Uddhav Thackeray, Prakash Ambedkar  Sarkarnama
विश्लेषण

'वंचित'ला हवी मुंबईत 'एन्ट्री'; ठाकरेंचा हात धरून आंबेडकरांचा होणार फायदा : अन्...

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar : पुन्हा एकदा राज्यात शिवशक्ती व भिमशक्तीचा प्रयोग होताना दिसून येत आहे.

मनोज भिवगडे

Uddhav Thackeray, Prakash Ambedkar : पुन्हा एकदा राज्यात शिवशक्ती व भिमशक्तीचा प्रयोग होताना दिसून येत आहे. अर्थातच हा प्रयोग सध्या प्राथमिक अवस्थेत असला तरी त्यातून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेचा (Shivsena) हात धरून मुंबईत 'एन्ट्री' मिळविण्याची तयारी चालविली आहे. महानगरपालिका निवडणुकीपूर्वी होऊ घातलेल्या या प्रयोगातून मुंबई बाहेर अकोल्यासह विदर्भात शिवसेनेसोबतच शहरी भागात पाय रोवू पाहणाऱ्या वंचित बहुजन आघाडीलाही त्याचा फायदा होणार आहे.

ही युती म्हणजे सर्व सामान्यांना सत्तेचे द्वार उघडणारी ठरणार असल्याने कोणताही राजकीय वारसा नसलेल्या सर्व सामान्य कार्यकर्ता युतीचा यशासाठी तुटून पडेल, असा विश्वास राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) माध्यमातून ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सन २०१९ ची विधानसभा निवडणूक व त्यापूर्वी लोकसभेची निवडणूक लढविली होती.

स्वबळावर राज्यभर प्रस्थापितांच्या विरोधात लढताना ॲड. आंबेडकर यांनी लोकसभेत ४७ लाख तर विधानसभेत तब्बल २६ लाख मते घेवून 'वंचितां'ची ताकद दाखवून दिली होती. गेले २५ वर्षे अकोल्यातील ग्रामीण राजकारणावर एकहाती सत्ता गाजविणाऱ्या या पक्षाने प्रखर विरोधानंतरही अकोला जिल्हा परिषदेतील सत्ता टिकविली होती.

मात्र, आता अकोल्याच्या सीमा ओलांडून राज्यातील राजकारणार प्रस्थापितांच्या विरोधात उभे होताना ॲड. आंबेडकर यांनी शिवशक्तीला सोबत येण्याची साद घातली आहे. एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना तर दुसरीकडे बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी.

दोन्ही बाळासाहेबांनी आतापर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, ज्यांच्या मागे कोणताही राजकीय वारसा नाही, राजकीय पार्श्वभूमी नाही, अशांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास हाच सर्वसामान्य कार्यकर्ता ठाकरे आणि आंबेडकर यांना सत्तेवर आणण्यासाठी जीवाचे रान केल्याशिवाय राहणार नाही.

शहरी भागात 'वंचित'ला एन्ट्री

अकोला जिल्ह्यातील राजकारणात ग्रामीण भागामध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वात वंचित बहुजन आघाडीने चांगला जम बसविला आहे. त्यामुळे गेले २५ वर्षांपासून जिल्हा परिषदेत त्यांची सत्ता कायम आहे. मात्र, शहरी भागात त्यांना हवा तसा जम बसविता आला नाही. विशेषतः महानगरपालिका क्षेत्रात. त्यामुळे शिवसेनेसोबतची युती ही केवळ ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी मुंबईतील 'एन्ट्री'चा दरवाजा उघडणार नाही तर विदर्भासह राज्यातील बहुतांश शहरी भागात 'वंचित'चे बळ वाढविणारी ठरणार आहे.

सहानुभूतीसोबत युतीचे बळ

बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे नेतृत्व करीत पक्षाला सत्ता मिळवून देणारे उद्धव ठाकरे यांना ज्या प्रकारे सत्तेवरून खाली खेचण्यात आले, त्यामुळे राज्यात त्यांच्या बाबतीत सहानुभूती आहे. या सहानुभूतीसोबतच ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीमागे असलेला मतांचा गठ्ठा शिवसेनेला बळ देवून जाईल, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT