puducherry assembly speaker and congress leader resigned citing health grounds
puducherry assembly speaker and congress leader resigned citing health grounds  
विश्लेषण

भावाचा भाजपमध्ये प्रवेश झाला अन् लगेचच काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा

वृत्तसंस्था

पुदुच्चेरी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुदुच्चेरीमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्ष व काँग्रेस नेते व्ही.पी.सिवाकोलूंधू यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या भावाने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सिवाकोलूंधू यांनी तातडीने राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. 

सिवाकोलूंधू यांनी पदाचा राजीनामा नायब राज्यपाल तमिलसाई सौंदरराजन यांच्याकडे सोपवला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते लॉस्पेट मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांचे बंधू व्ही.पी.रामलिंगम यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला. आमदारकीचा राजीनामा देणारे द्रमुकचे के.वेंकटेश आणि काँग्रेसचे के.लक्ष्मीनारायण यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याआधी राजीनामा देणारे आणखी दोन आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. आता सिवाकोलूंधू यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. 

काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर भाजप व इतर विरोधी पक्षांनीही सत्ता स्थापनेचा दावा न केल्याने पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. काँग्रेसच्या सरकारला विधानसभेत बहुमत सिध्द न करता आल्याने मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राजीनामा दिला होता. काँग्रेस आघाडीतील पाच आमदारांनी राजीनामा दिल्याने विधानसभेत सरकारला २२ फेब्रुवारीला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले. परंतु, बहुमत गाठण्यासाठी १४ आमदारांचा आकडा काँग्रेसकडे नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी सभागृहात भाषण करून विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याआधीच बाहेर पडले. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा नायब राज्यपालांकडे सोपवला होता. 

तमिळनाडू व पुदुच्चेरीमध्ये 6 एप्रिलला विधानसभा निवडणूक  होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडूमध्ये काँग्रेस व द्रमुक यांची आघाडी आहे. या दोन पक्षांचीच पुदुच्चेरीमध्ये सत्ता होती. एकूण ३० विधानसभा सदस्य असलेल्या पुदुच्चेरीमध्ये काँग्रेसचे १५ आमदार होते. काँग्रेसने द्रमुकच्या दोन आमदारांच्या पाठिंब्यानंतर बहुमताचा आकडा गाठला होता. 

भाजपचे तीन आमदार असले तरी ते निवडून आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नव्हता. तसेच निवडणुका जवळ आल्याने विरोधी पक्ष एवढ्या कमी कालावधीसाठी सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, हे स्पष्टच होते. भाजपकडून तसे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्रीमंडळाने पुदुच्चेरीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. 

Edited By Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT