Pune Graduate Election Sarkarnama
विश्लेषण

Pune Graduate Election: पुणे पदवीधरमध्ये 'भाजप'ची यंत्रणा सपशेल फेल : हर्षदा जाधवांच्या विजयाने पश्चिम महाराष्ट्रातून सर्वात मोठ्या पक्षाला धोक्याची घंटा

Pune Graduate Election Result: पुणे पदवीधर मतदारसंघातील हर्षदा जाधव यांच्या विजयाच्या विश्लेषणातून भाजपसमोरील आव्हाने, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा, नोकरभरतीतील विलंब आणि पश्चिम महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांचा आढावा घेण्यात आला आहे.

संभाजी पाटील

Pune Graduate Election Result 2026: सत्ता, प्रचंड आर्थिक व संघटनात्मक रसद आणि केंद्रासह राज्यात सत्ता असूनही भारतीय जनता पक्षाचा पुणे पदवीधर मतदारसंघात झालेला पराभव हा पदवीधरांनी भाजपला भविष्यासाठी दिलेला धोक्याचा स्पष्ट इशारा आहे. हा निकाल केवळ एका मतदारसंघाचा निकाल नसून, पश्चिम महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय वाऱ्याची आणि पदवीधर-युवा वर्गाच्या तीव्र असंतोषाची स्पष्ट पावती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अत्यंत कठीण परिस्थितीतही हा मतदारसंघ स्वतः कडे कायम ठेवून पक्षाला नवसंजीवनी दिली. महायुतीच्या अत्यंत तगड्या आव्हानाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अत्यंत शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने तोंड देत प्रस्थापितांच्या नाराजीचा फायदा घेतला. राष्ट्रवादीने हर्षदा जाधव हा युवा मतदारांना भावेल असा चेहरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवला, त्यामुळे भाजपला आपली रणनीती बदलावी लागली.

स्मिता जाधव या कोरी पाटी असणाऱ्या तगड्या उमेदवारास ऐनवेळी पक्षात घेऊन मैदानात आणले. पण विरोधकांची यशस्वी मोट बांधली गेल्याने हर्षदा यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. हर्षदा यांनी पहिल्या दिवसापासून दाखवलेली राजकीय शिस्त, तळागाळातील संवाद आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील लाटेचा घेतलेला अचूक अंदाज यामुळे हा ऐतिहासिक विजय साध्य झाला आहे.

भाजपला असंतोषाचा फटका

भाजपकडे मजबूत यंत्रणा होती. या मतदारसंघात सर्वाधिक आमदार, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, शिक्षण संस्था असे जाळे असल्याने ही निवडणूक सहज जिंकू असा आत्मविश्वास होता, पण जनमानसाचा कानोसा त्यांना शेवटपर्यंत लागला नाही.

पुणे हे महाराष्ट्राचे शैक्षणिक केंद्र आणि 'एमपीएससी' तसेच विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे माहेरघर आहे. मागील काही वर्षांतील परीक्षांचे गोंधळ, संथ गतीने होणारी नोकरभरती, आणि रस्त्यावर उतरलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे सत्ताधाऱ्यांनी दाखवलेली उदासीनता भाजपला महागात पडली. जेन-जी, एमपीएससी विद्यार्थी यांचा आंदोलनास हर्षदा यांनी पाठिंबा देत हा वर्ग आपल्याकडे वळविण्यात यश मिळवले. समाजमाध्यमांमध्ये भाजपविरोधी सूर सतत तेवत राहीला. हा वर्ग मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडला.

आयटी आणि औद्योगिक क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधींचे संथ प्रमाण आणि वाढत्या महागाईमुळे सुशिक्षित पदवीधरांमध्ये सत्तेत असलेल्या पक्षाविरुद्ध सुप्त संताप होता. पदवीधरांच्या मतपेटीत हा संताप स्पष्टपणे प्रतिबिंबित झाला. मतपत्रिकेसोबत आलेल्या चिठ्ठ्या याची साक्ष देतात. हा मतदारसंघ केवळ पुणे शहरापुरता मर्यादित नसून सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या कृषीप्रधान जिल्ह्यांपर्यंत पसरलेला आहे. उसाची एफआरपी, दुधाचे दर आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत मिळण्यास झालेला उशीर यांमुळे ग्रामीण पदवीधरांनी महायुतीच्या विरोधात ठाम भूमिका घेतली. गोकुळचा निर्णय याची साक्ष देणारा ठरला.

हर्षदा जाधव यांच्या पाठीशी शरद पवार यांची दूरदृष्टी, जयंत पाटील यांचे संघटन कौशल्य, कोल्हापुरात सतेज (बंटी) पाटील यांची ताकद, सांगलीत आमदार विश्वजित कदम यांचे पाठबळ आणि रयत शिक्षण संस्थेशी जोडलेले जाळे या सर्वांची एकत्र मोट बांधली गेली. प्रचार अत्यंत नियोजनबद्ध आणि संस्थात्मक पातळीवर राबवला गेला. रयत शिक्षण संस्थेची भूमिका निर्णायक ठरली.

भाजपकडे प्रचंड यंत्रणा आणि सत्ता असूनही स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमधील सुप्त नाराजी, उमेदवारी निवडीबाबतचा असंतोष आणि मतदारांशी थेट संवाद साधण्यात आलेले अपयश यामुळे भाजपची रणनीती सपशेल अपयशी ठरली.

हा निकाल केवळ एका आमदाराच्या निवडीपुरता मर्यादित नाही. तर तो शरद पवारांच्या पक्षाच्या पुनुरुज्जीवनावर आणि महाविकास आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्रातील मजबुतीवर शिक्कामोर्तब करणारा निकाल ठरला आहे.

सुशिक्षित आणि शहरी-ग्रामीण पदवीधर जर भाजपासून दूरावत असतील, तर आगामी निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा असेल. अर्थात ही जागा याआधी राष्ट्रवादीकडेच होती असे लंगडे समर्थन केले जाईल, पण ज्या परिस्थितीत हा विजय मिळवला तो महत्त्वाचा आहे.

तरुणांचे मुद्दे आणि बेरोजगारीचा प्रश्न घेऊन मैदानात उतरल्यास सत्ताधाऱ्यांना पराभूत करता येते, हा वस्तुनिष्ठ धडा या निकालाने विरोधकांना दिला असून, त्यातून ते काय शिकणार हेही महत्त्वाचे ठरेल.

मागील विजेते उमेदवार आणि पक्षीय वर्चस्वाचा इतिहास

१९९६ : प्रकाश जावडेकर (भाजप)

२००२ : प्रकाश जावडेकर (भाजप)

२००८ : चंद्रकांत दादा पाटील (भाजप)

२०१४ : चंद्रकांत दादा पाटील (भाजप)

२०२० : अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष )

२०२६ : हर्षदा देशमुख-जाधव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) - मविआ

SCROLL FOR NEXT