विश्लेषण

फलटण तालुका "राजेमुक्त' करा : रणजितसिंह निंबाळकर

सरकारनामा ब्युरो

फलटण : परिवर्तन ही काळाची गरज असून, परिवर्तनाची वेळ अचूक आहे. सत्तेशिवाय न राहणाऱ्यांना जागा दाखवून देण्याची गरज आहे. माझी लढाई राजे गटाविरोधात असून, फलटण तालुका "राजेमुक्त' करण्यासाठी जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला. 

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुढील राजकीय दिशा ठरविण्यासाठी व आगामी काळात कार्यकर्त्यांची भूमिका जाणण्यासाठी स्वराज संघटनेचे अध्यक्ष व युवा नेते दिगंबर आगवणे यांनी आयोजिलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर महायुतीतील सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक यांची उपस्थिती होती. 

मी खासदार झाल्यानंतर 30 दिवसांत 300 कोटींची कामे मंजूर केली असून, 208 कोटींचा रेल्वे प्रकल्प मार्गी लावला. नीरा-देवघरचे पाणी ज्यांचा हक्क आहे, त्या दुष्काळी जनतेला मिळवून दिले, असे स्पष्ट करून श्री. निंबाळकर म्हणाले,"" ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून त्यांनी रडून पदे घेतली. गेली 20-25 वर्षे मंत्रिपदे भोगली. जनतेचा विकास व युवा पिढीचे भवितव्य घडवायचे कारण सांगून पक्ष बदलायला निघालेल्यांनी अगोदर आपल्या काळात नेमकं काय केलं ? याचा हिशोब द्यावा.'' 

श्री.आगवणे म्हणाले,"" सत्ता व मंत्रिपद टिकविण्यासाठी पाणी दुसऱ्यांना विकणाऱ्या प्रवृत्तीविरोधात मी निवडणूक लढणार आहे. राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांना तालुक्‍यातील कितीजण ओळखतात, हा प्रश्नच आहे. तालुक्‍यात रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. आगामी काळात आयूर ट्रेडर्सच्या माध्यमातून सात हजार जणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे. सत्ताधाऱ्यांइतपत मी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलो, तरी कार्यकर्त्यांचे मला भक्कम पाठबळ लाभले आहे. प्रतिकूल काळात ज्यांनी मला साथ दिली, जे माझ्यासाठी झटत आहेत. त्यांच्यासाठी मी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. सर्वसामान्य माणूस पेटून उठतो, त्यावेळी परिवर्तन अटळ असते.'' या प्रसंगी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आमचं ठरलंय... आगवणेच आमदार 
खासदार निंबाळकर यांनी फलटणची जागा महायुतीतील कुठल्या पक्षाच्या वाट्यास जाईल, उमेदवार कोण असेल, हे अद्याप ठरलं नाही, असे वक्तव्य करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी दिगंबर आगवणे यांच्या नावाच्या जोरदार घोषणा दिल्या. आमचं ठरलंय दिगंबर आगवणेच आमदार, असे खासदारांना सांगितले. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT