Uddhav-Thackrey-Raj-Thackerey.jpg Sarkarnama
विश्लेषण

Raj Thakeray : राज ठाकरे हे फडणवीस, शिंदेंना झटका अन् काँग्रेस, पवारांना सुखद धक्का देतील?

Raj Thackeray’s Possible Move in Upcoming Local Elections : उद्धव ठाकरे सध्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीमध्ये आहे. या आघाडीत काही मोजके विरोधी पक्ष सोडले तर देशभरातील बहुतेक विरोधक आहेत. महाराष्ट्रात ठाकरेंसह काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी आहे.

Rajanand More

Alliance Strategy Ahead of Civic Polls : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना गणेशोत्सवाचे निमंत्रण दिलं आहे. उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर जाऊन श्रीगणेशासमोर नतमस्तक होतील, असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच राज यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जुने मातोश्री निवासस्थान गाठले होते. दोन्ही ठाकरे बंधुंमधील या वाढत्या भाऊबंदकीने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय युती होईल, हे निश्चित मानले जात आहे. मराठी विजयी मेळाव्यातच त्याची नांदी झाली आहे. काही ना काही निमित्ताने दोन्ही बंधूंच्या गाठीभेटी होत आहेत. युती झाली आहे, हे सांगण्यास दोघांमधील गाठीभेटी पुरेशा आहेत. पण अद्याप त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. कदाचित ती लवकर होणार नाही. कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना हा निर्णय घेताना अनेक तडजोडी कराव्या लागणार आहेत.

उद्धव ठाकरे सध्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीमध्ये आहे. या आघाडीत काही मोजके विरोधी पक्ष सोडले तर देशभरातील बहुतेक विरोधक आहेत. महाराष्ट्रात ठाकरेंसह काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी आहे. दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र आले तर महाविकास आघाडीचे काय होणार, हा मोठा प्रश्न आहे. अर्थात याचा निर्णय ठाकरेंनाच घ्यायचा आहे. दोन्ही बंधूंसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक महत्वाची आहे. शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंची ताकद कमी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी मनसेशिवाय दुसरा पक्ष नाही. त्यासाठी त्यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडावे लागेल. पण तेही त्यांना परवडणारे नाही.

लोकसभा निवडणुकीत अनेक भागांत ठाकरेंच्या उमेदवारांना काँग्रेसची कथित वोट बँक असलेल्या मतदारांची मते मिळाल्याचे बोलले जाते. ही काँग्रेसला सोडल्यास ही वोट बँकही जाईल, याची भीती ठाकरेंना असेल. अर्थात मुंबईत काँग्रेसची ताकद कमी असली तरी आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रत्येक मत ठाकरेंसाठी महत्वाचे असणार आहे. आघाडीतील दुसरा पक्ष म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी. पण या पक्षाची मुंबईत जेमतेम ताकद आहे. या दोन्ही काँग्रेसने उद्धव ठाकरेंना २०२२ नंतर पडझडीच्या काळात खंबीरपणे साथ दिली आहे.

राज ठाकरेंना सोबत घ्यायचे असल्यास उद्धव ठाकरेंना दोन्ही काँग्रेसची साथ सोडावी लागू शकते, ही राज यांचीच पहिली आणि सर्वात मोठी अट असू शकते. काँग्रेस आणि शरद पवार यांनी दोन्ही बंधू एकत्रित आल्यास आपल्याला काहीच अडचण नाही, अशी सूचक विधाने केली आहे. पण ते राजकीयदृष्ट्या अद्यापही थेट बोलण्यास तयार नाहीत. त्यांनी एकप्रकारे ठाकरेंवरच हा निर्णय सोडलेला आहे.

उद्धव ठाकरे हे राज यांना महाविकास आघाडीमध्ये आणण्यासाठी साकडं घालू शकतात का, ते ऐकून राज ठाकरे आपली भूमिका बदलतील का, असे अनेक तर्क यानिमित्ताने लढविले जाऊ लागले आहेत. महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे आल्यास आघाडीची ताकद वाढेल, यात शंका नाही. पण त्यानंतर राज यांना आपली भूमिका पटवून देताना नाकीनऊ येईल, हेही तितकेच खरे. जे उद्धव ठाकरेंच्याबाबत आजही होत आहे, तेच राज यांनाही ऐकावे लागेल. ही रिस्क राज ठाकरे घेतील की नाही, हे काळच सांगेल.

राज ठाकरे थेट महाविकास आघाडीत आले नसले तरी सत्ताधारी महायुती आणि प्रामुख्याने भाजपला टार्गेट करण्यासाठी मुद्द्यांवर त्यांचे एकमत होऊ शकते. त्याची सुरूवात झाली असून राज यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. देशभरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा चांगलाच तापवला आहे. ते महाराष्ट्रातील निवडणुकीवरही सातत्याने भाष्य करत आहेत. मतदारयाद्यांमधील कथित घोटाळ्याचा संदर्भ ते भारतीय निवडणूक आयोग आणि भाजपमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप करत आहेत. राज ठाकरेंनीही आता हा मुद्दा हाती घेतला आहे. पुण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राहुल गांधींचा उल्लेख करत मतदारयाद्यांमधील घोळांवर लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. हाच मुद्दा सध्या महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील कळीचा मुद्दा बनला आहे. आगामी निवडणुकीतही त्यावरूनच राजकारण तापणार असल्याचे दिसते.

‘मतचोरी’सह महायुती सरकारमधील मंत्र्यांची कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे, वादग्रस्त विधाने, पावसामुळे मुंबईसह ठाणे आणि प्रमुख शहरांमध्ये उडालेली दैना, हिंदी सक्ती, विधिमंडळातील हाणामारी आदी मुद्द्यांवर महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांचे एकमत आहे. या मुद्द्यांवर मनसेसह सर्वच विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरत आहेत. हेच मुद्दे आगामी काळात मनसेला महाविकास आघाडीच्या जवळ नेण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यांच्यात राजकीय युती झाली नाही तरी मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांविरोधात एकजुट झाल्यास नवल वाटायला नको. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT