Prakash-Ambedkar-.
Prakash-Ambedkar-. 
विश्लेषण

आघाडीत राष्ट्रवादी कॉंग्रेस नसेल तरच कॉंग्रेससोबत : प्रकाश आंबेडकर 

सुरेंद्र चापोरकर

अमरावती :  " भारिप बहुजन महासंघ कॉंग्रेससोबत आघाडी करण्यास इच्छुक आहे. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस या आघाडीत नको आहे. ही अट मान्य असेल तरच कॉंग्रेससोबत आघाडी होईल," अशी भूमिका भारिप बहुजन महासंघाचे नेते व माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. 

भारतीय राज्यघटना बदलविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करून ते म्हणाले, "2019 मध्ये पुन्हा मोदी सरकार सत्तेवर येता कामा नये, यासाठी कॉंग्रेसला सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. मात्र, कॉंग्रेसने उमेदवार निवडताना सर्व समाजघटकांना प्राधान्य दिले पाहिजे; तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आम्हाला नको. या अटी मान्य असतील तरच आम्ही त्यांच्यासोबत राहू; अन्यथा राज्यातील संपूर्ण 48 लोकसभेच्या जागा मित्रपक्षांच्या मदतीने लढविण्यावर आम्ही ठाम आहोत . "

भाजप-सेना युतीला मराठ्यांना आरक्षणच द्यायचेच नाही, त्यामुळे राज्यात हिंसाचार होऊनसुद्धा सरकार केवळ चर्चेच्या गुऱ्हाळात वेळकाढूपणा करीत आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. 

वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित मेळाव्यासाठी ते शहरात आलेले होते. त्या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, "मुळात मराठा आरक्षणाचा विषय तत्कालीन कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने भिजत ठेवला होता. त्याच वेळी या मुद्द्यावर गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे होते; मात्र तत्कालीन सरकारने हे काम केले नाही. आता राज्यात आरक्षणासाठी हिंसाचार उफाळला आहे. मुळात भाजप संघाला आरक्षण द्यावयाचे नसल्याने सरकार चर्चेचे केवळ सोंग करीत आहे."

पत्रकार परिषदेला माजी आमदार लक्ष्मण माने, माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, विजय मोरे, जिल्हाध्यक्ष ऍड. नंदेश अंबाडकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT