संघटना बांधून त्यांच्या प्रश्नांसाठी झगडणाऱ्या सिद्धेश्वर मुंडे यांना लक्षणीय मते मिळाली. पोकळेंना ६७१२ मते मिळाली असून सिद्धेश्वर मुंडे यांनी ८०५३ मते मिळविली आहेत. भाजपने अनेक वर्षे जिल्हाध्यक्षपदासह आताही भाजप किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षपद व विविध पदे देऊन पोकळेंचा  सन्मान केला. पण तरीही त्यांनी बंडखोरी करत निवडणुक लढवून नेमके काय साध्य केले असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT