police arrest union minister narayan rane while he was eating
police arrest union minister narayan rane while he was eating 
विश्लेषण

केंद्रीय मंत्री असलेल्या राणेंना पोलिसांनी भरल्या ताटावरुन उठवलं! (पाहा व्हिडीओ)

सरकारनामा ब्युरो

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा सामना सुरू झाला आहे. अखेर राणेंना पोलिसांनी अटक केली आहे. राणेंच्या अटकेवरुन मोठा गदारोळ उडाला असून, त्यांना जेवण करतानाच ताब्यात घेण्यात आल्याचा दावा भाजपने केला आहे. याचा व्हिडीओही भाजपने समोर आणला आहे. 

राणेंना अटक करण्याची कारवाई सुरू होती त्यावेळी ते जेवण करीत होते. त्यांना जेवण पूर्ण करु न देताच पकडण्यात आले, असा दावा भाजपने केला आहे. याचा व्हिडीओ भाजपने जाहीर केला आहे. यात राणे हे हातात प्लेट घेऊन जेवण करताना दिसत आहे. त्यांचे जेवण सुरू असतानाच गोंधळाची सुरवात झाली. राणेंचे पुत्र निलेश राणे हे साहेब जेवत आहेत, त्यांना जेवण करु द्या, असे पोलिसांना म्हणत असल्याचे दिसत आहे. याचबरोबर राणेंचे समर्थक पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोचण्यापासून अडवत असल्याचेही दिसत आहे. 

भाजपने यावरुन महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्राची जनता सध्या अफगाणिस्तानचा अनुभव घेत आहे. महाराष्ट्रातल्या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या तालिबानी कारभारामुळे राज्यात लोकशाहीचा मुडदा पडला आहे, अशी टीका भाजपने केली आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी या कारवाईवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. 

राणेंना अटक करण्यासाठी अनेक ठिकाणच्या पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर त्यांनी रत्नागिरीतील न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने राणेंना जामीन देण्यास नकार दिला होता. तांत्रिक मुद्द्यावर हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. नाशिकमध्ये गुन्हा दाखल असताना रत्नागिरीत जामीन अर्ज का, या मुद्द्यावर हा अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर राणेंच्या वतीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जासाठी अर्ज करण्यात आला होता. परंतु, उच्च न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. यामुळे राणेंना अटक होणार हे स्पष्ट झाले होते. 

न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताच त्यांना ताब्यात घेण्यासाठी संगमेश्वरमधील गोळवली गावात पोलीस दाखल झाले होते. पोलिसांनी राणेंना ताब्यात घेतले. त्यांच्या अटकेची कारवाई पोलिसांनी केली. राणेंची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे पथकही दाखल झाले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर राणेंना अटक करुन पोलीस घेऊन गेले होते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT