BJP, Congress 

Sarkarnama

विश्लेषण

राजकीय भूकंप : राणे पिता-पुत्रांमध्ये होणार आता थेट लढत

राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणारी घोषणा माजी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) धामधूम सुरू आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आता गोव्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणारी घोषणा काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) यांनी केली आहे. त्यांनी आपलेच पुत्र भाजप (BJP) नेते व आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

गोव्याच्या राजकारणात आतापासूनच राणे पिता-पुत्राच्या या लढाईची चर्चा होऊ लागली आहे. पुत्राविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा करून प्रतापसिंह राणे यांनी सगळ्यांनाच धक्का दिला आहे. ते म्हणाले की, काँग्रेसचे पदाधिकारी आणि हितचिंतकांनी मला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची विनंती केली आहे. पोरीम मतदारसंघातून मी काँग्रेसकडून निवडणूक लढावी, असा त्यांचा आग्रह होता. यामुळे मी पोरीम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे.

प्रतापसिंह राणे हे दहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते गोव्याचे तब्बल सहा वेळा मुख्यमंत्री होते. आता त्यांनी पुत्राच्या विरोधातच निवडणूक लढण्याची घोषणा करुन राजकीय भूकंप घडवला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातले राजकीय वातावरण तापले आहे. यातच आता राणे-पिता पुत्रांच्या लढतीने त्यात भर पडली आहे. मुलाचा मतदारसंघ असलेल्या पोरीम मतदारसंघातून ते थेट आव्हान देणार आहेत.

मागील निवडणुकीत काँग्रेसला ४० पैकी १७ जागा मिळाल्या होत्या. सर्वाधिक आमदार काँग्रेसचे होते पण चकवा देत भाजपने सत्ता स्थापन केली होती. भाजपला मागील निवडणुकीत १३ जागा मिळाल्या होत्या. पण आता हा आकडा वाढला आहे. २०१७ च्या निवडणुकीनंतर लगेचच डॉ. विश्वजित राणे (Dr. Vishwjeet Rane) यांनी काँग्रेसला पहिला धक्का दिला होता. आमदारकीचा राजीनामा देत ते भाजपमध्ये दाखल झाले. पोटनिवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. सध्या ते आरोग्य मंत्री आहेत. त्यानंतर काही दिवसांत सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. दोघांनी मे २०१९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही विजय मिळवला.

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का तत्कालीन विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी दिला. जुलै २०१९ मध्ये कवळेकर यांनी त्यांच्यासह १० आमदारांचा गट काँग्रेसमधून बाहेर पडला. कवळेकर यांना देखील मंत्रिमंडळात जागा मिळाली. ते सध्या गोव्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ नेते लुईजिन्हो फालेरो यांनी देखील राजीनामा देत तृणमूलमध्ये प्रवेश केला. आता एवढे आमदार फुटल्याने काँग्रेसमध्ये सध्या केवळ २ आमदार उरले आहेत. त्यामध्ये विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि प्रतापसिंह राणे यांचा समावेश आहे.

SCROLL FOR NEXT