विश्लेषण

हेडमास्तर योगेश गोगावलेंकडून पुणे भाजप नगरसेवकांची हजेरी

मंगशे कोळपकर

पुणे : महापालिकेत सत्तारूढ झाल्यावर भाजपच्या नगरसेवकांच्या गंमती-जमती आणि कुरबुरी आता उघड होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पक्षाला त्याची दखल घ्यावी लागली. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी महिला व बालकल्याण समिती, विधी समिती, क्रीडा समिती आणि शहर सुधारणा समित्यांच्या शनिवारी लागोपाठ बैठका घेतल्या. बैठकांचे औचित्य साधत त्यांनी नगरसेवकांची चांगलीच "हजेरी' घेतली अन् पक्षवर्तुळात हा चर्चेचा विषय झाला.
 
"नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेमुळे तुम्ही निवडून आला आहात, हे लक्षात ठेवा', "पक्ष संघटनेने पुणेकरांना शब्द दिला आहे. त्याचे पालन करावे लागेल', "महापालिकेतील कामकाज पक्षाच्या जाहिरनाम्याशी अनुरूप हवे' अशा शब्दांत त्यांनी नगरसेवकांना कानपिचक्‍या दिल्या. चारही समित्यांचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य बैठकांना उपस्थित राहतील, याची खबरदारीही त्यांनी अगोदरच घेतली होती. 

या समित्यांनी गेल्या तीन महिन्यांत काय काम केले, पुढे काय काम करणार याचा आढावा घेतानाच महापालिकेतील दैनंदिन कामकाजाबाबत त्यांनी सूचनाही दिल्या. "पक्ष जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्यच करावा लागेल' असेही त्यांनी निक्षून सांगितले. पक्षातील कुरबुरींची दखल घेत "शिस्तीत' करण्याचाही सल्ला त्यांनी दिला. महापालिकेतील कामगिरीचा आढावा घेणारा कार्यअहवाल दर महिन्याच्या पाच तारखेला प्रदेश आणि केंद्रीय पक्षस्तरावर पाठविण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षांनी घेतलेली झाडाझडती लगेचच सर्वत्र पसरली. महापालिकेत आता शहराध्यक्ष लागू लागलेत म्हटल्यावर काही कार्यकर्ते नाराजही झाले. एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने या बाबत, "नव्यांना जमत नाही, अन्‌ जुन्यांना रूचत नाही' अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त करून भावनांना वाट मोकळी करून दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT