विश्लेषण

मिडिया ट्रायलच्या माध्यमातून मतपरिवर्तन केले जात आहे - रामराजे निंबाळकर

सरकारनामा ब्युरो

सातारा : आपल्याकडे प्रसार माध्यमांची वाढ झाली आहे, पत्रकारिता मुक्त हवी, तिला स्वातंत्र्य हवे, मात्र या स्वातंत्र्याचे भान राज्यकर्ते आणि प्रसारमाध्यमे या दोघांनीही राखले पाहिजे आज विविध वाहिन्यांवरून जी मीडिया ट्रायल होत आहे त्यातून समाजाचे मतपरिवर्तन होत आहे असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केले. 

"सरकारनामा फेसबुक लाईव्ह' मध्ये बोलताना त्यांनी या महत्वाच्या मुद्याकडे लक्ष वेधले. आपल्याला दिलेले अधिकार आणि नियंत्रण ठेवले पाहिजेत. परंतु या माध्यमातून समाजावर संमोहन करून त्यांचे मत परिवर्तन केले जात आहे असे सांगून ते म्हणाले, काहीवेळा माध्यमे मर्यादा ओलांडत आहेत असे वाटते, जे विषय संसद किंवा विधिमंडळाच्या पातळीवर येत नाहीत ते विषय मीडिया ट्रायलच्या माध्यमातून दाखविले जात आहेत असेही त्यांनी सांगितले. 

अलीकडे नवनवीन वाहिन्या सुरू झाल्या आहेत, त्याच्या माध्यमातून न्याय निवडा होतोय. कायदा करायला किती वेळ लागतो, पण अंमलबजावणी होत नाही. कायदा तोडायच्या दृष्टीने अधिक पावले टाकली जातात. संसदेत किंवा विधिमंडळात गोधळ होतो पण माध्यमे फक्त गोंधळालाच प्रसिद्धी देतात, सदस्य अनेकवळा रात्र रात्र थांबून काम करतात त्याकडे माध्यमे पाहत नाहीत असेही रामराजे म्हणाले. 

मुळात आपल्या समाजानेही बदलले पाहिजे, मुळात मतदारांनी आमदारांना विचारले पाहिजे, तू किती प्रश्न विचारले, किती लक्षवेधी प्रश्‍न मांडले, आमचे किती प्रश्‍न धसाला लावलेस? त्याचबरोबर सरकारच्या धोरणात बदल करण्यासाठी, किंवा धोरण ठरवण्यासाठी त्याने सभागृहात कसा सहभाग घेतला याकडे समाजाने पाहिले पाहिजे. त्याचबरोबर सामाजिक सुधारणा व जनतेमध्ये जागृती होत नाही तो पर्यंत लोकशाही यशस्वी होणार नाही. समाजाने आपल्या मानसिकतेमध्ये आमुलाग्र बदल केला पाहिजे असेही रामराजे निंबाळकर यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT