prime minister narendra modi takes second shot of covid vaccine
prime minister narendra modi takes second shot of covid vaccine 
विश्लेषण

पंतप्रधान मोदींनी कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला अन् म्हणाले...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशभरात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात मोदींनी पहिला डोस घेतला होता. त्यांनी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दुसरा डोस घेतला. 

मोदींनी पहिला डोस 37 दिवसांपूर्वी कोरोनाच्या कोव्हॅक्सिन लशीचा पहिला डोस एम्समध्ये घेतला होता. आज त्यांनी एम्समध्येच दुसरा डोस घेतला. मोदींना पहिला डोस देणाऱ्या नर्सेसनी त्यांना दुसरा डोस दिला. मुख्य नर्स पी. निवेदा आणि नर्स निशा शर्मा यांनी मोदींनी लस दिली. 

मोदींनी ट्विटरवर याची माहिती दिली आहे. मोदींनी ट्विटमध्ये लशीसाठी नोंदणी करण्याच्या को-विन अॅपची लिंकही दिली आहे. लस घेतल्यानंतर मोदींनी म्हटले आहे की, आज एम्समध्ये कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला आहे. कोरोना विषाणूला हरवण्यासाठी लस हा एक मार्ग आहे. तुम्ही लस घेण्यासाठी पात्र असाल लवकरात लवकर लस घ्या. 

1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जात आहे. यासाठी सरकारने नोंदणीचे दोन पर्याय ठेवले आहेत. यासाठी सरकारी को-विन अॅपवर ऑनलाइन नोंदणी करण्याचा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय हा प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याचा असेल. मात्र, प्रत्यक्ष नोंदणीसाठी नागरिकांना दुपारी 3 वाजल्यानंतर लसीकरण केंद्रावर जावे लागेल. 

जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. 

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली. तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. यातील कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर सरकारने वाढवून 6 ते 8 आठवडे केले आहे. याआधी या दोन्ही लशींसाठी दोन डोसमधील अंतर 4 आठवडे होते. त्यामुळे आधी पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी नोंदणी आपोआप होत होती. आता दोन्ही लशींच्या दोन डोसमधील अंतर वेगवेगळे असल्याने आपोआप नोंदणी बंद करण्यात आली आहे. नागरिकांना पहिला डोस घेतल्यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्या डोससाठी नोंदणी करावी लागेल. 

सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, आणखी सात कोरोना लशींवर काम सुरू असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT