मुंबई : अगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर लढविण्याची तयारी करा, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसैनिकांना सांगितले. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये मनसे स्वबळावर लढल्यास कोणाला फायदा होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
कारण दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यामुळे भाजप आणि मनसेची युती होणार, अशी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, आज (ता. 11) राज ठाकरे यांनी स्वबळावर लढणार असल्याचे कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले.
मनसे जरी स्वबळावर लढणार असली, तरी त्याचा फायदा भाजपला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजप आणि मनसे यांची छुपी युती असल्याची जोरदार चर्चा आहे. अगामी मुंबई महापालिकेसाठी भाजपने कंबर कसली आहे. मुंबई महापालिका जिंकायचीच असे नियोजन भाजपने केले आहे. त्यासाठी मनसे सोबत थेट युती केली तर भाजपच्या उत्तर भारतीय मतांना फटका बसेल, असा एक मतप्रवाह पक्षात आहे.
मराठी मते फोडून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न
मनसे स्वतंत्र लढल्यास भाजपला फटका बसणार नाही. तसेच मनसे मराठी मते फोडू शकते. त्यामुळे शिवसेनेला फटका बसू शकतो, असे सांगितले जात आहे. काही प्रमाणात का होईना वेगळे लढल्यामुळे मनसेचा भाजपला फायदा होईल, असे राजकीय जाणकार सांगतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यातच शिंदे यांचा शिवसेनील गट हा भाजप सोबत आहे. आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे यांच्याकडून केला जात आहे. त्याला भाजपही जोरदार पाठिंबा देत आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची असल्याचा दावा भाजप करत आहे.
त्यामुळे भाजप, शिंदे शिवसेना आणि मनसे स्वबळावर लढली, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कोंडी होईल, असे सांगितल जात आहे. अनेक वर्षांपासून मुंबईतील मराठी मतदार हा शिवसेनेच्या पाठिशी आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे मराठी मतांमध्येही फुट पडले, असा कायास भाजपचा आहे. तसे मनसे स्वबळावर लढल्यास त्यांची प्रत्येक वॉर्डामध्ये मोठी ताकद आहे. राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा मराठी माणूस त्यांच्या पाठिमागे जाईल. असे झाल्यास उद्धव ठाकरे, यांच्या शिवसेनेला फटका बसेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
हिंदुत्वाच्या मतात विभाजन होईल?
राज ठाकरे यांनीही हिंदुत्वाचा नारा दिला आहे. त्यातच भाजपचे हिंदुत्व आणि शिंदे गटानेही भाजपच्या हिंदुत्वाचीच री ओढली आहे. त्यामुळे भाजपची हिंदुत्वाची मते राज ठाकरे यांच्या पक्षाला जाऊ शकतात. असे झाल्यास भाजपलाच फटका बसेल. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या पाठिंशी मराठी मते, तसेच शिवसेनेच्या फुटीनंतर असलेल्या सहानुभूतीचा त्यांना फायदा होऊ शकतो, असेही सांगितले जाते.
राज ठाकरे काय म्हणाले?
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. राज ठाकरे यांनी 'एकला चलो रे' म्हणजे स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी सुरू करा, असा आदेशही मनसैनिकांना दिला आहे. ते म्हणाले की, यापूर्वी जी विधाने आणि बातम्या आल्या, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. आपण स्वबळावरच निवडणुका लढवणार आहोत. आताच्या राजकारणाला लोक कंटाळली आहेत. सध्या घाणेरडे राजकारण चालले आहे. सध्याच्या घाणेरड्या राजकारणाला पर्याय म्हणून लोकं आपला विचार करतील. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा, लोकांपर्यंत पोहोचा, असा कानमंत्रही त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.